वाट हळवी वेचताना... (भाग-१२)

हळव्या वळणाची बापलेकाच्या अखंड नात्याची आगळीवेगळी कथामालिका...

वर्तमान- 

                सर्व भूतकाळ आर्यनच्या डोळ्यापुढून भरभर निघून गेला. त्याला नुकताच झोप लागली होती पण एव्हाना पहाट झाली होती अन् नेहमीप्रमाणे दररोज शाळेत जावे लागत असल्याने रात्री लवकर झोपणाऱ्या दर्शनला पहाटेच जाग आली. त्याने डोळे किलकिले करून आधी आळस दूर केला. त्यानंतर त्याने आजुबाजूला नजर फिरवली तर त्याला आर्यन नेहमीच्या सवयीप्रमाणे टेबलवर डोकं ठेवून झोपून असल्याचं दिसलं. त्याने आर्यनकडे पाहून मंद हसून नकारार्थी मान हलवली. नंतर तो बेडवरून खाली उतरला व त्याने एक चादर हातात घेतली व तो आर्यनजवळ गेला. त्याने ती चादर पद्धतशीरपणे आर्यनच्या अंगावर पांघरली. त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला. ब्रश वगैरे आटोपून दर्शन बाहेर आला तर त्याला आर्यन झोपेत लटलट घाबरताना दिसला. 


आर्यनला पहिल्यांदाच असे पाहून दर्शनला काळजी वाटली. त्याला नव्हते ठाऊक की, त्याचा बाबा भूतकाळाचे सारे क्षण आठवून झोपेत थरथरत होता. म्हणून आर्यनला कसे सांभाळावे, हेच लहानग्या दर्शनला कळत नव्हते पण तेवढ्यात त्याला काहीतरी सुचले. म्हणून त्याने आर्यनच्या पाठीवरून सावकाश हात फिरवायला सुरुवात केली अन् तो त्याला म्हणू लागला, " बाबा, शांत हो! तू फक्त वाईट स्वप्न बघतोय म्हणून एवढा हायपर नको होऊ! हे बघ, सगळं ठीक आहे. मी ही इथेच आहे, तू ही इथेच आहे आणि आई तर आपल्या सोबत कायमच असते, तुला ठाऊक आहे ना! म्हणून थोडं रिलॅक्स कर! आय लव्ह यू बाबा आणि तुला माहीत आहे, आई अल्सो लव्हस् यू अलॉट! "


                हळूहळू आर्यन शांत झाला होता अन् त्याला दर्शनच्या आवाजाने जाग येऊ लागली. तो डोळे मिटून दर्शनचे शब्द ऐकत होता अन् त्याचे शब्द ऐकून आर्यन अगदी आश्चर्यचकित झाला होता. त्याउलट दर्शन मात्र अगदी हळूवार आर्यनच्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरवत होता. थोड्या वेळाने आर्यनने त्याला जाग येताच गालातल्या गालात मंद हसत दर्शनचा हात त्याच्या हातात घेतला आणि त्याने त्याला मांडीवर बसवून घेतले. आर्यनला जाग आल्याचे दर्शनला कळताच तो आर्यनकडे पाहून गोड हसला अन् त्याचं हसू पाहून आर्यनला दर्शिकाची आठवण आली; पण त्यावेळी त्याने आठवणीत न गुंतणे योग्य मानले व तो देखील दर्शनच्या केसात हात फिरवून मंद हसला. 


आर्यन जागा झाल्याचे लक्षात येताच दर्शन त्याला म्हणाला, " गुड मॉर्निंग बाबा, झोप नीट झाली ना! "


" गुड मॉर्निंग बाळा आणि हो माझी झोप नीट झाली. " आर्यनने प्रतिसाद दिला. 


" बरं! मग तू तुझं आवरून घे! मी तोपर्यंत आपल्या बागेत थोडी एक्सरसाइज करतो. " दर्शन म्हणाला. 


" ते सगळं ठीक आहे पण दोन मिनिट थांबतोस का? मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय! " आर्यन म्हणाला. 


" काय बाबा? " दर्शन बोलला. 


" दर्शू मला सांग, मी झोपेत घाबरून पुटपुटत असताना तू माझ्या पाठीवरून व डोक्यावरून हात फिरवून काय बडबडत होतास? " आर्यनने विचारले. 


" अच्छा ते होय! अरे बाबा, तू झोपेत ना थोडासा पॅनिक झाला होतास कदाचित त्यामुळे तुला ना जरा घाम येत होता. तसेच तू थरथरत सुद्धा होतास तर मला वाटलं की, कदाचित तुलाही झोपेत माझ्यासारखंच वाईट स्वप्न दिसलं असावं. त्यामुळे मी तुला बरं वाटावं म्हणून तुला चीअर अप करत होतो की, सगळं ठीक आहे. तू काळजी नको करू, हे बोलत होतो मी! " दर्शनने आर्यनला सविस्तर सांगितले. 


" वाह रे माझ्या लाडोबा! किती हुशार आहे माझा दर्शू! पण काय रे हे असं बोलायला तुला कसं सुचलं? " आर्यन दर्शनचे गालगुच्चे घेत बोलला. 


" त्यात सुचायचं काय बाबा? तू पण ना बुद्धूच आहेस! " दर्शन म्हणाला. 


त्यानंतर दर्शनने आर्यनकडे पाहून स्वतःच्याच डोक्यावर हात मारला. दुसरीकडे त्याला असे करताना पाहून आर्यन गालातल्या गालात खुदकन हसला पण उगाच केविलवाणा चेहरा करत म्हणाला, " का? मी काय केलं? "


" मी काय केलं म्हणे! बाबा, जेव्हा मला झोपेत वाईट स्वप्न पडतात तेव्हा तू नाही का मला सांभाळून घेत? त्यावेळी तू सुद्धा असाच बोलत असतो ना ज्यामुळे माझी भीती दूर पळून जाईल, तर तीच थेअरी मी तुझ्यावर अप्लाय केली ना... आणि दुसरं असं की, मी अर्धवट झोपेत असताना तू मला पॅनिक फेझमधून बाहेर काढत असतोस कायम; त्यामुळे त्या साखर झोपेत तू जे जे शब्द उच्चारतोस ते मला बऱ्याच अंशी ऐकू येत असतात. म्हणून ते शब्द मला मुखपाठ झालेले आहेत. तर म्हणून आज जेव्हा मी तुला झोपेत थरथरताना पाहिलं तर तुझ्या सारखेच मला सुद्धा तुला सांभाळता आले. " दर्शनने स्पष्टीकरण दिले पण त्याचे शब्द ऐकून आर्यनला दर्शनचं फार कौतुक वाटलं. तो पार भारावून गेला होता अन् त्यामुळे तो कौतुकाने दर्शनकडे पाहतच राहिला. 


क्रमशः

........................................................... 

©®

सेजल पुंजे. 

१५/११/२०२२.

🎭 Series Post

View all