वाट हळवी वेचताना... (भाग-०३)

त्याच्या भावभावनांचा विचार करायला लावणारी निराळी कथामालिका!

           

               आर्यनला खोलीत शिरताच दर्शन त्याची बेडवर बसून वाट पाहत असल्याचे दिसले. दर्शनला असे पाहून आर्यन गालातल्या गालात हसला. त्याला माहिती होतं की, दर्शन त्याची कशासाठी वाट पाहतोय! म्हणून नेहमीप्रमाणे गोष्टीचं पुस्तक घ्यायला आर्यन ड्रॉव्हरकडे वळला; पण दर्शनने त्याला अडवले आणि त्याने आर्यनला अंगाई गाण्यासाठी फोर्स केला. थोडा वेळ आर्यनने आढेवेढे घेतले पण दर्शनच्या हट्टापुढे त्यालाच नमावे लागले. अंगाई गीत गाऊन आर्यनने दर्शनला झोपवले. त्यानंतर तो स्वतः स्टडीटेबलपुढे बसून लॅपटॉप उघडून त्यात त्याचं ऑफिस वर्क करत बसला. 


                साधारण एक ते दिड तास तो काम करत होता. काम करून होताच त्याने टेबललॅम्प बंद केला व तो थोडा निवांत होऊन खुर्चीवर रेलत बसला. तेवढ्यात त्याची नजर स्टडीटेबल ज्या भिंतीला टेकून होता त्या भिंतीवरील खिडकीकडे गेली. त्या खिडकीचा पडदा वाऱ्याच्या झुळुकेने हलकाच हलत होता त्यामुळे स्टडीटेबलवर चंद्राचा मंद प्रकाश येत होता. 


                आर्यन अनायासे खुर्चीवरून उठला व खिडकीजवळ गेला. खिडकीवरील पडदा बाजूला सारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही म्हणून त्याने पडदा थोडा बाजूला सारला. पडदा बाजूला करताच खिडकीच्या आत स्टडीटेबलवर बाहेरचा लख्ख प्रकाश आला. ती खोली त्या प्रकाशाने थोडी उजळून निघाली होती. आर्यन आधी फक्त प्रकाशाकडे पाहत होता पण हळूहळू त्याने खिडकीच्या बाहेर पाहायला नजर वळवली अन् त्याची नजर आकाशातल्या असंख्य चांदण्या नि त्या एकुलत्या चंद्रावर खिळून राहिली. 


                खिडकीतून चंद्राकडे पाहता पाहता आर्यन जणू वेगळ्याच आठवणीत रमून गेला होता. तो बेभान होऊन त्या निरभ्र आकाशाकडे पाहत होता अन् त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. एव्हाना दर्शन झोपला होता म्हणून आर्यनचे त्याच्या अश्रूंकडे लक्ष जाऊनही त्याने ते अश्रू पुसले नाही. त्याने मनाला घातलेला बांध सैल केला होता म्हणून डोळ्याच्या पाण्यावाटे तो भावभावनांच्या चक्रीवादळाला मुक्त वाहू देत होता; पण तेवढ्यात दर्शन झोपेतच थरथरत होता. कदाचित वाईट स्वप्न पाहत होता असावा. तो आई अन् बाबा हे दोनच शब्द पुटपुटत होता. आर्यनचे दर्शनकडे लक्ष जाताच तो पळतच दर्शनजवळ गेला व बेडवर बसून त्याची पाठ थोपटून त्याचं सांत्वन करू लागला. 


दर्शन झोपेतच तुटक शब्द बडबडत होता. तो म्हणाला, " बाबा... आई... आई जशी मला... मला सोडून गेली... तसाच... तू सुद्धा जाशील का? बाबा... प्लीज... प्लीज... तू... कुठेच जाऊ नको... मला... सोडून नको जाऊ... बाबा... आईला थांबव ना... आई... ती मला भेटायला आलेली पण... पण... न भेटताच जातेय... तू तिला थांबव ना... बाबा... आई... बाबा... " 


" दर्शू बाळा, शांत हो बघू! मी इथेच आहे आणि कायम तुझ्याच सोबत असणार आहे. आईसुद्धा इथेच आहे तुझ्या अवतीभवती! ती तुला कायम बघतेय. आई आणि बाबा दोघेही तुझ्याच सोबत आहे. कुणी तुला सोडून नाही जातंय. बाळा! ते वाईट स्वप्न होतं, त्याचा एवढा विचार नाही करायचा. शांत हो! शांत हो! " आर्यन दर्शनच्या पाठीवर सावकाश थोपटून त्याला सावरत होता. 


                हळूहळू दर्शन शांत झाला आणि कुस बदलून निवांत झोपला. थोडा वेळ आई अन् बाबा हे शब्द तो पुटपुटत होता पण नंतर तो आपोआप शांत झाला. म्हणून आर्यनने दर्शनचे अंथरून नीट केले व दर्शन झोपल्याची खात्री केल्यानंतर तो बेडवरून उठला आणि स्टडीटेबल जवळील खुर्चीवर बसला. खुर्चीवर बसताच त्याला टेबलवर ठेवलेले लॅपटॉप दिसले अन् त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्याला तिचा फोटो दिसला. तिच्या फोटोला पाहताच तो खूप भावूक झाला. 


तो लॅपटॉपवर झळकणाऱ्या फोटोला पाहत मनातल्या मनात म्हणाला, " खरंच, कुठे गेली आहेस तू दर्शिका? अगं, दर्शनची समजूत काढता काढता मला नाकीनऊ होतं गं! मी त्याची दिशाभूल करून त्याच्या प्रश्नांना उत्तर देतो पण माझ्या मनाचं काय? ते तर अस्वस्थच आहे गं! त्याची कशी दिशाभूल करू ज्याला आधीच वास्तवाची जाणीव आहे?


                खूप खूप आठवण येते मला तुझी, अगदी पावलोपावली! या उभ्या आयुष्यात येणारे खाचखळगे असो वा यशाची पायरी मला तुझ्याविना सारे काही नकोसे आहे. फक्त नि फक्त तुला दिलेल्या वचनाखातर जगतोय मी आता; अन्यथा तुझ्याविना अपूर्णच आहे मी आणि माझं आयुष्य देखील! पण राणी कधीच साथ न सोडण्याचं वचन आपण दोघांनीही घेतलं होतं ना! मग मला सोडून जात असताना त्या वचनाचा कसा गं तुला विसर पडला? सांग ना! दर्शनला माझ्याकडे सोपवून तू मला जगण्याचं कारण तर देऊन गेलीस; पण अक्षरशः मला निर्विकार करून गेलीस. कुठे आहेस राणी तू? मला गरज आहे गं तुझी! ये ना परतून! " आर्यन मनातल्या मनात आक्रोश व्यक्त करत होता. 


क्रमशः

..................................................................... 

©®

सेजल पुंजे. 

३०/१०/२०२२.


🎭 Series Post

View all