एकदाचा ऑपरेशन थिएटरचा दिवा बंद झाला आणि आर्यनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या हृदयाची स्पंदने आधीच खूप वाढली होती. तो अगदी आशेने ऑपरेशन थिएटरबाहेर उभा होता अन् तेवढ्यात आतून डॉक्टर बाहेर आले. लगेच आर्यन डॉक्टरजवळ गेला.
आर्यन डॉक्टरांना काही विचारपूस करण्याआधीच डॉक्टर त्याला म्हणाले, " मिस्टर आर्यन अभिनंदन तुम्हाला मुलगा झालाय! "
" अभिनंदन भावा! " डॉक्टरांनी गोड बातमी ऐकवताच आर्यनचे दोन्ही सहकारी मित्र अक्षय आणि निमिष त्याला मिठीत घेत बोलले.
ती खूशखबर ऐकताच आर्यनच्या तर आनंदाचा पारावारच राहिला नव्हता. तो आनंदाने उड्या मारू लागला आणि भारावलेल्या स्वरात डॉक्टरांना म्हणाला, " थॅंक्यू डॉक्टर! थॅंक्यू सो मच! "
" पण... " आर्यनचा शब्द तोडत डॉक्टर मध्येच बोलले.
" पण काय डॉक्टर? " आर्यन लगेच काळजीच्या सुरात बोलला.
" पण मिसेस दर्शिका आर्यन त्यांची सध्याची स्थिती अतिशय गंभीर आहे. " डॉक्टर बोलले आणि त्यांचे शब्द ऐकून आर्यन जागीच स्तब्ध झाला.
" काय? काय झालं माझ्या दर्शिकाला? दर्शिका? " आर्यन पुसटच बोलला अन् पळतच ऑपरेशन थिएटरच्या आत दर्शिकाला पाहायला निघून गेला. त्याच्या मागोमाग त्याचे दोन सहकारी मित्र आणि डॉक्टर देखील गेले.
आर्यन पळतच आत गेल्यावर त्याला तिथल्या बेडवर दर्शिका डोळे मिटून पडलेली दिसली. तिला असे मरणासन्न अवस्थेत बघून त्याची धावणारी पावले आपोआप मंदावली. तो हळूहळू चालत तिच्याकडे जाऊ लागला. तिच्याच बेडच्या बाजूला एक छोटा पाळणा होता अन् त्यात बाळ झोपून होतं. आर्यनला त्याच्या बाळाला कुशीत घ्यायचं होतं पण त्याची नजर दर्शिकाहून हलतच नव्हती. तिला असे निस्तेज पाहून आर्यनच्या जिवाची काहिली होत होती. तो एकेक पाऊल टाकून दर्शिकाजवळ येऊन बसला. तो तिच्या चेहऱ्यावरून हळूवार हात फिरवू लागला.
त्याच्या मनात असंख्य विचार धावत होते. त्याने नंतर लगेच दर्शिकाचा उजवा हात त्याच्या हातात घेतला व तो दर्शिकाला म्हणाला, " ए बाळा! ऐक ना! उठ ना! हे बघ, खूप झालं हं! मला माहिती आहे तू उगाच माझी चेष्टा करतेय. तुला आवडतं ना मला छळायला! म्हणून तू मला अशी पिडणार आहेस का? दर्शिका हे बघ, अशी मस्करी मला नाही आवडत गं! उठ ना! डॉक्टरांनाही तूच सांगितलंस ना माझी दिशाभूल करायला हं? उठ ना! हे बघ मी तीन म्हणेपर्यंत तू उठून बस. कळलं ना! "
" मिस्टर आर्यन प्लीज माझं ऐकून घ्या! मिसेस आर्यन मस्करी नाही करताहेत. त्यांच्याकडे खरंच खूप कमी वेळ शिल्लक आहे. " डॉक्टर अडखळतच बोलले.
" काय? डॉक्टर तुम्ही हे काय बोलत आहात? खूप कमी वेळ आहे म्हणजे? तुम्ही काय केलं तिच्यासोबत? ती इथे फक्त डिलिव्हरीसाठी आली होती. प्रेग्नन्सी दरम्यान तिला कुठलीही दुखापत झालेली नसताना तिच्या डिलिव्हरी दरम्यान हे काय नवीन घडलं? माझ्या मते, ती फिट ऍंड फाईन होती मग तिची डिलिव्हरी नॉर्मल व्हायला हवी होती मग हे मध्येच काय? मला खरं सांगा डॉक्टर तुम्ही काय केलंत माझ्या दर्शिका सोबत? मला खरं सांगा! अन्यथा मी तुमचं अख्खं करिअर उध्वस्त करेल. मी मेजर आर्यन ताम्हणकर आहे; म्हणून मला आताच्या आता सांगा तुम्ही काय केलंत! " आर्यन डॉक्टरांची कॉलर पकडून तावातावाने दम देत बोलला.
" मिस्टर आर्यन प्लीज शांत व्हा. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी किंवा इतर कोणत्याही डॉक्टरांनी मिसेस आर्यन सोबत काहीच केलेलं नाहीये. " डॉक्टर आर्यनच्या हातातून स्वतःची कॉलर सोडवत बोलले.
" मग माझ्या दर्शिकाची ही अवस्था कशी झाली? सांगा ना कशी झाली? " आर्यनने परत डॉक्टरांच्या कॉलर वरची पकड घट्ट केली व तो डॉक्टरांना खडसावून विचारू लागला.
" आर्यन प्लीज शांत हो! निदान आधी डॉक्टर काय बोलत आहेत ते ऐकून तर घे. " निमिष अर्थात आर्यनचा सहकारी फौजी मित्र म्हणाला.
" काय ऐकून घेऊ निमिष? तू सुद्धा मलाच शांत राहण्याचा सल्ला देतोय? यार माझी दर्शिका तिथे निस्तेज पडून आहे. तिला असं पाहून माझ्या काळजावर किती वार होत आहेत याची तुला खबर नाहीये... जीव झुरतोय माझा तिच्यासाठी... " आर्यन उदासीन स्वरात बोलला. त्याचे डोळे पार झाले होते. तो अक्षरशः आग ओकत होता पण त्याने तिटकाऱ्यानेच डॉक्टरांचा कॉलरही सोडून दिला.
" आर्यन आम्हाला कळतंय पण प्लीज आधी डॉक्टरांचंही एकदा ऐकून घे. " आर्यनचा दुसरा फौजी मित्र अक्षय म्हणाला.
" अक्षय दादा तुम्ही सुद्धा? " आर्यनने अक्षयलाच प्रतिप्रश्न केला.
" आर्यन तू माझ्या लहान भावासारखा आहेस. मलाही कळतंय की, तुझा जीव किती तुटतोय दर्शिका वहिनीसाठी पण सध्या तापट डोक्याने काम न घेता थोडं शांत होऊन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे; म्हणून प्लीज शांत हो! " अक्षय आर्यनची समजूत काढत बोलला.
आर्यनने त्याच्याच एका हातावर दुसऱ्या हाताने ठोसा मारून राग व्यक्त केला. त्यानंतर तिथले वातावरण थोडे आणखीच तणावपूर्ण झाले होते पण अक्षय आणि निमिषने इशाऱ्यानेच डॉक्टरांना स्पष्टीकरण द्यायला सांगितले अन् इशारा उमजून डॉक्टरांनी उसासा दिला.
क्रमशः
.............................................................
©®
सेजल पुंजे
०७/११/२०२२.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा