वाट हळवी वेचताना... (भाग-१८)

वेगळ्या धाटणीची कथामालिका...

शिवाच्या उत्तराने शिवाची आई अगदी अचंबित होऊन तिच्याकडे पाहत तिला म्हणाली, " शिवा, तुझी अट फार महागडी आहे, असं नाही का वाटत तुला? "


" ह्म्म असेलही कदाचित! पण तू जी चुकी केलीय त्यानुसार मला वाटतं, इट्स नॉट अ बिग डील! " शिवा म्हणाली. 


" शिवा... तू पण ना! बरं असो! डन! आजच जाऊया आपण! " शिवाची आई म्हणाली. 


" अरे व्वा, मम्मा! ये हुई ना बात! दॅट्स व्हाय आय लव्ह यू अलॉट! " शिवा म्हणाली. 


" पुरे पुरे! मस्का खूप लावलास. चल आता गुपचूप! " शिवाची आई म्हणाली. त्यावर त्या मुलीनेही हुंकार भरला आणि त्या दोघीही डान्स क्लासेस बाहेर जाऊ लागल्या. तेवढ्यात त्या मुलीला दर्शन खुर्चीवर बसलेला दिसला. त्याचक्षणी दर्शनने सुद्धा त्या मुलीकडे पाहिले. दोघांची नजरानजर झाली अन् त्याला कळले की, शिवा आणि तिच्या आईचे बोलणे झालेले आहे. म्हणून तो लगेच शिवाजवळ गेला. 


शिवाजवळ जाऊन दर्शन कान पकडून अगदी दिलगिरी व्यक्त करत म्हणाला, " आय ऍम सॉरी! "


" हं? काय? " शिवा गोंधळून बोलली आणि मागेपुढे पाहू लागली; कारण अक्षरशः ती दर्शनच्या एकाएकी माफी मागण्यामुळे गोंधळून गेली होती. 


" आय ऍम सॉरी! मघाशी मी विनाकारण तुला त्रास दिला. तुझी खोटी तक्रार या मॅडमकडे केली त्यामुळे सगळ्यांसमोर त्या तुझ्यावर ओरडल्या. मी तुझ्याशी चुकीच्या पद्धतीने वागलो. म्हणून मघाशी मी जे काही केलं त्यासाठी खूप खूप सॉरी... मी परत असं कधीच नाही वागणार! प्रॉमिस! " दर्शन अगदी नम्रपणे स्वतःची चूक कबूल करून परत माफी मागू लागला. 


" काय? तू माझी माफी मागतोय? खरंच? " शिवा आश्चर्य दर्शवत बोलली. 


" हो! मी तुझी माफी मागतोय कारण माझ्या बाबाने माफ करायला आणि माफी मागायला आज अन् आताच नव्याने शिकवलंय... शिवाय मलाही त्यांचं म्हणणं पटलं. मलाही बाबाने जेव्हा माझी बाजू कशा रीतीने चुकीचे आहे, हे पटवून दिले; तेव्हा मला कळले की, माझी तुझ्याशी वागणूक कित्येक पटीने चुकीची होती. मी स्वतःमध्येच निगेटिव्ह ब्रेन घेऊन वाटचाल करणार होतो पण बाबाने मला वेळीच माझी चूक लक्षात आणून दिली आणि म्हणून मी वेळ न दवडता तुझी माफी मागायला आलोय. " दर्शन अगदी निरागस स्मित करत म्हणाला. 


" ब्रो! एवढुसं वय आहे तुझं नि एवढं ज्ञान पाजाळतोय तू? काहीतरी नवीनच रसायन वाटतोय तू मला! नक्की सांग, कुठला प्रॅंक तर करत नाही आहेस ना? " शिवा बारीक डोळे करून दर्शनकडे साशंक नजरेने पाहत बोलली. 


" नाही! मी असं काहीच करत नाहीये! जेन्युनली माफी मागतोय. " दर्शन शांतपणे म्हणाला. 


" बापरे! अगदीच साधूसंतासारखं वाटतंय मला तुझं कॅरेक्टर! " शिवा हसून म्हणाली. 


" असं काही नाहीये! मी फक्त माझ्या बाबाने जे सांगितलं ते फॉलो करतोय. " दर्शनही मंद हसून बोलला. 


" बरं बरं! पण काय रे तुला माझा जराही राग नाही वाटला? कारण मी शाळेत तुला बराच त्रास दिला होता ना... मग तरीही स्वतःच तू माझी माफी मागायला आलास, यात तुला हेजिटेशन म्हणा किंवा ऑकवर्ड फील नाही का झालं? " शिवा म्हणाली. 


" आधी मी माफी मागायला तयार नव्हतो पण बाबांनी समजूत घातली नि मग माझ्याही मनातले सारे किंतुपरंतू पसार झाले. " दर्शन म्हणाला. 


" अच्छा! पण काय रे तुला सगळं बाबाच का सांगतात? बाबांचाच चॅम्प आहेस का तू? आईचा लाडका नाहीये का? मघापासून फक्त बाबांचंच कोडकौतुक करतोयस! " शिवा म्हणाली. 


" हो, बाबाचा चॅम्प तर आहेच मी पण आईचा लाडका सुद्धा आहे! पण बाबाबद्दलच सगळं बोलतोय कारण आई मला काही शिकवतच नाही ना... " दर्शन कॅज्युअली बोलला. 


" का रे? असा का बोलतोयस? " शिवाने विचारले. 


" माझी आई देवाघरी आहे ना! तिथे ती देवबाप्पाने दिलेला चॅलेंज कम्प्लिट करतेय ना... ती दूर राहून माझ्यासाठी आणि बाबासाठी प्रार्थना करत असते. तर बाबा बोलतात की, ती खूप थकून जात असते म्हणून सर्व गोष्टी ती बाबाला सांगते आणि मग बाबा मला सांगतात. " कशाचीही जाण नसलेला दर्शन अगदी कॅज्युअली बोलत होता पण त्याचं उत्तर ऐकून शिवा आणि तिची आई मात्र अगदी निशब्द झाले होते. त्या दोघीही मायलेकी अगदी भावूक झाल्या होत्या त्यामुळे परिस्थितीतील गांभीर्य लक्षात घेऊन त्या दोघी नजर चोरून एकमेकींकडे पाहू लागल्या. 


                शिवाला मनोमन वाटत होते की, तिने उगाच दर्शनच्या आईचा विषय काढला; कारण त्यामुळे कळत नकळत दर्शनच्या भावना नक्कीच दुखावल्या गेल्या होत्या. अजाणतेपणी का होईना पण शिवाने चुकी केली होती, त्यामुळे तिला वाईट वाटत होतं. म्हणून ती परिस्थिती कशी हाताळावी, हे तिला उमजत नव्हते म्हणून तिने तिच्या आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. तिच्या आईने तिला आश्वस्त केले अन् इशाऱ्यानेच विषय बदलवायला सांगितले. त्यानंतर शिवाने थोडा खोल श्वास घेतला आणि ती शब्दांची जुळवा-जुळव करत बोलण्याचा प्रयत्न करू लागली. 


क्रमशः

.................................................................. 

©®

सेजल पुंजे

२०/११/२०२२.

🎭 Series Post

View all