Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-२१)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-२१)

" मला वाटलंच होतं! म्हणजे बाबा मला अगदी खरं सांगतो की, आई माझ्यावर खूप प्रेम करते! ती माझी खूप काळजी करते. दूर राहूनही माझ्या प्रत्येक इच्छा-आकांक्षा पूर्ण करते. " दर्शन पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला. 

 

" फक्त आईच नाही हं! बाबा पण प्रेम करतात म्हटलं! " आर्यन दर्शनला म्हणाला. 

 

" हो रे बाबा! माहितीये मला! तू पण ना सतत आईशी स्पर्धा करत असतो. आता असा उगाच रुसू नकोस अन् मिठीत घे मला! " दर्शन हसून म्हणाला अन् त्याने मिठीसाठी हात पसरले. 

 

                आर्यनने लगेच दर्शनला मिठी मारली. खरंतर हळव्या आर्यनला क्षुल्लक गोष्टही भावूक करून जायची अन् त्यातंही जर एखादी बाब दर्शिकाशी संबंधित असेल तर तो भावूक व्हायचाच म्हणून आजही तो भावूक झाला होता. त्याचे डोळे लाल झाले होते अन् कंठही दाटून आला होता पण दर्शनच्या मिठीत विसावून त्याने स्वतःच्या भावनांना लगेच सावरले. 

 

                दुसरीकडे त्या दोघांना बिलगलेले पाहून शिवाक्षी सुद्धा भावूक झाली आणि एवढा वेळ स्तब्ध उभ्या असलेल्या ज्ञानदालाही तिचे अश्रू अनावर झाले अन् तिच्या डोळ्यातला एक अश्रू गळून खाली पडला पण लगेच प्रसंगावधान साधत तिने डोळे पुसून घेतले. 

 

काही वेळानंतर आर्यनच्या मिठीतून बाहेर निघून दर्शन आर्यनला उद्देशून म्हणाला, " अरे बाबा, मी माझ्या मॅमशी तुझी ओळख करून द्यायलाच विसरलो. " 

 

" अं! तुझ्या मॅम? " आर्यनने प्रश्नार्थक नजरेने दर्शनकडे पाहिले. 

 

" हो ना! माझ्या डान्स टिचर अर्थात शिवाक्षी ताईची मम्मा! त्या खूप वेळेपासून इथेच उभ्या आहेत. तुझ्या लक्षात नाही आलं का? बरं असू दे! मी आता ओळख करून देतो. " दर्शन डोळे मिचकावून म्हणाला. 

 

" बरं! " आर्यन हसून बोलला व त्याने त्याची नजर वर केली आणि तो एकटक त्याच्यापुढे उभ्या असलेल्या ज्ञानदाकडे एकटक पाहतच राहिला. दर्शन ज्ञानदाची ओळख आर्यनला करून देणार होता पण त्याआधीच आर्यन पुटपुटला, " ज्ञानदा? ज्ञानदा कर्वे? "

 

" हो! पण बाबा तुला कसं माहीत? तुम्ही दोघे एकमेकांना आधीपासूनच ओळखता का? " दर्शन लागोपाठ प्रश्न विचारू लागला. 

 

" अं! हो! " आर्यन आणि ज्ञानदा एकत्रच बोलले. 

 

" म्हणजे बाबा, ज्ञानदा मॅम तुझ्या फ्रेंड आहेत? " दर्शनने परत प्रश्न विचारला. 

 

" अं! हो! " परत आर्यन आणि ज्ञानदा एकत्र बोलले. 

 

" अरे व्वा! किती भारी! बाबा, आई किती ग्रेट आहे ना! " 

 

" म्हणजे? " आर्यनने गोंधळून विचारले. 

 

" म्हणजे बघ ना, आईने माझ्यासाठी एक मैत्रीण म्हणून शिवाक्षी ताईला पाठवले आणि तुझी तुझ्या फ्रेंडशी अर्थात ज्ञानदा मॅमशी भेट घडवून आणली. आईला खरंच खूप काळजी आहे आपली! ती दूर राहूनही आपल्यावर खूप खूप प्रेम करते. हो ना! " दर्शन औत्सुक्याने बोलला. 

 

" अं! ह्म्म! बरोबर! " आर्यन थोडा गोंधळून बोलला. 

 

" बाबा, मला नुकताच एक प्लॅन सुचलाय. " दर्शन उत्साहाने म्हणाला. 

 

" प्लॅन? कोणता प्लॅन? " आर्यनने गोंधळून विचारले. 

 

" मला वाटतं, आपण आजचा दिवस सेलिब्रेट करायला हवा! " दर्शन म्हणाला. 


" सेलिब्रेट? का आणि कशासाठी? " आर्यनने परत गोंधळून विचारले. 

 

" सेलिब्रेशनसाठी निमित्त असायलाच हवं असं काही नाही पण आपल्याकडे निमित्त आहे. म्हणून आज आपण मैत्री दिवस साजरा करूया! " दर्शन म्हणाला. 

 

" काय? आज? अन् असं एकाएकी? दर्शू, बाळा थोडं सविस्तर सांगशील का? " आर्यनचा अक्षरशः गोधळ उडाला होता. 

 

" बाबा मला म्हणायचंय की, आज माझी शिवा ताईशी मैत्री झाली आणि आजच तुझी आणि ज्ञानदा मॅमची परत भेट घडली ना... म्हणून आजचा दिवस आपण मैत्री दिवस म्हणून साजरा करूया ना बाबा! " दर्शन म्हणाला. 

 

" बरं! जशी तुझी इच्छा! " आर्यन म्हणाला. 

 

" हो, तसं पण आज आपण बाहेर डिनर करणार होतोच... सो, मला वाटतं आज ज्ञानदा मॅम आणि शिवा ताई सुद्धा आपल्याला कंपनी देतील. " दर्शन म्हणाला. 

 

" बरं चालेल! " आर्यन म्हणाला. 

 

" अं! नाही! याची काही गरज नाहीये दर्शन! " ज्ञानदा अवघडून बोलली. 

 

" मॅम! प्लीज! नाही नका ना म्हणू! प्लीज! ही माझी पहिली वेळ आहे, माझ्या एखाद्या फ्रेंडला डिनरसाठी निमंत्रण देण्याची; कारण शिवा ताई माझी पहिलीच फ्रेंड आहे. म्हणून मला हा दिवस आणखी स्पेशल करायचा आहे सेलिब्रेट करून! " दर्शन केविलवाण्या स्वरात म्हणाला. 

 

शिवाक्षी आणि ज्ञानदा अजूनही गोंधळलेल्या मुद्रेत उभ्या होत्या. त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही म्हणून दर्शन आर्यनला आग्रह करत म्हणाला, " बाबा, तूच सांग ना मॅमला! " 

 

" नाही, दर्शन! मला वाटतं आपण हे सेलिब्रेशन नंतर कधीतरी करूयात! " ज्ञानदा म्हणाली. 

 

" नाही, नको! आजच करूयात मैत्री दिवस सेलिब्रेट अगदी दर्शनने म्हटले त्याप्रमाणे; म्हणून ज्ञानदा अन् शिवाक्षी तुम्ही दोघेही आणखी वेगळे बहाणे नका देऊ आणि आमच्यासोबत चला! बसा, कारमध्ये पटकन! " आर्यन ज्ञानदा आणि शिवाक्षीला उद्देशून म्हणाला पण तरीही त्या दोघी अवघडून एकमेकींकडे पाहू लागल्या. 

 

क्रमशः

................................................................. 

 

©®

सेजल पुंजे.

२१/११/२०२२.

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//