Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना... (भाग -१)

Read Later
वाट हळवी वेचताना... (भाग -१)

" बाबा, एक विचारू? आई कशी होती रे? " आठ वर्षाच्या दर्शनने त्याच्या वडीलांना म्हणजेच आर्यनला उद्देशून विचारले पण आर्यन चिमुकल्या दर्शनचा प्रश्न ऐकून जणू स्तब्धच झाला. 

थोड्या वेळाने हलकेच हसून आर्यन दर्शनची समजूत काढत म्हणाला, " दर्शू, आज अचानक तू असं का विचारतोय बरं? "

" बाबा, सांग ना! " दर्शन हट्ट करत बोलला. 

" बरं सांगतो. तुझी आई ना अगदी तुझ्याचसारखी होती हं! " आर्यन दर्शनच्या केसात हात फिरवत बोलला. 

" खरंच बाबा? " दर्शनने परत एकदा खात्री करण्यासाठी विचारले. 

" ह्म्म! अगदी शंभर टक्के खरं! " आर्यन गालातल्या गालात हसून म्हणाला. 

" वाह! किती भारी ना! " दर्शन हळूच पुटपुटला. 

" हो ना! दर्शू खरं सांगायचं तर तुझ्यात ना मला अगदी हुबेहूब तुझ्या आईचंच प्रतिबिंब दिसतं रे! तुझे हे काळेभोर डोळे, तुझे हे इवलेसे नाक, तुझं हे निरागस हसू अन् ही गालातली खळी! तुझे हे इवलेसे हात, तुझे हे कुरळे केस, तुझं हे निरागस पण खट्याळ रूप नि तुझा हा काळजी करण्याचा, मदत करण्याचा, प्रत्येकावर प्रेम करण्याचा आणि वाईट गोष्टीतही चांगले शोधण्याचा स्वभाव! सगळं अगदी माझ्या दर्शिकासारखे म्हणजे अगदी तुझ्या आई सारखेच आहे. " बोलता बोलता आर्यनचा कंठ दाटून आला होता म्हणूनच त्याचा आवाजही थोडा जड झाला होता; पण त्याने त्याची जाणीव दर्शनला होऊ दिली नाही व लगेच त्याने दर्शनला छातीशी कवटाळून घेतले. 

" बाबा खरंच! मी अगदी आईसारखा दिसतो! " दर्शनने आर्यनच्या छातीत डोके खुपसून परत कुतूहलाने विचारले. 

" हो बाळा, अगदीच! " आर्यन म्हणाला व लगेच त्याने दर्शनच्या कपाळावर ओठ टेकवले. 

" पण बाबा, आईचं आपल्यावर प्रेम नव्हतं का रे? " दर्शनने प्रश्न विचारला खरं पण त्याचा प्रश्न ऐकून इकडे दर्शनच्या डोक्याला थोपटणारा आर्यनचा हात जणू थिजून गेला होता. 

दर्शनच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे आर्यनला कळत नव्हते; पण तरीही दर्शन का असे प्रश्न विचारत असावा, हे जाणून घेणे गरजेचे होते. म्हणूनच तो दर्शनला उद्देशून म्हणाला, " असं का बोलतोयस बाळा तू? आपल्यावर तुझ्या आईचं खूप प्रेम होतं, आहे आणि कायम असणार! असा तुझ्या आईच्या प्रेमावर संशय नको घेऊस बाळा! " 

" संशय नाही घेतोय रे बाबा? मला फक्त एवढं विचारायचंय की, जर आईचं आपल्यावर प्रेम होतं तर ती आपल्याला सोडून देवाघरी का गेली? मला भेटायला परतून का आली नाही? " दर्शन बोलत होता आणि त्याचे प्रश्न ऐकून आर्यनचा जीव कासावीस होत होता. 

तो दर्शनची समजूत काढत म्हणाला, " अरे बाळा, ऐकून घे माझं! तुझी आई! तिचं खूप प्रेम होतं रे!  तू काहीबाही विचार नको करूस राजा! " 

" तू माझं ऐक बाबा! तुला ना काहीच माहिती नसतं. तुला सांगू, बाबा! माझ्या शाळेतली मुलं मला काय बोलतात ते? " दर्शन केविलवाण्या स्वरात बोलला. 

" काय म्हणतात? " आर्यनने दर्शनला काळजीने विचारले. 

" बाबा, माझ्या शाळेतली सगळी मुलं मला बोलतात की, आईचं माझ्यावर प्रेम नव्हतं म्हणून ती मला सोडून गेली आणि म्हणूनच ती परतून पण येत नाहीये. एवढेच नव्हे तर, सर्वजण बोलतात की, आईसाठी मी निव्वळ डोकेदुखी होतो म्हणून तिने माझ्याजवळ परतून येण्याचा कधी विचार केला नाही. सगळे असेच बोलतात मला बाबा... मी एवढा वाईट आहे का बाबा? सांग ना, मी एवढा वाईट आहे का? आईचं खरंच प्रेम नव्हतं का माझ्यावर? " दर्शन रडून रडून आर्यनशी बोलत होता. 
 
                दर्शनची ही अवस्था पाहून आर्यनला त्याची किव येत होती. त्याने लगेच दर्शनला मिठी मारली. बराच वेळ दर्शनही आर्यनला बिलगून रडत होता. कालांतराने दर्शनने रडणे थांबविले व तो हळूहळू शांत होत होता; पण एव्हाना आर्यनच्या डोळ्यातूनही एक अश्रू गालावर ओघळलाच! परंतु बाप होता तो! हळवा असला तरी सध्या लेकराला सांभाळणे गरजेचे होते म्हणून हळव्या मनावर लगेच ताबा ठेवून दर्शनला त्याचे अश्रू दिसू नये म्हणून त्याने अश्रूचा तो एक थेंब लगबगीने करंगळीने पुसून टाकला. हुंदका दाटून आला होता पण खोल श्वास घेऊन त्याने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण साधले. 

आताशा दर्शनही बऱ्यापैकी शांत झाला होता म्हणून आर्यनने हलकाच सुस्कारा सोडला; पण तेवढ्यात आर्यनला काय सुचले, काय माहित अन् तो आर्यनच्या मिठीतून बाहेर आला आणि त्याच्या नजरेला नजर भिडवून आर्यनचा चेहरा ओंजळीत घेऊन बोलला, " बाबा, आईचं तर तुझ्यावरही प्रेम होतं ना रे? मग ती तुला सोडून का गेली? " चिमुकल्या दर्शनच्या त्या निरागस प्रश्नाने आर्यनच्या काळजात धस्स झाले आणि दर्शनच्या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे तेच त्याला सुचेनासे झाले. तो फक्त अवाक् नजरेने दर्शनकडे पाहत राहिला. 

क्रमशः

............................................................... 

                 नव्या धाटणीची ही नवी कोरी कथामालिका वाचायला विसरू नका. तिचं मन कागदावर सहज उलगडता येतं पण त्याच्या मनाचा कधी कुणाला थांगपत्ताच नसतो ना! म्हणूनच या कथामालिकेतून त्याचं मन मांडण्याच्या माझ्या या छोट्याशा प्रयत्नाला नक्की प्रतिसाद द्या. धन्यवाद! 
             
       

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//