Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-२३)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-२३)

आर्यनला अक्षरशः रडू कोसळले होते; त्यामुळे त्याचे डोळे अगदी लाल झाले होते. आर्यनला असे भावूक झालेले, हतबल झालेले पाहून ज्ञानदाही पुरती कोलमडली होती. तिने आर्यनचा हात हातात घेतला अन् त्याला विश्वासात घेत ती त्याला विचारपूस करू लागली. ती त्याला म्हणाली, " आर्यन, प्लीज! काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? मी तुला पहिल्यांदा असं बघतेय रे! तो जुना आर्यन कुठे आहे? सांग ना... " 


" तो आर्यन? तो तुला कधीच पाहायला मिळणार नाही कारण तो आर्यन नव्हता... तो दर्शिकाचा 'आरू' होता अन् ज्या जगात दर्शिकाच हयात नाही तिथे आरू तरी कसा असणार? तो आरू देखील गेला त्याच्या दर्शिकाच्या मागोमाग... तो आर्यन सुद्धा मेला ज्ञानदा... मेला तो आर्यन... " आर्यन खिन्न स्वरात बोलला अन् त्याने त्याचा हातही ज्ञानदाच्या हातातून सोडवून घेतला. 


" आर्यन... " ज्ञानदा रडवेल्या आवाजात म्हणाली. तिच्या हाकेला आर्यनने उपहासात्मक हसून फक्त हुंकार भरला.


" आर्यन प्लीज! " ज्ञानदा हुंदका आवरत बोलली. आर्यन पुढे काही बोलणार त्याआधीच तिथे शिवाक्षी आणि दर्शन आले. त्यांची चाहूल लागताच आर्यनने स्वतःला परत एकदा निर्विकार करून घेतले. ज्ञानदानेही तिचे अश्रू पुसून घेतले. 


दर्शन आर्यनला म्हणाला, " बाबा, तुम्ही दोघे काय बोलत होते? आणि बाबा तुझ्या डोळ्यात पाणी का आहे? तू रडला होतास का? " 


" अरे नाही रे! तुझ्या मॅम तुझं कौतुक करत होत्या. तू खूप हुशार आणि समंजस आहे असं म्हणाल्या त्या; शिवाय तू डान्स खूप आवडीने करतोस हे सर्व सांगत होत्या तुझ्या मॅम... " आर्यनने सर्रास विषय बदलला. 


" बाबा, काय रे? माझं एवढं छोटंसं कौतुक ऐकून तुला भरून आलं? एवढा हळवा कसा रे तू? सेंटी कुठला... " दर्शन कपाळावर हात मारत बोलला. त्यावर आर्यनने कसनुसं हसून निव्वळ हुंकार भरला. दर्शन पुढे आर्यनचे डोळे पुसत बोलला, " ह्म्म... आता हे असे डोळे पुस बघू... आणि आता मी तुला वॉर्निंग देतोय बरं! यापुढे माझं असं कौतुक ऐकून रडायचं नाही हं! ह्यापेक्षा मोठमोठ्या कॉम्प्लिमेंट्स देतीलच ना लोक मला मग त्या कमेंट्स ऐकून पण तू असाच रडशील का? नाही ना! " 


" बरं बाळा! सॉरी! " आर्यन म्हणाला. 


" ह्म्म! गुड! " दर्शन म्हणाला. 


" बरं आता आपण घरी जाऊया ना! बराच उशीर झालाय! " आर्यन म्हणाला. 


" हो! " दर्शनने होकार दिला. 


" बरं मग! चला! " आर्यन बोलला आणि दर्शनचा हात हातात घेत हॉटेलबाहेर जाऊ लागला. त्यानंतर त्याला दुजोरा देत ज्ञानदा आणि शिवाक्षी सुद्धा गेले. 


                त्यानंतर ते चौघेही कारमध्ये बसले. आर्यनने कार ड्राईव्ह करायला सुरुवात केली. आर्यनने ज्ञानदाला तिच्या घराचा पत्ता विचारला. तिने तिचा पत्ता सांगितला. त्यानुसार तो ज्ञानदाच्या घरी पोहोचला. तो ज्ञानदा आणि शिवाक्षीला त्यांच्या घरी सोडून त्याच्या घरी परत जाणार होता पण शिवाक्षी आणि ज्ञानदाने थोडा वेळ थांबण्याचा आग्रह केला. त्यांचा आग्रह पाहता आर्यन आणि दर्शन ज्ञानदाच्या घरी थांबले. त्यांच्या घरी कुणीच नव्हतं. 


ते चौघेही थोडा वेळ हॉलमध्ये शांत बसून होते. तेवढ्यात शिवाक्षी म्हणाली, " दर्शन, तू माझ्या खोलीत चल ना... मी तुला माझी खोली दाखवते. तुला तिथे फार मजा येईल. " 


" बाबा, मी जाऊ... शिवा ताईसोबत? " दर्शनने उत्साहात विचारले. आर्यनने त्याला हुंकार भरून परवानगी दिली. परवानगी मिळताच ते दोघेही शिवाक्षीच्या खोलीत गेले. 


ते दोघे जाताच अख्ख्या घरभर नीरव शांतता पसरली. ती शांतता भेदत ज्ञानदा आर्यनला म्हणाली, " आर्यन प्लीज! आय नीड टू नो... सांग काय झालं दर्शिकाला? तुमच्या सुखी संसाराला कुणाची दृष्ट लागली? " 


आर्यनने खोल श्वास घेतला आणि तो म्हणाला, " दृष्ट? कदाचीत माझीच... " 


" आर्यन प्लीज! " ज्ञानदा विनवणी करत बोलली. त्यावर आर्यनने उसासा घेतला आणि त्याने इत्थंभूत ज्ञानदाला सांगितले. 


                सर्वकाही ऐकून एकीकडे ज्ञानदा अगदी सुन्न झाली होती. तिच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळत होते. दुसरीकडे आर्यनही दर्शिकाच्या आठवणीत अगदी हरवून गेला होता. तरीही ज्ञानदाने स्वतःला सावरले आणि ती आर्यनची समजूत घालू लागली.


" आर्यन माझ्यापेक्षा लाख पटीने तूच समंजस आहे. म्हणून प्लीज तू असा स्वतःला दोष देऊ नकोस. जे झाले त्यात तुझी काहीच चूक नव्हती. दर्शिकाने स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला तो तुझ्याच प्रेमाखातर... पण तिने असा आर्यन कधीच वर्णिला नसेल ना! आर्यन तू आणखी किती दिवस असा झुरणार आहेस? गेली आठ वर्षे तू फक्त स्वतःला दोष देत आला आहेस, इव्हन तुझी चुकी नसतानाही... प्लीज! तू स्वतःला शिक्षा देऊ नकोस. " ज्ञानदा आर्यनला बोलली अन् त्याच्या प्रतिसादाची वाट पाहू लागली. 


क्रमशः

........................................................... 

©®

सेजल पुंजे

२२/११/२०२२.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//