वाट हळवी वेचताना... (भाग-०६)

आगळ्यावेगळ्या धाटणीची आगळीवेगळी कथामालिका... त्याच्या प्रवासाशी साधर्म्य राखणारी नवी कोरी भावस्पर्शी कथामालिका!

                तब्बल दोन वर्षांनंतर एकमेकांची भेट घेताच दोघेही पार मंत्रमुग्ध झाले होते. त्यांच्यासाठी दोन वर्षे नसून जणू त्यांनी कित्येक युगांचा वनवास भोगला असावा, अशी त्यांची अवस्था झाली होती. एकमेकांशिवाय एक क्षणही ज्यांना जगता येईना अशा दर्शिका अन् आर्यनने देशभक्तीपोटी स्वतःच्या भावभावनांवर बराच संयम साधला होता; पण यंदा मिळालेल्या रजेमुळे सरतेशेवटी त्यांची भेट झालीच अन् त्यांच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर चैतन्य पुनश्च विसावले. 


                दोन वर्षे भोगलेल्या विरहानंतर त्यांनी मनाशी गाठ बांधली की, पुनश्च एकमेकांपासून विलग व्हायचे नाहीच आणि म्हणून त्या दोघांनीही त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना बदलीची विनंती केली. अर्ज दाखल केले आणि सुदैवाने दोघांचीही बदली एकाच ठिकाणी म्हणजे जम्मू काश्मीर राज्यात झाली. एकाच राज्यात बदली झाल्याची सूचना मिळताच आर्यन आणि दर्शिका कमालीचे खूश झाले. त्यांच्या सुट्ट्या पार आनंदात गेल्या. दोन महिने त्यांनी त्यांच्या सुट्ट्यांचा आस्वाद घेतला. त्यानंतर दोघेही एकत्रच जम्मू काश्मीरला रवाना झाले. 


                जम्मू काश्मीरमधील त्या दोघांची कामगिरी पाहता दोघांनाही बढती मिळाली. दोघेही देशप्रेम आणि त्यांचं नातं यात सुयोग्य रितीने तारतम्य साधत होते. जम्मू काश्मीरमध्ये ते दोन वर्षे रुजू होते. दरम्यान त्यांना दिवाळी सणाच्या सुट्ट्या मिळाल्या. त्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी एकमेकांच्या सहमतीने छोटेखानी लग्नसमारंभ पार पाडला, ज्यात त्यांचे सहकारी मित्रही सामील झाले होते. लग्न होताच दोघेही ऑफिशियली वैवाहिक जीवन जगू लागले होते. 


                 त्यांचं लग्न झाल्यानंतर साधारण एक वा सव्वा वर्षानंतर दर्शिकाला दिवस गेले. प्रेग्नन्सीमुळे दर्शिकाने प्रेग्नन्सी लीव घेतली. सगळं व्यवस्थित सुरू होतं. त्या दोघांचा संसार सुखाने सुरू होता. ना कोणते वादविवाद होते ना कोणतेही मतभेद! दोघेही एकमेकांना समजून घ्यायचे. आर्यन त्याचं फौजदारी कर्तव्य पार पाडताना दर्शिकाप्रती त्याच्या प्रेमात जराही उणीव भासू देत नव्हता. प्रेग्नन्सी दरम्यान दर्शिकाचे वेळोवेळी बदलणारे मुड स्विंग्ज असो वा निरनिराळे क्रेविंग यात आर्यन अगदी आनंदाने तारतम्य साधायचा. 


                पाहता पाहता नऊ महिने सरून गेले. त्यामुळे तिची काही दिवसात प्रसूती होणार होती; म्हणून तिला आधीच दवाखान्यात भरती केले गेले. सर्व व्यवस्थित सुरू असताना ऐनवेळी खबर आली की, काही अतिरेकी बुद्धिमत्तेचे घुसखोर सीमा ओलांडून जम्मू काश्मीरमध्ये शिरण्याचे नियोजन करत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यामुळे तात्काळ आर्यन एक कार्यप्रेमी अन् कर्तव्य पिपासू वृत्तीचा लष्कर अधिकारी असल्याने त्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला बोलावून घेतले. त्याला दर्शिकाच्या पहिल्या वहिल्या प्रसूतीदरम्यान तिला एकटं सोडून जायचं नव्हतं. त्याला तिची सोबत करायची होती पण दर्शिकानेच त्याला देशाप्रती कर्तव्यपूर्ती करण्याचे फर्मान सोडले. 


