गहिवरलेले मन थाऱ्यावर आणल्यानंतर आर्यनने दर्शनकडे मोर्चा वळवला. तो दर्शनचा लाड करत म्हणाला, " मी बुद्धू आहे पण माझं बाळ अगदीच हुशार आहे. हो ना! "
" हो! कारण मी अगदी आईवर गेलोय ना म्हणून माझ्या बाबाचा हा निर्बुद्धपणा माझ्या व्यक्तिमत्त्वात भिनला नाही! " दर्शन आर्यनची छेड काढत म्हणाला अन् आर्यनला जीभ दाखवून चिडवू लागला.
" हो रे आईच्या लाडक्या! " आर्यन हसून म्हणाला.
" मग आहेच मी! " दर्शनने परत जीभ दाखवली.
" हो का? पुरे हं आई पुराण! " आर्यन नाटकी दम देत म्हणाला.
" बाबा काहीतरी जळत असल्यासारखा वास येतोय रे! " दर्शन परत आर्यनची छेड काढत म्हणाला.
" हो का? थांब तुला सांगतोच! " असं बोलून आर्यन त्याच्या मांडीवर बसून असलेल्या दर्शनला गुदगुली करू लागला.
दर्शन फार खळखळून हसत होता अन् त्याला असे हसताना पाहून आर्यन मनोमन सुखावत होता. थोड्या वेळाने आर्यनसोबत मजामस्करी आटोपताच त्याच्या मांडीवरून दर्शन उठला व तो व्यायाम करायला बागेत निघून गेला. त्यानंतर दर्शन खोलीबाहेर जाताच आर्यन देखील त्याचं आवरायला वॉशरुममध्ये निघून गेला. फ्रेश होताच तो देखील बागेत गेला अन् दर्शन सोबत व्यायाम करू लागला. दोघे बापलेक अर्धा ते पाऊण तास व्यायाम करत होते. त्यानंतर दोघेही अंघोळ करायला निघून गेले. दर्शनची अंघोळ झाल्यावर तो काही वेळ टिव्हीवर कार्टून बघत बसला होता. तर आर्यन त्याची अंघोळ आटोपून लगेच किचनमध्ये शिरला अन् त्या दोघांसाठी नाश्त्याचा बंदोबस्त करू लागला.
नाश्ता वगैरे आटोपून झाल्यानंतर आर्यन ऑफिसला जाण्यासाठी व दर्शन शाळेत जाण्यासाठी असे ते दोघेही सज्ज झाले. खोलीत जाऊन आपापली तयारी करू लागले. दोघांचंही आवरून होताच ते कार घेऊन घराबाहेर पडले. आर्यनने आधी दर्शनला शाळेत सोडले त्यानंतर तो त्याच्या ऑफिसला निघून गेला.
गेल्या आठ वर्षात आर्यनने बरेच चढउतार पाहिले होते. तो ज्या ऑफिसमध्ये काम करत होता त्या कंपनीसाठी त्याने त्याची भूमिका चोख वठवली होती आणि म्हणूनच ज्या कंपनीत निव्वळ एक इंप्लॉई म्हणून जॉईन केलेला आर्यन आज त्याच कंपनीचा एक उत्कृष्ट मॅनेजिंग डायरेक्टर होता. तो त्याच्या कामात फार निपुण झाला होता त्यामुळे एक वेगळाच ऑरा त्याने मेंटेन केला होता. कदाचित म्हणूनच त्याच्या ऑफिसमधील इतर इंम्प्लाॅईंसाठी तो एक उत्कृष्ट उदाहरण होता. प्रत्येक जण त्याला आदर्श मानायचे अन् त्याने देखील त्याच्या कर्तृत्वाने त्याची प्रतिमा टिकवून ठेवली होती.
अर्ध्या तासात ऑफिसला पोहोचला. कार पार्किंग लॉटमध्ये पार्क करून तो ऑफिसमध्ये शिरला. कंपनीच्या एन्ट्रन्स पॅसेजमध्ये त्याने प्रवेश करताच ऑफिसमधले सगळेच इंम्प्लाॅई त्याच्या आदराखातर हातातील काम बाजूला सारून त्यांच्या जागेवरून उठून उभे राहिले व त्याला गुड मॉर्निंग ग्रीट करू लागले. त्यानेही प्रतिसाद देत गुड मॉर्निंग ग्रीट केले व सगळ्यांना आपापल्या जागेवर बसून आपआपले काम करण्याचा नजरेनेच इशारा करून तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला.
केबिनमध्ये येताच त्याने त्याचा कोट काढून त्याच्या खुर्चीवर ठेवला आणि टेबल वरील फाईल हातात घेत तो त्याच्या कामात व्यग्र झाला. त्याने नेहमीप्रमाणे दुपारचे दोन वाजेपर्यंत बऱ्याच ऑनलाईन आणि ऑफलाईन मिटींग अटेंड केल्या. त्यानंतर तो दर्शनला शाळेतून पिकअप करण्यासाठी ऑफिसबाहेर पडला. तो शाळेत गेला. त्याने दर्शनला पिकअप केले त्यानंतर तो त्याला घेऊन त्याच्या घरी गेला.
घरी जाताच त्याला सावित्री मावशी अंगणात कपडे वाळत घालताना दिसल्या. सावित्री मावशी मोलकरीण होत्या. त्या आर्यनच्या गैरहजेरीत घर सांभाळायच्या. त्यांच्याकडे जेवणाची तसेच इतर घर कामाची जबाबदारी आर्यनने सोपवली होती. म्हणून घरी पोहोचताच तो सावित्री मावशीला उद्देशून म्हणाला, " मावशी, आज जेवायला काय स्पेशल आहे? "
" अरे आर्यन बाळा आलास तू? " सावित्री मावशी म्हणाल्या.
" ह्म्म! " आर्यनने मंद हसून हुंकार भरला.
" ह्म्म काय ह्म्म बाबा? " दर्शन आर्यनकडे डोळे बारीक करून बोलला. नंतर त्याने त्याचा मोर्चा सावित्री मावशीकडे वळवला. तो त्यांना उद्देशून म्हणाला, " आणि काय गं सावित्री आजी? फक्त एकटा बाबाच दिसतो होय तुला? मी ही आलोय ना बाबा सोबत? मग तू मला का नाही ग्रीट केलंस? " दर्शनने सावित्री मावशीकडे तक्रार केली.
" अरे मुशक तू तुझ्या बाबाच्या मागे लपून होतास ना मग मला कसं कळणार तू आलाय हे? " सावित्री मावशी म्हणाल्या.
" आजी... तू मला उंदराचं नाव नको ना देऊस... " दर्शनने परत तक्रारीचा सूर ओढला.
" लाडाने म्हणते रे मी! अन् वेड्या मुशक तर गणपती बाप्पाचं वाहन आहे ना! " सावित्री मावशी म्हणाल्या.
" हो मला माहीत आहे! " दर्शन तोंड पाडून म्हणाला.
" मग हे माहिती असूनही का नाही आवडत तुला ते नाव? " सावित्री मावशीने त्याला प्रश्न विचारला पण त्याने मौन साधले अन् त्याला गप्प झालेले पाहून आर्यन आणि सावित्री मावशी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.
क्रमशः
.....................................................................
©®
सेजल पुंजे.
१६/११/२०२२.