आर्यन मनोमन दर्शिकाला कित्येक अनुत्तरित प्रश्न विचारत होता. तो एकटक लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत मनोमन दर्शिकाला उद्देशून म्हणाला, " दर्शिका! अगं, आपण जे बालपण जगलो ते दर्शनच्या प्रारब्धात लिहिले जाऊ नये म्हणून तू दर्शन मला सुपूर्द केलास अन् तू निरोप घेऊन गेलीस! पण का आणि कशासाठी? सांग ना! पोरका तर दर्शन अजूनही आहेच ना गं! कारण त्याच्याप्रती मी बाबाचं कर्तव्य निभावतोय खरं पण त्याची आई कसा होऊ मी? तिथे तर मी कमी पडतोय ना कायमच!
जगाच्या नजरेत आम्हा बापलेकाप्रती असणारी सहानुभूतीची नजर बोचते गं फार! एवढंच नव्हे तर, दर्शनच्या मनात नकारात्मक विचार पेरणाऱ्या त्याच्याच समवयस्क मित्रांचं काय करू मी? कशाप्रकारे सामंजस्य साधू? एक बाप म्हणून कायम कमी पडतोय गं मी! प्रयत्नच करतोय निव्वळ पण त्यात यश असे काहीच नाही गं आणि तूच सांग ना यश येईल तरी कसे गं? कारण तुझी उणीव भासतेच सतत अन् ती उणीव कुणीच भरून काढू शकणार नाही. कुणीही नाही, कधीही नाही, हे अलिखित पण कोरीव सत्य आहे. राणी, दिवस काम करताना सहज निघून जातो गं पण ही रात्र नकोशी वाटते.
वाटेत एकटे चालताना तुझाच आभास घडविते,
आठवणींचा गुंता वाढविते ही सांजवेळ!
वळणावळणावर तुझ्याच उणीवेची जाणीव करवून देते,
मन पोखरून टाकते अखेर ही कातरवेळ!
राणी अगं! दर्शनच्या कित्येक क्लिष्ट प्रश्नांचे उत्तर अगदी स्वाभाविकरित्या देणारा त्याचा बाबा आर्यन जेव्हा तुझा आरू असतो ना, त्यावेळी स्वतःच्याच नकारात्मक विचारांच्या डोहात पार गुरफटून जातो, ज्यातून बाहेर निघताच येत नाही. माझेच प्रश्न माझा जीव घेतात दर्शिका... मी काय करू तूच सांग ना!
कशी आणि किती समजूत घालू स्वतःच्याच मनाची? या वेलीत, या फुलात, या फुलपाखरात, पावसाच्या प्रत्येक थेंबात, कोवळ्या सुर्यकिरणांत, इंद्रधनूच्या सप्तरंगात, सगळीकडेच फक्त तुझा वावर अनुभवण्याचा मी प्रयत्न करत असतो पण या घराला तुझ्याविना घरपण बहाल होतंच नाहीये गं! म्हणून तू ये ना परतून, ये ना राणी... " आर्यन जरी मनातल्या मनात बोलत होता; तरीही तो खूप भावूक झाला होता. म्हणून त्याचा कंठ दाटून येताच त्याला हुंदका फुटला आणि तो लॅपटॉपच्या स्क्रीनवर झळकणाऱ्या दर्शिकाच्या फोटोचं वॉलपेपर पाहता पाहता अगदी ढसाढसा रडू लागला.
पस्तीशीतला आर्यन एखाद्या लहानग्या मुलासारखा न थांबता रडत होता. ती त्याच्या आयुष्यातून गेल्यापासून प्रत्येक रात्र ही अशीच कातर असायची त्याच्यासाठी... प्रत्येक रात्री तो स्वतःच्याच मनाशी द्वंद्व करायचा अन् सरतेशेवटी नेहमीच त्याला तिच्या कुशीत शिरल्याचा भास व्हायचा.
मन थकलं की, तिच्या मिठीचाच तर एक आधार होता त्याला, ती असताना! पण आता फक्त तिच्या मिठीचा भास त्याच्याकडे शिल्लक होता अन् तो भासंच हल्ली तिची उणीव भरून काढायचा. नेहमीप्रमाणे आजही त्याला तिच्या मिठीत शिरल्याचा भास झाला. ती त्याला थोपटून त्याला शांत करत असल्यासारखे त्याला वाटू लागले. ती प्रत्यक्ष नव्हती पण कल्पनेतून का होईना तिचा सहवास लाभतोय, यातंच आर्यन संतुष्ट होता. तो मनातले वादळ शांत करण्यासाठी त्या कल्पनेत तिच्या कुशीत शिरून अगदी डोळे मिटून राहिला. प्रत्यक्षात मात्र तो खुर्चीवर बसून स्टडीटेबलवर डोकं टेकवून डोळे मिटून पडून राहिला अन् कधी त्याचं मन भूतकाळात गुंतून गेलं कळलंच नाही.
...........................................................
भूतकाळ -
आर्यन ताम्हणकर! अवघ्या आठ वर्षाचा असताना त्याच्या आईवडीलांचे निधन झाले आणि तो पोरका झाला. गडगंज संपत्तीचा मालक असूनही नातेवाईकांनी त्याला गंडवून त्याची संपत्ती हिरावून घेतली व त्याला अनाथाश्रमात दाखल केले होते. तिथेच ओळख झाली होती त्याची अन् तिची!
ती अर्थातच दर्शिका म्हात्रे, अनाथाश्रमातच कर्मचारी असलेल्या सुमित्रा म्हात्रेची सुकन्या! दर्शिकाचा जन्म होण्यापूर्वीच तिच्या वडीलांचे निधन झाले होते अन् ती पाच वर्षाची असताना तिच्या आईचेही एका दुर्गम आजाराने निधन झाले आणि ती पोरकी झाली. दर्शिका त्याच वृद्धाश्रमात वाढत होती. आर्यन फार लाजराबुजरा होता. किंबहुना बालवयात आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्याच्या ओठांवरचं हसू मावळलंच होतं जणू! म्हणूनच तो कुणातही सहसा मिसळायचा देखील नाही अन् अक्षरशः त्याच्या अगदीच विरूद्ध स्वभावाची होती दर्शिका!
दर्शिकाला वास्तवाची जाण होती पण तिला भूतकाळात गुंतून राहायची सवय नव्हती. वाट खडतर असली तरी प्रवास सुखकर होऊ शकतो, असं तिचं ठाम मत होतं. म्हणून ती वाईट आठवणी कवटाळून घ्यायचीच नाही कधी... कितीही संकट आले तरी त्याला हसत सामोरे जाता येतं, ह्या मताची ती होती म्हणून तिच्यातली सकारात्मकता ती सगळ्यांनाच देण्याचा प्रयत्न करायची. प्रथमदर्शनी तिला कुणी पाहिले तर तिच्या संघर्षाचा कुणाला अंदाज यायचाच नाही; कारण तिच्या ओठांवर कायम हसूच विराजमान असायचं अन् का कोण जाणे तिला पाहिले की, एखाद्या व्यक्तीचे नैराश्य खरंच दूर पळून जायचे... एवढा सात्त्विक आणि सकारात्मक वावर होता दर्शिकाचा!
क्रमशः
....................................................................
©®
सेजल पुंजे.
०२/११/२०२२.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा