शिवाने थोडा खोल श्वास घेतला आणि ती दर्शनला म्हणाली, " ह्म्म! बाय द वे तू माफी नको मागू! तू फारसे काही केलेच नाहीस. मम्मा मला कायमच ओरडत असते तिची नेहमीची सवय आहे. फक्त आज तू तक्रार केल्याचं निमित्त तिला मिळालं आणि तिने परत माझ्यावर निशाणा साधला. शिवाय खरी माफी मी मागायला हवी कारण आज शाळेत मी उगाच तुला उंदीर म्हटलेलं आणि तुला तुझ्या आवडत्या जागेवरही बसू दिलं नव्हतं! तर त्यासाठी आय ऍम सॉरी! "
" इट्स ओके! काही हरकत नाही आणि उद्यापासून त्या जागेवर तू सुद्धा बसू शकतेस. फक्त ते उंदीर ऐकून घ्यायला थोडं अवघड जाईल काही दिवस पण आताशा वाटतंय की, हळूहळू होईल त्याचीही सवय! " दर्शन म्हणाला. त्यावर शिवा आणि तिची आई दोघीही मंद हसल्या. त्या दोघींना हसताना पाहून दर्शनने केसात हात फिरवला अन् तो सुद्धा ओशाळून हसला.
" एवढासा आहेस रे तू अन् किती गोड गोड बोलतोस! " शिवाची आई दर्शनच्या डोक्यावर हात ठेवून बोलली.
" मॅम तुम्ही जास्तच कौतुक करत आहात. " दर्शन हसून म्हणाला.
" अरे बाळा खरंच! तू डिझर्व्ह करतोस. नाहीतर आमचं हे ध्यान... फक्त तक्रारी करायला पटाईत आहे... बाकी समंजसपणा तर हिने जणू ऐरणीवरच टांगलाय. " शिवाची आई शिवाला टोमणा मारत बोलली.
" मम्मा! आता तू परत सुरू नको होऊ हं! आधीच सांगतेय मी! " शिवा गाल फुगवून दम देत बोलली.
" बरं! असो... " शिवाची आई म्हणाली.
" बरं! आपला माफीनामा तर कबूल झालाय! आता आपण एकमेकांची ओळख करून घ्यायला हवी, असं मला वाटतं. " शिवा गालातल्या गालात मंद हसत बोलली.
" हो चालेल! " दर्शनने प्रतिसाद दिला अन् पुढे तो त्याचा परिचय देत म्हणाला, " हाय, मी दर्शन ताम्हणकर! थर्ड स्टॅंडर्डमध्ये शिकतोय. "
" अरे व्वा, भारीच दिलास इंट्रो तू! बाय द वे, मी शिवाक्षी कर्वे! नुकताच तुझ्या शाळेत अर्थात ईरा पब्लिक स्कूलमध्ये माझं ट्रान्सफर झालंय आणि मी सेव्हन स्टॅंडर्डमध्ये आहे. " शिवा अर्थात शिवाक्षी म्हणाली.
" बरं मी सुद्धा परिचय दिला तर चालेल का? " शिवाक्षीची आई हसून त्या दोघांत मध्यस्थी करत बोलली.
" ऑफकोर्स मॅम! " दर्शन म्हणाला.
" मी ज्ञानदा कर्वे! शिवाची आई आणि माझं प्रोफेशन हेच आहे की, मी डान्स टिचर आहे! " ज्ञानदा अर्थात शिवाक्षीची आई बोलली.
" नाईस टू मीट यू मॅम! " दर्शन हसून म्हणाला.
" नाईस टू मीट यू टू बाळा! " ज्ञानदा दर्शनचे गालगुच्चे घेत बोलली.
" नाईस टू मीट यू शिवा ताई! बाय द वे मी तुला ताई म्हटलं तर चालेल ना? " दर्शनने विचारले.
" अरे, यात काय विचारण्यासारखं... मला तर आवडेल तू मला ताई बोललेलं... निदान त्या निमित्ताने का होईना मला ताईगिरी करता येईल! " शिवाक्षी डोळा मारत बोलली.
" हो! " दर्शन हसून बोलला.
" बरं! आता तुमच्या दोघांचीही मैत्री झालेली आहेच तर आपण खाली जायला हवं! कारण मला वाटतं, दर्शन तुझे बाबा तुझी वाट पाहत असतील! " ज्ञानदा बोलली.
" हो मॅम! " दर्शन बोलला. त्यानंतर ते तिघेही डान्स क्लासेसममधून बाहेर पडले. लगेच ते तिघे त्या अपार्टमेंटच्या पार्किंग लॉटमध्ये आले. अगदी पुढेच आर्यनची कार उभी होती आणि तो कार बाहेर पाठमोरा उभा राहून कॉलवर बोलत होता.
दर्शनला आर्यन दिसताच तो ज्ञानदा आणि शिवाक्षीला म्हणाला, " शिवा ताई आणि ज्ञानदा मॅम तो आहे माझा बाबा! बाबा आमच्या कार जवळ उभा राहून कॉलवर बोलत आहे. "
" अच्छा! आता ते इथेच आहे म्हटल्यावर आम्हालाही त्यांची भेट घेता येईल. " ज्ञानदा बोलली.
" हो आणि महत्त्वाचं म्हणजे मला बाबाला सांगायचं होतंच की, शिवा ताईशी माझी आता मैत्री झाली आहे ते! आफ्टरऑल त्यानेच मला समजावून सांगितलं होतं. म्हणून बाबाला शिवा ताईला भेटून छान वाटेल. " दर्शन म्हणाला.
" हो ना! आणि मलाही तुझे बाबा फार सॉर्टेड व्यक्ती वाटत आहेत! कारण ज्याप्रमाणे त्यांनी तुझी समजूत घातली, ते फार इंप्रेसिव्ह होतं म्हणून त्यांची भेट घ्यायला मलाही आवडेल. " शिवाक्षी म्हणाली.
" चला मग! " दर्शन म्हणाला आणि पळतच 'बाबा' अशी हाक मारून आर्यनजवळ पळत गेला आणि आर्यन पाठमोरा उभा असताना दर्शन त्याला पाठमोराच बिलगला. शिवाक्षी आणि ज्ञानदा मात्र दर्शनचा उत्साह पाहून गालातल्या गालात मंद हसत आर्यन अन् दर्शनजवळ सावकाश चालत जाऊ लागल्या.
दुसरीकडे दर्शन आर्यनला बिलगताच आर्यनने कॉलवरचे बोलणे आवरते घेऊन लगेच कॉल कट केला; कारण त्याला त्याच्या कामामुळे दर्शनकडे दुर्लक्ष करायची मुळीच सवय नव्हती. त्याला फॅमिली टाईम आणि वर्क टाईम यांची भेसळ करणे आवडायचे नाहीच मुळात; म्हणून साहाजिकच कॉल आटोपून आर्यनने हातातला मोबाईल खिशात ठेवला आणि तो दर्शनच्या दिशेने उभा राहिला व त्याच्यापुढे गुडघ्यावर बसला. एव्हाना ज्ञानदा आणि शिवाक्षी सुद्धा त्या दोघांजवळ पोहोचल्या होत्या. त्यांनाही आर्यनचा चेहरा दिसला आणि त्या दोघीही आश्चर्याने डोळे मोठे करून आळीपाळीने आर्यन आणि दर्शनकडे पाहत राहिल्या.
क्रमशः
............................................................
©®
सेजल पुंजे
२१/११/२०२२.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा