वाट हळवी वेचताना (भाग-६४)

खडतर प्रवास पण साजेशी सोबत!

                रिसॉर्टमध्ये पोहोचताच शिवाक्षी आणि दर्शनने खुसफुस करत आर्यनला ज्ञानदाच्या वाढदिवसाच्या प्लॅनबद्दल विचारले. त्याने त्यांना सर्व समजून सांगितले. त्यांनी हिरवा कंदील दाखवला. त्याच्यानंतर लवकर जेवण आटोपून दर्शन, शिवाक्षी आणि आर्यन बाहेर शतपावली करायच्या बहाण्याने निघून गेले अन् इतर सर्व बंदोबस्त करू लागले. एव्हाना बारा वाजायला अर्धा तास बाकी होता. तोपर्यंत त्या तिघांनी सगळी तयारी केली होती. ते ते तिघेही नीटनेटके तयार झाले होते. त्यानंतर त्याने ज्ञानदाला मॅसेज केला. 


                ज्ञानदा खोलीत बसून होती. तेवढ्यात तिला आर्यनचा मॅसेज आला. मॅसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानदाने कपाटात पाहिले तर, एका कोपऱ्यात एक शॉपिंग बॅग तिला दिसली. तिने ती शॉपिंग बॅग तिच्या हातात घेतली तर त्यात तिला गिफ्ट बॉक्स दिसला. तिने तो गिफ्ट बॉक्स बाहेर काढला व क्षणाचाही विलंब न करता लगेच उघडला. त्यात काळ्या रंगाची सुंदर अशी रेखीव साडी होती. सोबतच त्याला मॅचिंग डायमंड सेट होता. ती थोडा वेळ ते सर्व न्याहाळत बसली; पण नंतर ती लगेच चेंज करायला निघून गेली. तिने ती साडी नेसली, हलकासा मेकअप केला, तसेच डायमंड सेटमधील इयररिंग्ज हातात घेतले व नंतर कानात घातले. लगेच गळ्यात डायमंड नेक्लेसही घातलं. 


                सगळी तयारी झाल्यावर तिने आरशात स्वतःला पाहिलं आणि ती हलकेच लाजली कारण ती आज फारच सुंदर दिसत होती. शिवाय आर्यनने तिला गिफ्ट्स दिले होते म्हणून तिच्या आनंदाचा पारावार राहिला नव्हता. त्यानंतर आर्यनने तिला मॅसेज करून बाहेर बोलावले. ती खोलीतून बाहेर आली तर बाहेरची सजावट ती पाहतच राहिली. अख्खा पायथा आणि पायऱ्या लायटिंग करून सजवला होता. ठिकठिकाणी फुलांच्या माळा सोडल्या होत्या. सभोवती सुगंधित कॅंडल्स ठेवल्या होत्या. त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्नमय वाटत होतं. 


                ती हळूहळू बाहेर आली आणि सभोवताली नजर फिरवत होती. सगळीकडे अंधार पडला होता पण तेवढ्यात एक स्पॉटलाईट तिच्यावर पडली अन् दुसऱ्या स्पॉटलाईटचा प्रकाश हळूहळू तिच्याजवळ येऊ लागला... अर्थातच आर्यन तिच्याजवळ येत होता अन् त्याच्याबरोबर स्पॉटलाईटचीही हालचाल होत होती. 


तो तिच्याजवळ येऊन उभा राहताच ज्ञानदा त्याला आश्चर्य व्यक्त करत म्हणाली, " आर्यन, हे काय आहे? " 


" इट्स अ सरप्राईज फॉर यू डिअर! अ वॉर्म हॅप्पी बर्थडे टू माय लव्हली वाईफ! हॅप्पीएस्ट बर्थडे मिसेस ज्ञानदा आर्यन ताम्हणकर! " आर्यनने ज्ञानदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पण त्याच्या मुखातून वाईफ आणि मिसेस ताम्हणकर ऐकून तिला धक्काच पोहोचला. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. 


आर्यनला तिच्या मनातला प्रश्न अचूक कळला म्हणून तो तिला जवळ घेत म्हणाला, " अशी काय बघतेस? मी तुलाच विश करतोय! ज्ञानदा, मला कळलंय की, दर्शिका आणि तू वेगळी आहेस म्हणून तुझी आणि तिची तुलना मी कधीच नाही करणार... ती माझं पहिलं प्रेम होतं, आहे आणि कायम राहणार पण त्यामुळे तुला हर्ट होईल असं नाही वागणार! मला माहीत आहे, मी खूप उशीर केला व्यक्त व्हायला... आय ऍम सॉरी पण ज्ञानदा नाऊ आय ऍम फॉलिंग फॉर यू! 


ज्ञानदा, मला आता तुझ्यासोबत नव्याने सुरुवात करायची आहे. तूसुद्धा नवी सुरुवात करशील का? जुनं सगळं विसरून नव्या आठवणी निर्माण करूया ना! आतापर्यंत मित्र म्हणून वावरलो आता आपण नवरा-बायको म्हणून वागूया! माझी सोबत तू करायला तयार आहेस ना? ज्ञानदा, आय रिअली रिअली लव्ह यू! डू यू लव्ह मी? " 


आर्यनचा एकुण एक शब्द ऐकून ज्ञानदा आधीच भारावून गेली होती; म्हणून तिचे अश्रू वाहत होते. तेवढ्यात आर्यनने परत विचारले, " डू यू लव्ह मी ज्ञानदा? " 


आर्यनने यावेळी प्रश्न विचारताच ज्ञानदाने त्याला हलकीच चापट मारली अन् म्हणाली, " इतका उशीर कुणी करतं का? आणि हा काही प्रश्न आहे का? ऑफकोर्स आय लव्ह यू आर्यन! " ज्ञानदा बोलली अन् लगेच तिने आर्यनला मिठी मारली. 


आर्यनला एक क्षण काय घडले काही कळलेच नाही पण ज्ञानदा त्याच्या मिठीत शिरताच तो भानावर आला आणि त्याने मिठी घट्ट केली. ते दोघेही एकमेकांना बिलगून होते आणि तेवढ्यात सगळीकडे उजेड झाला. दर्शन आणि शिवाक्षी पळतच त्या दोघांना बिलगले. तिथे दिग्विजय आणि मुग्धा कर्वेसुद्धा होते. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. रिसॉर्टचा स्टाफही उपस्थित होता. त्यांच्या त्या लग्नानंतरच्या प्रपोजलचा साक्षीदार रिसॉर्टचा स्टाफही होता. त्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून ज्ञानदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नंतर सगळ्यांनी ज्ञानदाचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तो आठवडा त्यांनी त्या रिसॉर्टमध्ये घालवला, तिथे भरपूर इंजॉय केलं अन् नंतर सर्वजण आपापल्या दिनचर्येत रममाण झाले.


                ज्ञानदाच्या वाढदिवसानंतर आर्यन आणि ज्ञानदामधला दुरावा कमी झाला आणि त्यांच्या नात्याला पूर्णत्व प्राप्त झालं. दर्शिकाची शेवटची इच्छाही खऱ्या अर्थाने पूर्ण झाली; कारण आर्यनने नवी सुरुवात केली आणि तो आनंदात राहू लागला. दर्शनच्या मताप्रमाणे आता त्या चौघांचं एक पूर्ण कुटुंब होतं, दर्शनच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'एक कम्प्लिट फॅमिली!' 


समाप्त

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


🎭 Series Post

View all