Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-१७)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-१७)

आर्यनला एकटक पाहताना बघून दर्शन आर्यनचा हात हातात घेत म्हणाला, " मला माहीत आहे बाबा की, तुला नाही आवडलं मी त्या मुलीची फजिती केलेली; पण सुरुवात त्या मुलीने केली होती. शिवाय तिच्यामुळे आज परत माझ्या वर्गातल्या मुलांना संधी मिळाली मला चिडवण्याची आणि माझ्यावर हसण्याची... एवढं होऊन सुद्धा त्या मुलीने मला सॉरी देखील म्हटलं नाही. मग मला वाईट वाटणं साहाजिक नाहीये का? "


" दर्शू, मला तुझं म्हणणं कळतंय. तुला वाईट वाटलं, मी मान्य करतो पण त्या मुलीविषयी मनात राग धरून ठेवणे खरंच योग्य होतं का बाळा? सूड घेण्याचा विचार तुझ्या या बालवयाला चुकूनही शिवता कामा नये रे... एवढ्याशा वयात स्वतःला नकारात्मक विचारात गुंतवून घेणे चुकीचं आहे रे! एखादा व्यक्ती आपल्यासोबत कसा वागतो यापेक्षा आपण कसे त्याला सामोरे जातो यावर आपली सहनशीलता अवलंबून असते. म्हणून आलेले प्रत्येक अनुभव स्पोर्ट्समन स्पिरीट कायम ठेवून अनुभवायचे असतात बाळा! जर तुला आतापासूनच या लहान लहान नकारात्मक विचार वा अनुभवांची सवय करून घ्यायची नसेल तर कसं चालणार? अजून उभं आयुष्य आहे बाळा तुझ्यापुढे... मग तू त्याला कसा सामोरे जाशील? नकारात्मक विचारांना आपल्या सकारात्मकतेने मात द्यायची असते; पण तू नकारात्मकतेला नकारात्मकतेनेच मात द्यायचा प्रयत्न केलास, जे मला मुळीच पटलं नाही. " आर्यन दर्शनची समजूत घालत म्हणाला. 


" आय ऍम सॉरी बाबा, मी परत असं नाही करणार. " दर्शन दिलगिरी व्यक्त करत बोलला. 


" असो... तू मान्य केलंस यातंच सारं आलं! शिवाय तू माफी माझी नव्हे तर त्या मुलीची मागायला हवी, असं मला प्रकर्षाने वाटतंय. " आर्यन म्हणाला. 


" पण बाबा... " दर्शन अर्धवटच बोलला. 


" पण वगैरे काही नाही. तू तिची माफी माग. ती तुझ्याशी शाळेत कशी वागली, ते विसरून तू आज डान्स क्लासेसमध्ये तिच्याशी कसा वागलास, हे ध्यानात ठेऊन तू तिची माफी मागायला हवी. कळलं ना! " आर्यन बोलला. 


" बरं बाबा! " दर्शन मंद स्वरात म्हणाला. 


" आणि आणखी एक! तू त्या मुलीची माफी मनापासून माग! फक्त मी सांगितलं म्हणून माफी नको मागू! " आर्यन म्हणाला. 


" ठीक आहे बाबा! तू थांब इथेच मी लगेच जाऊन त्या मुलीची माफी मागून येतो. " दर्शन हसून म्हणाला. 


" बरं! " आर्यन गालातल्या गालात मंद हसून बोलला. 


                त्यानंतर दर्शन कारचे दार उघडून कार बाहेर पडला आणि धावतच अपार्टमेंटमध्ये शिरला. तो डान्स क्लासेसच्या आत जात असताना त्याला एका कोपऱ्यात तीच मुलगी दिसली, जिच्यासोबत त्याचं भांडण झालं होतं. त्याने लगेच तिच्या दिशेने एक पाऊल टाकले पण तो जागीच थबकला; कारण ती मुलगी तिच्या आईसोबत बोलत होती. म्हणून त्यावेळी त्याने त्यांच्या संवादात खंड न पाडणे श्रेयस्कर मानले आणि तो तिथेच एका खुर्चीवर बसून त्या मायलेकींचा संवाद संपण्याची वाट पाहत राहिला. 


दुसरीकडे ती मुलगी तिच्या आईसोबत वाद घालत होती. त्या मुलीला तिची आई बोलली, " शिवा, हे बघ आय ऍम सॉरी! मला तुला सगळ्यांसमोर रागवायचं नव्हतं पण त्या मुलापेक्षा तू मोठी आहेस. शिवाय त्या मुलाचा आज आपल्या क्लासेसमध्ये पहिलाच दिवस होता त्यामुळे त्याला सुरक्षित वाटायला हवं म्हणून मी तुला रागावलं. " 


" कम ऑन मम्मा! मला सगळं माहिती आहे. तू नेहमीच माझ्याशी असंच रुडली वागत असतेस. तुला कायम वाटतं की, या जगात जे काही चुकीचं घडतंय त्यात निव्वळ माझाच दोष आहे. " ती मुलगी तिच्या आईला म्हणाली. 


" शिवा... असं काही नाहीये! " तिची आई म्हणाली. 


" असू दे! " ती मुलगी म्हणाली. 


" आय ऍम सॉरी ना... " तिची आई म्हणाली. 


" बरं! आता तू एवढी माफी मागत आहेसच तर ठीक आहे. मी तुला माफ करते पण एका अटीवर... " ती मुलगी म्हणाली. 


" एका अटीवर? म्हणजे शिवा तू माझ्यापुढे रुसण्याचं ढोंग करत होतीस तर? " त्या मुलीची आई डोळे मोठे करून म्हणाली. 


" ते काहीही असो... तुला माफी हवी आहे ना मग माझी अट ऐकावीच लागेल. " ती मुलगी तिच्या आईला जीभ दाखवून चिडवत बोलली. 


" आई गं किती लबाड आहेस तू? पण असो... बोल काय आहे तुझी अट? " तिची आई म्हणाली. 


" ह्म्म! तुझीच मुलगी आहे म्हटल्यावर लबाड तर मी असणारंच ना! " ती मुलगी परत तिच्या आईला चिडवून बोलली. 


" आगाऊ कार्टी कुठली... " तिच्या आईने त्या मुलीचा कान पकडला. 


" अगं माझा कान... सोड की... " ती मुलगी म्हणाली. 


" ह्म्म... बरं! पण आता तुझी अट काय आहे ते सांगणार आहेस की नाही? " तिची आई म्हणाली. 


" अट एवढी काही विशेष नाही फक्त मला आज तू बिर्याणी पार्टी द्यायची, तेसुद्धा एखाद्या हॉटेलमध्ये आणि डेझर्टमध्ये मला संडे आईस्क्रीम हवं! " ती मुलगी म्हणाली पण त्या मुलीची अट ऐकून तिची आई मात्र तिच्याकडे डोळे मोठे करून एकटक पाहत राहिली. 


क्रमशः

..................................................................... 


©®

सेजल पुंजे.

२०/११/२०२२.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//