वाट हळवी वेचताना... (भाग-१०)

बापलेकाच्या अखंड नात्याची आगळीवेगळी कथामालिका!

                दर्शिकाला रडताना पाहून आर्यनचा धीर आणखीच खचत होता; पण तिचं मन डायव्हर्ट करण्यासाठी तो उगाच तिच्याकडे तक्रार करू लागला. तो तिला म्हणाला, " बाळाला कुशीत घेताच बाळाच्या बाबाचा बाळाच्या आईला किती सहज विसर पडला ना... बाबावर आई प्रेमच करत नाही हेच सिद्ध होतंय जणू! " त्याची तक्रार ऐकून दर्शिका रडता रडता मंद हसली अन् तिने आर्यनला मिठीत घेण्याचा इशारा केला. आर्यननेही लगेच त्याचे अश्रू पुसले अन् दर्शिकाला व बाळाला मिठीत घेतलं. 


                 काही वेळ ते तिघेही एकमेकांना बिलगून होते पण लगेच दर्शिकाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. आर्यनने लगेच त्याची मिठी सैल करून बाळाला पाळण्यात ठेवले अन् दर्शिकाला बेडवर झोपवले व डॉक्टरांना हाक मारली. डॉक्टर सुद्धा लगेच तिच्याजवळ धावून गेले. त्यांनी आर्यनला बाजूला थांबायला सांगितले आणि ते नर्स व कम्पाउंडरला एकाचवेळी बरेच आदेश देऊ लागले. डॉक्टरांनी दर्शिकाला ऑक्सिजन मास्क लावला. तिला ऑक्सिजन मास्क लावलेले असतानाही श्वास घ्यायला त्रास होत होता. 


                एकीकडे परिस्थिती बिकट होत होती. कुणालाच काही अंदाज लागेना. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्ट दिसून येत होता. दुसरीकडे दर्शिकाच्या काळजीने आर्यनही पॅनिक झाला होता. तो लागोपाठ डॉक्टरांना विचारपूस करत होता. 


तो डॉक्टरांना विचारू लागला, " डॉक्टर काय झालं? दर्शिकाला एकाएकी काय होतंय? सांगा ना... डॉक्टर, ती ठीक आहे ना? "


" मिस्टर आर्यन प्लीज स्वतःच्या भावनांवर संयम साधा. आम्ही आमच्या परीने शंभर टक्के प्रयत्न करतोय. म्हणून प्लीज तुम्ही देखील को-ऑपरेट करा. " डॉक्टर एवढेच बोलले अन् परत दर्शिकाकडे वळले. 


                डॉक्टरांचे शब्द ऐकून आर्यन क्षणात ढासळला होता पण अक्षय आणि निमिष त्याला धीर देत होते; कारण सध्या त्याला खंबीर राहणे गरजेचे होते. काही वेळाने डॉक्टर दर्शिकाची तपासणी करून बाजुला झाले; कारण एव्हाना दर्शिकाला बऱ्यापैकी श्वास घेता येत होता. तसेच तिचा ईसीजी ग्राफ ही संथ झाला होता. तेवढ्यात आर्यनचे डॉक्टरांकडे लक्ष गेले. ते दर्शिकाला तपासून थोड्या अंतरावर उभे असल्याचे दिसताच आर्यन डॉक्टरांजवळ गेला. 


तो डॉक्टरांना म्हणाला, " डॉक्टर, दर्शिका... " 


आर्यन पुढे आणखी काही विचारणार त्याआधीच डॉक्टर त्याचा शब्द तोडत बोलले, " मिस्टर आर्यन, आम्हाला तुम्हाला कळवताना खूप खंत वाटतेय की, मिसेस आर्यनची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यांच्याकडे फक्त थोडा वेळ उरलाय; म्हणून आता त्यांच्या अंतिम क्षणी तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. "


" काय? नाही! नाही, डॉक्टर... मला माहीत आहे तुम्ही माझी दिशाभूल करत आहात. तुम्ही मस्करी करत आहात ना? हं! माझी दर्शिका ठीक आहे ना? जाऊ द्या, तुम्ही मस्करीच करत आहात मी दर्शिकाशी बोलतो. " आर्यन म्हणाला. त्याला डॉक्टरांच्या शब्दांवर विश्वासच होईना म्हणून तो पळतच दर्शिकाजवळ गेला. 


तो रडतच दर्शिकाचा हात हातात घेऊन म्हणाला, " दर्शू... राणी, ऐक ना! हे डॉक्टर थापा मारत आहेत ना? तू सांग ना खरंखुरं! हे बघ, तू उठून बस आणि सांग त्यांना सगळंच ते देखील अगदी बजावून! सांगशील ना? " 


" आरू... " दर्शिका अर्धवटच बोलली. 


" हो राणी मी आहे इथेच! मला माहीत आहे, तुला काहीही होणार नाहीये कारण मी तुला काही होऊच देणार नाही. हे डॉक्टर काहीही बोलतात. त्यांच्याकडे तू लक्ष नको देऊस. तुला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. ना तो देव ना हे डॉक्टर... " आर्यन बोलला. 


" आरू... प्लीज ऐक माझं! " दर्शिकाला एव्हाना बोलताना फार त्रास होऊ लागला होता पण तरीही ती बोलत राहिली. ती आर्यनला म्हणाली, " आरू, डॉक्टर जे बोलत आहेत ते खरं आहे पण तू काळजी नको करू! मी कायम तुझ्यासोबत आहे आणि कायम राहणार... आय लव्ह यू सो मच आरू! फक्त तू... खचून जाऊ नकोस. खंबीर हो कारण आपल्या बाळाला तुझी गरज आहे. त्याला माझी उणीव भासणार नाही एवढं प्रेम तू त्याच्यावर कर! काळजी घेशील आपल्या अंशाची, आपल्या बाळाची आणि माझ्या आरूची सुद्धा! " 


" दर्शिका, राणी... तू असं नको ना बोलू. प्लीज, बी विथ मी! आय नीड यू द मोस्ट! आय लव्ह यू अलॉट दर्शू, प्लीज डोंट गो! स्टे विथ मी ऍंड होल्ड माय हॅंड टाईट! " आर्यन रडत बोलत होता. 


" आरू... " दर्शिकाने आर्यनचा हात हातात घेतला. तिचेही डोळे पाणावले होते, कंठ दाटून आला होता पण तरीही त्याच्या डोळ्यात डोळे घालून ती त्याला बोलली, " आरू, जस्ट हग मी टाईट! " तिचे शब्द त्याच्या कानी पडताच त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिनेदेखील तिच्या हातांचा विळखा त्याच्या पोटाभोवती जखडून घेतला. 


क्रमशः

.............................................................. 

©®

सेजल पुंजे. 

१०/११/२०२२.



🎭 Series Post

View all