वाट हळवी वेचताना... (भाग-०८)

वेगळ्या धाटणीची वेगळी कथामालिका!

" आता का गप्प आहात?  सांगा ना लवकर काय झालंय दर्शिकाला? वा याऐवजी हे सांगा की, काय केलंय तुम्ही माझ्या दर्शिकाला? " आर्यन परत आवाज चढवून डॉक्टरांना उद्देशून बोलला अन् त्याचा आवाज ऐकून डॉक्टर परत थोडे घाबरले. अक्षयने मात्र त्यांना नजरेनेच धीर दिला आणि बोलायला सांगितले. 


" मिस्टर आर्यन ऐकून घ्या प्लीज! मिसेस आर्यनच्या प्रेग्नन्सी दरम्यान त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आम्ही त्यांना आधीच सांगितले होते. " डॉक्टर म्हणाले. 


" काय? " आर्यन गोंधळून बोलला. 


" हो! " डॉक्टर म्हणाले. 


" पण कसं शक्य आहे? दर्शिकाने मला याबाबत काहीही सांगितलेलं नव्हतं अन् दर्शिका माझ्यापासून कधीच काहीच लपवत नाही. " आर्यनचा रागाने तिळपापड झाला होता. तो डॉक्टरवर खूप जास्त चिडला होता. 


" मिस्टर आर्यन प्लीज शांत चित्ताने ऐकून घ्या. आम्ही मिसेस आर्यन यांना प्रेग्नन्सी दरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची माहिती आधीच पुरवली होती. एवढेच नव्हे तर जेव्हा त्यांना कळलं होतं की, त्या गरोदर आहेत; तेव्हा त्या याच इस्पितळात तपासणीसाठी आल्या होत्या. तपासणी दरम्यान आम्हाला त्यांच्या गर्भाशयात काही गाठी असल्याचे आढळले होते. आम्ही तेव्हाच त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता कारण त्यांच्या गर्भाशयात तुमचं अपत्य वाढविताना प्रसूतीदरम्यान त्यांना त्यांचा जीवही गमवावा लागू शकतो, हे आम्हाला ठाऊक होते. म्हणूनच आम्ही त्यांनाही या कटूसत्याची जाणीव करून दिली होती; पण एका स्त्रीला स्त्रीत्व तिच्या उदरात वाढणाऱ्या बाळामुळे प्राप्त होतं, हा विचार मिसेस आर्यनच्या मनाला शिवला आणि त्यांनी गर्भपात करायला स्पष्ट नकार दिला. 


                एवढेच नव्हे तर, मिसेस आर्यनच्या काळजीपोटी आम्ही काऊन्सिलरद्वारे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्या म्हणाल्या होत्या की, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्याच अंशाचा बळी घेणे त्यांना पटत नाही. सरतेशेवटी मिसेस आर्यनच्या हट्टाखातर आम्हालाच नमावे लागले. " डॉक्टर बोलले अन् त्यांचे शब्द ऐकून अख्ख्या खोलीत शुकशुकाट पसरला. 


" पण एवढी मोठी गोष्ट दर्शिकाने माझ्यापासून का लपवली? " आर्यन बुचकळ्यात पडला. 


" साहाजिकच आहे ना आर्यन कारण तिला माहिती आहे की, तुझ्यासाठी दर्शिका वहिनी महत्त्वाची आहे अन् त्यासाठी तू बाप होण्याचं सुख हसत हसत नाकारलं असतं. " अक्षय बोलला. त्याच्या वाक्याला निमिषने देखील दुजोरा दिला. 


" हो, मग यात काय गैर आहे? " आर्यन म्हणाला. 


" तर माझ्या राजा, मला हेच नको होतं ना! " बेडवर झोपून असलेली दर्शिका सावकाश डोळे उघडत थरथरत्या ओठांनी बोलली अन् तिचे शब्द ऐकून आर्यन भावनाविवश झाला आणि त्याच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रूचे थेंब तिच्या हातावर पडले. 


" दर्शिका, राणी काय केलंस तू? आणि कशासाठी केलंस तू सर्व? तुझ्याविना मी कसा जगणार राणी, सांग ना? मला नाही होता येत गं व्यक्त... ना मला वारंवार माझं प्रेम व्यक्त करता येत... शिवाय मला नाही सुचत साखरेच्या पाकात अन् प्रेमाच्या शिदोरीत गुंडाळलेले गोड गोड शब्द... पण या सत्याला मी कसा नकार देऊ गं की, तुझ्याविना मी मीच नाहीये! जगापुढे दिसणारा आर्यन तूच निर्माण केलास पण प्रत्यक्षात मी कसा आहे, हे तू ही जाणतेस ना? मग तुझ्याविना खरंच माझ्या जगण्याला अर्थ राहील का? 


                राणी! आईबाबा होण्याचं सुख जगावेगळं असतं मान्य आहे मला; पण आपल्या नशिबात ते सुख अनुभवणे स्वतः विधात्याने लिहिलेले नसेल तर मला त्यातंही काही हरकत नव्हतीच गं! आपल्या आश्रमात बरीच मुलं आहेतच ना! ती मुलेदेखील आपल्यासाठी परकी नाहीच ना! मग हा कसला हट्ट होता तुझा? राणी का केलंस तू हे? का केलंस? " आर्यन दर्शिकाचा हात हातात घेऊन त्यावर त्याचं कपाळ घासून रडत बोलला. 


" आरू, राजा! ऐकून घे ना! प्लीज असा नको ना तू रडू! मला खरंच माफ कर आरू! मला माहीत आहे की, मी तुला दुखावलंय पण नाईलाज होता माझाही... " आर्यनला रडताना बघून दर्शिकालाही हुंदका दाटून आला. ती देखील हुंदका देत आर्यनशी बोलू लागली. 


ती पुढे म्हणाली, " आरू, मला नाही पटलं रे, आपल्या बाळाचा, आपल्याच अंशाचा असा जीव घेणे. मला नाही साधता आला स्वार्थ... मला जगता यावं म्हणून मी आपल्या दोघांच्या प्रेमाचं प्रतीक असलेल्या बाळाचा गळा आवळून जीव घेणे नाही जमले मला... शिवाय पहिल्यांदा जेव्हा मी घरीच प्रेग्नन्सी टेस्ट केली होती अन् त्यात आपल्याला कळले की, आपण आई-बाबा होणार आहोत; तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर झळकणारा तो आनंद कसा हिरावून घेतला असता मी? 


                राजा, ज्याप्रमाणे तुझ्यासाठी मी महत्त्वाची आहेस त्याचप्रमाणे माझ्यासाठी तू महत्त्वाचा आहेस ना... मग तुझ्या सुखाचा विचार जरा देखील करू नये? तुझ्या-माझ्या प्रेमाचा अंश जपणे म्हणजे त्यात माझं प्रेमच आहे ना! बघ ना आपलं बाळ... आपल्या प्रेमाचा अंश आहे ना हा... फौजेत असताना मी कित्येक जीवांचे रक्षण केले रे... मग या आपल्याच अंशाची, निष्पाप जीवाची हकनाक निर्घृण हत्या कशी करता येणार होती रे मला? सांग ना... " पाळणातल्या बाळाकडे इशारा करून दर्शिका हुंदके देत बोलत होती अन् तिच्या एकुण एक शब्दाने तिथल्या भावूक वातावरणाला आणखीच हृदयद्रावकता स्पर्शत होती. 


क्रमशः

............................................................... 

©®

सेजल पुंजे.

०९/११/२०२२.


🎭 Series Post

View all