वाट हळवी वेचताना... (भाग-०९)

वाट हळवी वेचताना... एक कथामालिका बापलेकाची... अनोख्या प्रवासाची...

                एकीकडे दर्शिका तिची बाजू मांडत होती. आर्यनची समजूत काढत होती अन् दुसरीकडे तिच्या एकुण एक शब्दाने आर्यनच्या हृदयात कळ जात होती. त्या दोघांनाही असे भावनाविवश पाहून तिथे उपस्थित सगळेच भावूक झाले होते. 

     

                दर्शिकाला रडताना पाहून आर्यन आणखी भावूक झाला. त्याने त्याच्या थरथरत्या हाताने तिचे अश्रू पुसले अन् तिच्या कपाळावर ओठ टेकवले. अगदी त्याचप्रमाणे दर्शिकाने सुद्धा हाताला सलाईन लागून असतानाही, तिच्या हातांना थरकाप सुटलेला असतानाही तिने आर्यनचे अश्रू पुसले. 


त्यानंतर दर्शिकाने आर्यनचा चेहरा तिच्या ओंजळीत घेतला अन् ती त्याला म्हणाली, " आरू, मला माहीत आहे की, आपल्या बाळाचा विचार करताना मी तुला कमी प्राधान्य दिलं; पण आरू खरंच नाईलाज होता माझा... राजा, प्लीज माफ करशील ना मला! " 


" दर्शू... " एवढेच बोलून आर्यनला रडू फुटले. त्याला पुढे काही बोलताच येईना. 


                 वातावरणाचा अंदाज घेत अक्षय आणि निमिष डॉक्टरांना घेऊन बाहेर गेले आणि त्यांच्याशी दर्शिकाच्या स्थितीबद्दल विचारपूस करू लागले. 


" डॉक्टर काहीच उपाय नाहीये का? दर्शिकाच्या गर्भाशयात असलेल्या ट्युमर्स इमरजन्सी ऑपरेशनद्वारे काढता येणे शक्य नाहीये का? तुम्ही बेस्ट डॉक्टरांना बोलावून घ्या. होईल तेवढा खर्च करायला आम्ही तयार आहोत डॉक्टर; पण अपेक्षा फक्त एवढीच आहे की, दर्शिका बरी व्हावी. " अक्षय म्हणाला. 


" मिस्टर अक्षय वानखेडे, आम्हांलाही खर्चाची काळजी नाहीये. खर्चापेक्षा आम्हाला आमचा रुग्ण महत्त्वाचा आहे. " डॉक्टर म्हणाले. 


" डॉक्टर आर्यनला दर्शिकाशिवाय कुणीच नाही. त्या दोघांना एकमेकांचाच आधार आहे. तिच्याविना त्यांचं बाळ तर पोरकं होईलच पण तिच्याविना आर्यनही पोरका होईल. " निमिष बोलला. 


" मला सगळं कळतंय मिस्टर निमिष गोडसे पण खरंच खूप वेळ झालाय. मिसेस आर्यनची केस हाताबाहेर गेलीय. प्रसूतीदरम्यान त्यांच्या गर्भपिशवीवर बराच ताण निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांच्या गर्भाशयात गाठींमुळे इन्फेक्शन पसरले आहे. खरं सांगायचं तर, मिसेस आर्यनकडे फक्त थोडा वेळ वाचला आहे. " डॉक्टर म्हणाले. 


