Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-१६)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-१६)

                मिटींग अगदी कमी वेळात आटोपली होती त्यामुळे आर्यनला दर्शन सोबत जास्त वेळ घालवता येणार होता, याचा आनंदही त्याला होताच. त्यामुळे तो लगेच दर्शनला पिकअप करायला डान्स क्लासेसमध्ये गेला. डान्स क्लासेसजवळ पोहोचताच आर्यनने दर्शनला कॉल केला. दर्शनने लगेच कॉल रिसिव्ह करून तो येत असल्याचे सांगितले. दर्शन येईपर्यंत आर्यन कारमध्येच बसून त्याची वाट पाहू लागला. 


लगेच काही वेळात दर्शन पार आनंदात बागडत बागडत कारमध्ये येऊन बसला. त्याला असं आनंदात बघून आर्यनला त्याच्या आनंदाचे कारण विचारल्याविना रहावणार नव्हते; म्हणून तो दर्शनला उद्देशून म्हणाला, " हे मी काय बघतोय? आज स्वारी जाम खूश दिसतेय! डान्स क्लासेस मध्ये ऍडमिशन मिळाल्याचा हा आनंद आहे की आणखी काही वेगळे निमित्त आहे या आनंदामागे हं? "


" एवढं काही विशेष नाहीये रे बाबा! ते मी असंच! " दर्शन त्याच्याच तंद्रीत बोलला. 


" ह्म्म! कुणीतरी सिक्रेट ठेवायला लागलंय हल्ली! नक्की काहीतरी गडबड असावी. " आर्यन दर्शनकडे बारीक डोळे करून पाहत बोलला. 


" उफ्फ बाबा! मी सांगतोय ना काही गडबड नाहीये. " दर्शन म्हणाला. 


" मला तर काही वेगळाच अंदाज येतोय. " आर्यन दर्शनकडे संशयाने पाहू लागला. 


" बाबा... " दर्शन म्हणाला. 


" मग तू सांगत का नाही आहेस? " आर्यनने प्रतिप्रश्न केला. 


" बरं सांगतो! " दर्शन म्हणाला. 


" गुड! " आर्यन बोलला. 


दर्शनने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, " ते ना सकाळी माझ्या शाळेत एक मुलगी ट्रान्सफर होऊन आली. तिचं नि माझं पहिल्याच भेटीत भांडण झालं? "


" तू आज भांडण केलंस आणि ते देखील एका मुलीशी? " आर्यनने लगेच दर्शनचा शब्द तोडत त्याला आश्चर्याने विचारले. 


" हो पण त्यात माझी चूक नव्हती. " दर्शन म्हणाला. 


" मग भांडण का झालं? " आर्यनने विचारले. 


" कारण त्या मुलीने प्लेग्राऊंडमधली तीच जागा ऑक्युपाय केलेली, ज्या जागेवर मी रोज बसतो. " दर्शन म्हणाला. 


" मग त्यात काय झालं? " आर्यनने विचारले. 


" ओके, मी मान्य करतो की, त्यात काही हरकत नव्हती! पण नंतर मी तिला माझ्या जागेवरून उठायला सांगितलं आणि तिला दुसरीकडे बसायला सांगितलं पण ती ऐकेना... ती माझ्याहून थोडी मोठी आहे ना... त्यामुळे ती मला कंट्रोल करू पाहत होती; पण मीही हार मानली नाही. मी तिला सतत माझ्या जागेवरून उठायला सांगत राहिलो पण त्या भानगडीत अख्खी सुट्टी वेस्ट झाली. सुट्टी संपल्यावर ती तिच्या वर्गात जाताना मला उंदीर सुद्धा बोलली होती. त्यामुळे माझ्या वर्गातील सगळे मुलं माझ्यावर हसायला लागले आणि मला उंदीर अशी हाक मारून चिडवू लागले; त्यामुळे माझा मुड थोडा ऑफ झाला होता. " दर्शन उत्तरला. 


" अच्छा या कारणामुळेच सावित्री मावशीने तुला मघाशी मुशक म्हटले होते तेव्हा तू गाल फुगवून घेतले होते तर... " आर्यनने दोन घटनांमध्ये संदर्भ जोडला. 


" हो! " दर्शन उदास स्वरात म्हणाला. 


" बरं, असो! पण सकाळी झालेल्या भांडणाचा आणि तुझ्या आताच्या आनंदाचा काय संबंध? हे बघ तू मला परत गंडवत तर नाहीयेस ना... मला दुसऱ्या गोष्टीत गुंतवून तुझ्या आनंदाचं खरं कारण लपवण्याचा तर प्रयत्न करत नाहीयेस ना? दर्शन खरं खरं सांग बघू... " आर्यन म्हणाला. 


" संबंध आहे रे बाबा! " दर्शन म्हणाला. 


" आणि तो कसा? " आर्यनने गोंधळून विचारले. 


" सांगतोय ना! जरा धीर बाळग! " दर्शन म्हणाला. 


" बरं! " आर्यन गालातल्या गालात हसून बोलला. 


" हं! तर सकाळी शाळेत जे झालं ते मी बऱ्यापैकी विसरलो होतो, या डान्स क्लासेस मध्ये ऍडमिशन मिळाल्याने; पण तीच मुलगी मला या क्लासेसमध्येही दिसली. मी ही तिला ओळखलं होतं आणि तिनेही! ती मला कदाचित सगळ्यांपुढे परत एकदा उंदीर बोलणार होती पण डान्स टिचर जेव्हा आम्हाला डान्स वॉर्म अप करायला सांगत होत्या, तेव्हा मी त्या डान्स टिचरकडे त्या मुलीची खोटी तक्रार केली की, ती मुलगी वॉर्म अप दरम्यान मला धक्काबुक्की करतेय. त्या मुलीला त्या डान्स टिचरने खूप रागावले. 


                ओरडा मिळताच ती मुलगी मला सगळ्यांसमोर परत उंदीर बोलून चिडवणार होती पण त्याआधीच मी डान्स टिचरकडे तक्रार केली की, ती मुलगी मला घाबरवतेय. त्यामुळे त्या मॅम तिच्यावर आणखी चिडल्या कारण ती मुलगी त्या डान्स टिचरचीच मुलगी आहे. त्या मॅम त्यांच्या मुलीला रागवत होत्या ना... अगदी त्याचवेळेस तू मला कॉल केलास आणि त्या मुलीचा उतरलेला चेहरा पाहून मला जाम आनंद झाला. म्हणून मी तिला जीभ दाखवून अगदी बागडत बागडत कारमध्ये येऊन बसलो. " दर्शन हसून बोलला पण त्याचे स्पष्टीकरण ऐकून घेतल्यावर आर्यन मात्र गप्प झाला होता. त्याला बरंच काही बोलायचं होतं पण तरीही तो बराच वेळ काहीही न बोलता दर्शनकडे एकटक पाहत राहिला अन् आर्यनला शांत बसलेले पाहून दर्शनचा आनंद लगेच मावळला. 


क्रमशः

........................................................... 


©®

सेजल पुंजे 

१९/११/२०२२.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//