                 दर्शिकाचा शब्द आर्यन नक्कीच टाळणार नव्हता; म्हणून त्याला जाणे भाग पडले. मनोमन त्याला माहिती होतं की, दर्शिकाला त्याची गरज होती पण तिने स्वार्थ न साधता देश प्रेमाखातर कठीण वेळेतही आर्यनला स्वतःपासून दूर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पाठविले; त्यामुळे त्याने मनात ठाणले की, लवकरात लवकर त्या घुसघोरांचा सोक्षमोक्ष लावून तो दर्शिकाच्या प्रसूतिपूर्वी तिच्याजवळ जाणार! त्याकरिता त्याने अगदी जबरदस्त नियोजन केले व त्याच्या इतर सहकारी मित्रांच्या मदतीने घुसखोर घुसखोरी करण्याआधीच त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी आर्यन सज्ज झाला. 


                ज्या रात्री घुसखोर सीमा ओलांडून जम्मू काश्मीरमध्ये शिरणार होते त्या रात्रीच्या अगोदरच्या दिवशीपासून आर्यन आणि त्याचे सहकारी मित्र सीमेजवळ तैनात होते पण वेशभूषा बदलून! त्यांनी स्वतःला निसर्गाच्या छटेत रुपांतरित करून घेतले होते जेणेकरून कुणालाही काही खबर लागणार नाही. सगळे अगदी ठरविल्याप्रमाणे घडत गेले. त्या चकमकीत काही जवान शहीद झाले अन् काही जखमी झाले; परंतु एकही घुसखोर फरार झाला नाही. किंबहुना पसार होण्याची संधीच त्यांना मिळाली नाही. 


                 त्या मिशनचा लीडर आर्यन होता. त्याने त्याची जबाबदारी चोख पाळली होती. ते मिशन सक्सेसफुल होताच त्याने तडख ते इस्पितळ गाठलं जिथे दर्शिका भरती होती. इस्पितळ गाठताना त्याच्या मनात निव्वळ दर्शिकाची काळजी दाटून होती. तिला पाहण्यासाठी त्याचा जीव पार कासावीस झाला होता. असंख्य विचार डोक्यात सुरू असताना शेवटी तो इस्पितळात पोहोचला. इस्पितळात पोहोचताच त्याला कळलं की, दर्शिकाला नुकताच प्रसुती कळा जाणवल्या होत्या म्हणून तात्काळ तिला ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले गेले होते. 


                ती बातमी मिळताच आर्यनला थोडा आनंद झाला कारण आतापर्यंत दर्शिका एकटीच होती पण आता तो तिथे पोहोचला होता. तरीही प्रसूती दरम्यान दर्शिका एकटीच होती, तिला आधार द्यायला तो तिच्यासोबत नव्हता. म्हणून त्याला दर्शिकाची खूप काळजी वाटत होती. ती कशी असेल, तिला किती वेदना होत असतील ह्यासारखे कित्येक प्रश्न त्याच्या डोक्यात थैमान घालत होते. त्याचा जीव अगदी घड्याळाच्या काट्यावर टांगून होता. एकेक सेकंदाला त्याच्या काळजाचा ठोका चुकत होता. तो ऑपरेशन थिएटरबाहेर जीव मुठीत घेऊन बसला होता. त्याला ओ.टी. बाहेर दर्शिकाच्या वेदनादायक किंकाळ्या ऐकू येत होत्या अन् तिला होणारा त्रास उमजून ओ.टी.बाहेर आर्यन क्षणोक्षणी बेचैन होत होता. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे.

०५/११/२०२२.


🎭 Series Post

View all