Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग-०५)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग-०५)


               आर्यन अनाथाश्रमात दाखल झाला तेव्हा अगदीच शांत राहायचा अन् हे दर्शिकाला खटकायचं; म्हणून तो कितीही तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असला तरी ती त्याच्यासोबत कायम असायची. हळूहळू त्यालाही तिची सवय झाली. इतर कुणाशीही तो जुळवून घेत नसला तरी तिची एकुण एक क्षुल्लक खबर त्याला असायची. एरवी शांत असला तरी दर्शिकासोबत असताना अगदी धुमाकूळ घालायचा. 


                तिच्या सहवासाने तो हळूहळू खुलू लागला. त्याच अनाथाश्रमातील इतर मुलामुलींशीही तो जुळवून घेऊ लागला अन् त्यांच्याशी मैत्री करू लागला. तिच्यामुळेच सगळ्यांशी त्याची मैत्री झाली होती पण दर्शिका आणि त्याचं नातं जरा वेगळंच होतं! त्याच्या मनात खूप खास जागा होती तिच्यासाठी अन् साहाजिकच दर्शिकाच्या मनातही आर्यनसाठी खास जागा होती आणि हे त्या दोघांकडे पाहून कुणा अनोळखी व्यक्तीसही अंदाज लागावा; एवढं उघड होतं.


                दोघेही समवयस्क होते त्यामुळे त्यांनी एकाच शाळेत दाखला घेतला होता. ते दोघेही एकत्रच वेळ घालवू लागले अन् एकमेकांच्या आणखी जवळ येत गेले. दर्शिकाचा स्वभाव मनमिळाऊ तर होताच; पण ती दिसायलाही नाकंडोळी सुंदर व सोज्वळ अशी होती. त्यामुळे इतर मुलांना ती आवडायची व ते तिच्याशी मैत्री करू पाहायचे; पण आर्यन आणि दर्शिका हे दोघेही सोबत असताना कुणाची काही बिशाद नव्हती दर्शिकाशी अति जवळीक साधण्याची! 


                त्यांच्या नात्याविषयी बऱ्याच अफवा पसरल्या होत्या पण ते सर्रास दुर्लक्ष करायचे. एकत्रच वाढल्याने मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले त्या दोघांनाही कळले नाही. काही कळत नव्हतं तेव्हापासून त्यांचं नातं अगदी मैत्रीच्या पलिकडचं, अथांग विश्वासाचं अन् प्रेमाच्या धाग्याने विणलेलं होतं. त्यामुळेच त्यांच्या नात्याला नाव देण्याची गरज त्यांना कधी भासलीच नव्हती; पण तरीही त्यांनी त्यांच्या भावना एकमेकांपुढे कबूल केल्या होत्या. शिवाय जेव्हा प्रेम म्हणजे नेमकं काय असतं, हे त्यांना कळू लागलं तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रेमभावनांचा स्वतःच एकमेकांसमोर स्विकार केला होता. त्यांचं नातं गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, प्रियकर-प्रेयसीच्या टॅग पेक्षा निराळं होतं. त्यांच्या नात्यात जिवलग मैत्री, नवरा-बायकोसारखं भांडण, हलके-फुलके वाद-विवाद, क्षणिक रुसवेफुगवे अन् शंकर-पार्वतीसारखं निस्सीम प्रेम होतं; म्हणूनच गैरसमजुती कोसो दूर पलायन करायच्या. 


                शाळा आणि कॉलेज त्यांनी एकत्रच केलं. त्यानंतर दर्शिकाने आर्मी डिफेन्सच्या परीक्षेचा फॉर्म भरला अन् तिच्यासोबत आर्यनने देखील भरला. दोघांनीही परीक्षा दिली अन् उत्तम गुणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे आर्मी डिफेन्समध्ये सिलेक्शन झालं आणि सुरू झाला त्यांचा नविन प्रवास! 