                डॉक्टरांचे वाक्य ऐकून अक्षय आणि निमिष सुद्धा थक्क झाले. त्यांनाही रडू कोसळले. ते दोघेही आर्यन आणि दर्शिकाचे चांगले मित्र होते; त्यामुळे आर्यन आणि दर्शिकाची अवस्था पाहून ते देखील अक्षरशः ब्लॅंक झाले होते. डॉक्टरांशी बोलून झाल्यावर अक्षय आणि निमिष परत आर्यन आणि दर्शिकाजवळ आले. ते दोघेही उगाच चेहरा नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून आर्यन आणखी खचणार नाही. दर्शिकाच्या बेडजवळ डॉक्टर येताच आर्यनने सुद्धा दर्शिकाच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांना आशेने विचारले. डॉक्टर आर्यनला स्पष्ट सांगणार होते पण अक्षय आणि निमिषने त्यांना नजरेनेच वास्तव न सांगण्याचा इशारा केला. नाईलाजाने डॉक्टर खोटं बोलले. 


डॉक्टरांनी खोटा दिलासा दिल्याने सुद्धा आर्यनला हायसे वाटले होते. तो आनंदाने दर्शिकाला म्हणाला, " हे राणी, ऐकलंस ना! डॉक्टर बोलत आहेत की, तुझ्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते. अर्थात तुला काहीही होणार नाहीये! " 


" राजा, वास्तव आणखी किती वेळ नाकारशील? आणि तू लाख नाकारलंस तरी सत्य बदलणार नाहीये ना! मला माहीत आहे की, तू सध्या कोणत्या फेझमध्ये आहेस तरीसुद्धा वास्तवापासून पळता नाही येणार राजा! डॉक्टरांनी मला सगळ्या परिणामांची माहिती आधीच दिली होती रे! सध्या तुला डॉक्टरांचा खोटा दिलासा आवडेल पण नंतर हाच दिलासा तुला कित्येक पटीने छळेल, याची कल्पना तुला नाहीये रे राजा! आरू, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे म्हणून तुला आपल्या प्रेमाचं प्रतीक सोपवत आहे. मला माहीत आहे की, माझ्याकडे फक्त थोडा वेळ आहे म्हणून हा वेळ मला तुझ्यासोबत जगायचा आहे. खोट्या कल्पना विश्वात रमून नव्हे तर वास्तविकतेशी गळाभेट करून! " दर्शिका बोलत होती अन् तिचा प्रत्येक शब्द आर्यन ऐकत होता. 


                 दर्शिका गप्प बसताच आर्यनने तिला मिठीत घेतले. बराच वेळ दोघेही मिठीत होते तेवढ्यात त्यांचं बाळ रडू लागलं. बाळाच्या आवाजाने दोघांचीही तंद्री भंगली अन् नजर पाळण्याकडे गेली. दोघेही पाणावलेल्या डोळ्यांनी बाळाकडे पाहत होते. 


" बघ, आपलं बाळ माझ्याकडे तक्रार करतंय की, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त त्याच्या बाबाची काळजी करतेय. " दर्शिका आर्यनला पाहून बोलली अन् पाळण्यातून बाळ कुशीत घ्यायला सरसावली पण तिच्या शरीरात फारसे त्राण नव्हते; म्हणून आर्यननेच पाळण्यातील बाळ सावकाश उचलून दर्शिकाच्या हातात दिलं. 


                 बाळाला हातात घेताच दर्शिकाने त्याला तिच्या कुशीत लपवून घेतलं. दर्शिका त्या बाळावर अफाट माया करत होती, त्याचा पापा घेत होती; कारण तिला ठाऊक होतं तो क्षण ना तिच्या आयुष्यात येणार होता ना त्या बाळाच्या नशिबात परत कधी उगवणार होता. बाळाचा लाड करताना तिचे डोळे आणखीच पाणावले होते. खरंतर त्यावेळी तो क्षण तिथेच थांबावा अन् तिने तिच्या बाळावर तिचा जीव ओवाळून टाकावा, एवढीच काय ती अपेक्षा होती तिची; पण ती देखील अपूर्णच राहणार होती. हे लक्षात येताच दर्शिकाच्या भावनांचा उद्रेक झाला अन् ती आणखी रडू लागली. 


क्रमशः

................................................................... 

©®

सेजल पुंजे. 

१०/११/२०२२.


🎭 Series Post

View all