वाट हळवी वेचताना... (भाग -११)

बापलेकाच्या अनोख्या प्रवासाची कथामालिका!

आर्यनने दर्शिकाला आलिंगन देताच दर्शिका त्याच्या कानात म्हणाली, " आरू, आय लव्ह यू फॉरेव्हर... टिल द एंड ऍंड आफ्टर द डेथ अल्सो! काळजी घे माझ्या राजा! " दर्शिका एवढंच बोलली अन् तिने अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे आर्यनलाही तिच्या हृदयाची स्पंदने न जाणवल्याने त्याला त्या अघटित घटनेची चाहूल लागली. ऐन तारुण्यात आर्यनचा संसार उद्ध्वस्त झाला होता, त्याला वैधव्य प्राप्त झाले होते. फक्त सत्तावीस वय वर्ष असलेला आर्यन क्षणात विधूर झाला होता. 


                त्याला दर्शिकाच्या निधनाचे वास्तव स्विकारताच येईना म्हणून त्याने दर्शिकाला मिठीतून बाहेर काढून तिचे दंड मजबूत पकडले पण तिचे दोन्ही हात गळून पडले अन् आर्यनला सत्याची जाणीव झाली. त्याला जबर धक्का बसला. त्याने तिला घट्ट मिठी मारली अन् अक्षरशः हंबरडा फोडला. क्षणार्धात पाळण्यातले बाळंही रडू लागलं होतं जणू त्यालाही त्याची जन्मदात्री आई या जगात हयात नसल्याची जाणीव झाली असावी. ईसीजी ग्राफची हालचाल स्थगित झाल्याचे डॉक्टर व अक्षय आणि निमिषच्या लक्षात आले अन् अख्खे वातावरण भावूक झाले. 


" दर्शू, उठ ना गं! प्लीज आता अशी मस्करी नको ना करू! राणी, मला एकटं सोडून नको जाऊ! दर्शिका, उठ ना! आपलं बाळंही रडतंय गं खूप... तू फक्त एकदाच त्याला कुशीत घे ना... " आर्यन दर्शिकाच्या गळ्यात पडून हुंदके देत बोलत होता. 


" आर्यन, सांभाळ स्वतःला! " निमिष आणि अक्षय आर्यन जवळ जाऊन त्याला आधार देत बोलले. 


" मिस्टर आर्यन, बी स्ट्रॉंग! तुम्हाला तुमच्या बाळासाठी खंबीर व्हावं लागेल. प्लीज सांभाळा स्वतःला! " डॉक्टर देखील आर्यनचे सांत्वन करत बोलले. 


                एकीकडे आर्यनला दर्शिकाच्या निधनाचा जबरदस्त धक्का पोहोचला होता. म्हणून तो फक्त दर्शिकाला घट्ट मिठीत आवळून, डोळे घट्ट मिटून फक्त नि फक्त रडत होता अन् त्याचा आक्रोश व्यक्त करत होता. दुसरीकडे प्रत्येकजण त्यावेळी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होता, त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होता; पण त्याच्या कानात कुणाचाच आवाज शिरत नव्हता. तेवढ्यात बाळ आणखी रडू लागलं म्हणून अक्षयने त्या बाळाला हातात उचलून घेतले आणि त्याने ते बाळ आर्यन पुढे धरले. का, कसे कुणास ठाऊक पण आर्यनच्या कानात बाळाच्या रडण्याचा आवाज पुसटसा का होईना शिरू लागला अन् तो भानावर येत गेला. 


                बाळाच्या रडण्याच्या आवाजाने हळूहळू त्याच्या भुवयांची हालचाल सुरू झाली अन् त्याने त्याचे डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला त्याच्या डोळ्यापुढे त्याचं बाळ दिसलं. त्यात त्याला दर्शिकाची छबी दिसली आणि साहाजिकच हळूहळू त्याची दर्शिकावरची पकड सैल होऊ लागली अन् त्याने दर्शिकाला मिठीतून बाहेर काढून सावकाश बेडवर ठेवले व तात्काळ त्याने त्याच्या बाळाला स्वतःच्या कुशीत घेतले आणि अनायासे तो बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.


                 डोळे त्याचे काठोकाठ अश्रूने डबडबलेले होते पण त्यावेळी त्याने बाळाकरीता त्याच्या भावनांवर संयम साधला आणि कदाचित तेव्हापासूनच सुरू झाला त्याच्या जीवनाचा नवा अध्याय! बाळाला कुशीत घेताच त्याला दर्शिकाचा भास झाला आणि त्याक्षणीच त्याने मनात ठाणले की, आता जगायचं तर फक्त त्या बाळासाठीच! म्हणूनच त्याने स्वतःला कठोर बनवून घेतले. स्वतःच्या भावनांवर संयम ठेवायला शिकून घेतले. आपल्या बाळासाठी त्याने खंबीर होण्याचे धाडस केले अन् त्यासाठी त्याने त्याच्यातला हळवा आरू जणू मनातच कोंडून घेतला आणि लेवून घेतला निर्विकार स्वभावाचा, खंबीर असण्याचा मुखवटा! 


                 दर्शिकाच्या निधनानंतर आर्यनने राजीनामा दिला कारण त्याने आर्मी फक्त दर्शिकाच्या इच्छेखातर जॉईन केली होती. शिवाय लष्करी कर्तव्य दर्शिकाची उणीव त्याच्या मनाला कायम भासवून देईल अन् त्यामुळे तो स्वतः योग्य निर्णय घेण्यात असमर्थ ठरेल, अशी भीतीही त्याला मनोमन वाटायची. म्हणून त्याने नवी सुरुवात करण्याचे ठरविले. 


                 जुन्या आठवणी नक्कीच काळजाच्या जवळ होत्या पण दर्शिकाच्या निधनाची घटना हृदयद्रावक असल्याचे सत्य नाकारता येणारे नव्हतेच. म्हणून दर्शिकाची अंत्यविधी पार पडताच आर्यनने कर्मभूमी सोडून त्याची जन्मभूमी गाठली. जिथे त्याने बालपण जगलं होतं. पुढचा प्रवास त्याला नक्कीच एकट्याने चालायचा होता पण तरीही बाळाला कुशीत घेऊन अन् दर्शिकाच्या आठवणींची शिदोरी सोबतीला घेऊन त्याने पुढची पायवाट चालण्याचे ठरवले. त्याच्या बाळाला सुरक्षित वातावरणात वाढविण्याचे त्याने ठरविले अन् त्यासाठी त्याने सर्वसामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगण्याला प्राधान्य दिले. 


                 त्याने त्याच्या अर्हतेनुसार एका कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल केला अन् सुदैवाने त्याला त्याच्या पात्रतेनुसार नोकरी सुद्धा मिळाली. नोकरी मिळताच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली त्याच्या पुढच्या प्रवासाची! थोडक्यात, त्याने बाळाचे सुयोग्य संगोपन करण्याचा मनोमन निश्चय केला अन् निश्चय पूर्तीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. पाहता पाहता त्याने नोकरीत जम बसवला अन् त्याला बढती मिळत गेली. घर, बाळ आणि नोकरी या तिन्ही जबाबदाऱ्या तो काटेकोरपणे पार पाडू लागला. पाहता पाहता दिवस अन् महिने सरत गेले आणि आठ वर्षे कसे उलटून गेले कळले देखील नाही. 


भूतकाळ समाप्त


क्रमशः

.............................................................. 

©®

सेजल पुंजे. 

१३/११/२०२२.
🎭 Series Post

View all