वाट हळवी वेचताना... (भाग - ०२)

त्याच्या हळव्या मनाचा थांगपत्ता घेणारी कथामालिका...

 

               दर्शनच्या प्रश्नाने आर्यनचा चेहरा पडला. त्याच्या डोक्यात वारंवार दर्शनने विचारलेला तो एकच प्रश्न घुटमळत होता. चिमुकल्या दर्शनचा आवाज आणि त्याचा तो प्रश्न आर्यनच्या कानात सतत गुंजत होता. त्यामुळे तो बऱ्याच अंशी बेचैन झाला होता, त्याचा श्वास कोंडला होता अन् अचानक त्याला तिचं प्रतिबिंब त्याच्या डोळ्यापुढे दिसलं. 


                त्याला ती खळखळून हसत असल्याचा भास झाला.  मध्येच एक क्षण तर त्याला वाटले की, ती त्याच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवत आहे; तो मात्र  जणू संमोहित झाला होता. फक्त नि फक्त बेभान होऊन तिचं प्रतिबिंब अन् त्याला हवाहवासा वाटणारा भास तो अनुभवत होता. त्याला तिच्या मिठीत शिरल्याचाही भास झाला; पण तेवढ्यातच त्याने तिला स्वहस्ते अग्नी दिलेला तो हृदयद्रावक क्षण त्याच्या डोळ्यापुढे उभा राहिला आणि आर्यन खाडकन भानावर आला.


               आर्यन भानावर आला तेव्हा त्याला सभोवती दर्शन शिवाय कुणीच दिसले नाही अन् साहाजिकच त्याला कळून चुकले होते की, त्याला ती तिथेच असल्याचा निव्वळ भास झाला होता. म्हणून त्याने त्याचे बेचैन मन आधी थाऱ्यावर आणले व नंतर खोल श्वास घेतला. हृदयाची वाढलेली स्पंदने देखील त्याने आटोक्यात आणली. तेवढ्यातच त्याची नजर दर्शनकडे गेली. दर्शनच्या त्या एका निरागस प्रश्नामुळे नक्कीच आर्यन हादरून गेला होता; पण त्याने त्याची जाणीव दर्शनला होऊ दिली नव्हती. उत्तराच्या अपेक्षेने दर्शन मात्र निरागस चेहऱ्याने आर्यनकडे पाहत होता. 

 

                आर्यन बराच वेळ दर्शनकडे शांत चित्ताने एकटक पाहत बसला होता; पण थोड्या वेळानंतर त्याने अलगद दर्शनला मांडीवर बसवून घेतले व त्याचा चेहरा ओंजळीत घेतला. दर्शनच्या डोळ्यात कित्येक अनुत्तरित प्रश्नांची झलक आर्यनला दिसत होती. शिवाय आता दर्शन त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्याशिवाय गप्प बसणार नव्हता, याची आर्यनलाही खबर होती; पण सध्या त्याची समजूत काढणे गरजेचे होते. त्यामुळे आर्यनने स्वतःला शांत केले व नंतर तो दर्शनकडे वळला. 


आर्यन दर्शनला उद्देशून म्हणाला, " दर्शू बाळा, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस रे! हो, आईचं माझ्यावर प्रेम होतं पण तरी ती मला सोडून गेली; कारण बाळा तिला तुझ्यात आणि माझ्यात फरक करायचा नव्हता. "


" म्हणजे? " दर्शनने गोंधळून विचारले. 


" म्हणजे बाळा, तुझ्या आईचं तुझ्यावरही प्रेम होतं नि माझ्यावरही! म्हणून तिला तिच्या प्रेमाची तुलना कधीच करायची नव्हती; शिवाय आपल्या दोघांत तिच्या प्रेमावरून भांडण होऊ नये म्हणून आईने तुला माझ्याकडे सोपवलं आणि ती स्वतः देवबाप्पाकडे गेली आपलं नातं चॉकलेटसारखं गोड व्हावं म्हणून देवबाप्पाकडे प्रार्थना करण्यासाठी! 


                एवढेच नव्हे तर, आपल्या दोघांना कुणी त्रास देऊ नये याची खबरदारी ती स्वतः देवाघरी बसून घेत असते. ही सगळी कामं तुझी आई करत असते. आपल्यापासून दूर राहून ती आपली काळजी करत असते आणि क्षितिजाएवढं प्रेमही करते. देवबाप्पालाही आपला हेवा वाटतो म्हणून त्याने आईला चॅलेंज केलंय दूर राहून आपल्या दोघांवर प्रेम करण्याचं! म्हणूनच तुझी आई देवबाप्पाचं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी आपल्यापासून दूर राहून देवबाप्पाला बेफाम टक्कर देतेय बाळा! " आर्यन दर्शनची समजूत काढत म्हणाला. 


" बाबा खरंच? " दर्शन औत्सुक्याने बोलला. 


" हो तर! " आर्यन बोलला व त्याने दर्शनचे लगेच गालगुच्चे घेतले. 


" वाह! बाबा, आई किती ग्रेट आहे ना रे! ती देवाघरी असून सुद्धा आपली काळजी करते आणि आपल्यावर खूप खूप प्रेम करते. हो ना! " दर्शन आनंदाने बोलला. 


" ह्म्म! आता पटलं ना! आता यापुढे आईच्या प्रेमाबद्दल अशी शंका नाही हं घ्यायची! ती देवाघरी बसून तुझ्या या तक्रारी ऐकत असेल तर तिला वाईट वाटत असेल ना! म्हणून यापुढे असं बोलून तिचं मन नाही दुखवायचं! कळलं! " आर्यन दर्शनची समजूत काढत बोलला. 


" हो बाबा! " दर्शनने शाश्वती दिली व लगेच तो आर्यनला बिलगला. 


" बरं! आता चल उशीर बराच झालाय हं! म्हणून आपण लगेच जेवण करून घेऊया! आज डिनरला तुझे आवडते बटाट्याचे पराठे आणि सोबतीला कैरीचं लोणचं आहे! चल, स्वच्छ हात धुवून घेऊ आणि नंतर पोटभर जेवण करू! " आर्यन म्हणाला. 


" ठीक आहे बाबा! " दर्शनने होकार दिला. 


                दर्शनने दुजोरा देताच आर्यन त्याचा हात पकडून किचनच्या बेसीनजवळ गेला. नंतर त्या दोघांनीही हात स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर आर्यनने त्या दोघांसाठी ताट वाढून घेतले. मग त्या दोघांनीही डायनिंग टेबलवर बसून जेवण आटोपून घेतले. त्यानंतर आर्यनने लगेच भांडी घासून घेतली व इतर पसाराही आवरून घेतला. तोपर्यंत दर्शन सोफ्यावर बसून टिव्हीवर कार्टून बघत बसला होता. आर्यनचे आवरून होताच त्याने दर्शनला तो टीव्ही बंद करत असल्याचा इशारा केला. इशारा उमजून दर्शनही निमूट खोलीत गेला. आर्यनने टिव्ही बंद केल्यानंतर सर्व खिडक्या व दार बंद केल्याची खात्री केली अन् त्यानंतर तो देखील दर्शनच्या मागोमाग खोलीत गेला. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे.

२९/१०/२०२२.

🎭 Series Post

View all