                ते दोघेही लष्कर प्रशिक्षणासाठी देहरादूनला रवाना झाले. लष्कर प्रशिक्षणादरम्यान त्यांना एकमेकांशी संवाद साधायला फार कमी वेळ मिळायचा पण त्यांच्या नात्यात दुरावा आला नाही. प्रशिक्षणाचे सहा महिने कधी सरून गेले, त्यांनाही कळलं नाही. प्रशिक्षण संपताच त्यांना सिलेक्शन होईस्तोवर रजा देण्यात आली. रजेदरम्यान ते दोघेही त्यांच्या अनाथाश्रमातील इतर मुलामुलींना डिफेन्सचे धडे देत होते. पाहता पाहता दोन महिने सरले होते अन् तेवढ्यात त्या दोघांनाही लष्करी दलात सिलेक्शन झाल्याचं सिलेक्शन लेटर्स आले; पण त्या दोघांचीही निवड वेगवेगळ्या राज्यात करण्यात आली होती. 


                दर्शिकाची निवड गुजरातमध्ये तर आर्यनची निवड पंजाबमध्ये झाली होती. दोघांनाही काय करावं नि काय नाही, ह्यातलं काही कळतंच नव्हतं; कारण त्या दोघांनाही एकमेकांची फार सवय लागलेली होती. शिवाय ते दोघेही कधी एकमेकांपासून दूर राहिले नव्हते अन् त्यात त्यांचं सिलेक्शन असं वेगवेगळ्या राज्यात होणं, हे त्यांना पचायला जड जात होतं. 


                विशेषतः दर्शिका खूप उदास झाली होती. किंबहुना तिची गुजरातला जाण्याची इच्छा देखील मेली होती; पण आर्यनने तिची समजूत काढली कारण तिचं लहानपणीचं स्वप्न होतं लष्करात भरती होण्याचं आणि आताशा ते स्वप्न पूर्ण होत असताना असं सत्याला नाकारणं योग्य नव्हतं, हे सगळं आर्यनने दर्शिकाला पटवून सांगितले. तरीही तिची नकारघंटा सुरूच होती म्हणून सरतेशेवटी नाईलाजाने आर्यनने तिला गुजरातला जाण्यासाठी त्याची शपथ दिली. आर्यनने दिलेल्या शपथेमुळे दर्शिका गुजरातला जाण्यासाठी तयार झाली. 


                सिलेक्शन लेटर्स आल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनंतर दर्शिका गुजरातला रवाना झाली. ती सुखरूप गुजरातला पोहोचल्याची शहानिशा करून, तिचा खुशाल निरोप घेऊन काही दिवसांनंतर आर्यनही पंजाबला रवाना झाला. दोघेही त्यांच्या भूमिका पार पाडत होते. लष्करात सामील झाल्यानंतर अन् विशेषतः परस्परभिन्न राज्यात पोस्टिंग झाल्यापासून अत्यल्प वेळ मिळायचा त्या दोघांना एकमेकांची ख्यालीखुशाली विचारायला पण त्यातही त्यांचा समंजसपणा वरचढ ठरायचा. 


                सलग दोन वर्षे त्यांना एकमेकांची भेटच घेता आली नव्हती; कारण त्या दोघांनाही कधी एकाचवेळी रजा मिळालीच नव्हती. निरनिराळ्या कारणांमुळे त्यांच्या रजेच्या संधी हुकल्या होत्या पण दोन वर्षानंतर त्यांनी त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना रजेकरीता परवानगी मागितली. अंततः वरीष्ठ अधिकाऱ्यांनीही आढेवेढे न घेता सहज परवानगी दिली अन् त्यानंतर त्यांना हुरहुर लागली होती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे तब्बल दोन वर्षांनंतर एकमेकांची भेट घेण्याची! 


क्रमशः

.................................................................. 

©®

सेजल पुंजे. 

०४/११/२०२२.

         

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//