वाट हळवी वेचताना (भाग-६३)

बापलेकाची कहाणी

आर्यनला गालातल्या गालात हसताना पाहून ज्ञानदाने डोळे बारीक केले व ती त्याला जाब विचारत म्हणाली, " तुला हसायला काय झालंय? "


" काही नाही सहज... " आर्यनने विषय टाळला. 


" सांग म्हटलं ना! " ज्ञानदाने आग्रह केला. 


" अगं तू फक्त पंधरा दिवस शॉपिंग केली नाहीस तरीसुद्धा तुझ्याकडे एक चांगली साडी नाहीये नेसायला, अशी म्हणतेस... " आर्यन हसत बोलला. 


" हो तर खरंच बोलतेय मी! इतर साड्या मी नेसल्या आहेत ना... मग आता बाहेरगावी जातोय म्हटल्यावर तिथे वेगळा स्टॉक नको का? " ज्ञानदाने भुवई उंचावून विचारले. 


ज्ञानदाची शिरजोरी पाहता आर्यननेच माघार घेतली आणि तो म्हणाला, " माते, माझं चुकलं. परत अशी चूक करणार नाही. "


" बरं! " ज्ञानदाला वादविवाद जिंकल्याचं समाधान वाटलं अन् अखेर तिनेही माघार घेतली. 


" ज्ञानदा, तू एवढी काळजी नको करूस. तू काहीही घातलंस तरी तू गोड दिसतेस. " आर्यनने हळूच तिला कॉम्प्लिमेंट दिली अन् तो गालातल्या गालात हसत खोलीबाहेर निघून गेला. पण तिला नीटपणे ऐकू गेले नाही. 


तो खोलीबाहेर जाताच ज्ञानदा ओठातल्या ओठात पुटपुटली, " हा आता काय बोलून गेला? जाऊ दे! असंच सॉरी म्हटलं असणार! पण आता मी काय करू? अं! दोन दिवसांसाठी जायचंय म्हणजे... " असं बोलून ज्ञानदा पॅकिंग करण्यात व्यग्र झाली. त्याआधी तिने गश्मीरला कॉल करून परवा त्याच्याकडे ती येणार नसल्याचे कळवले. 


त्यानंतर आर्यन खोलीबाहेर येताच त्याला दर्शन आणि शिवाक्षी कार्टून पाहताना दिसले. त्याने त्यांनाही कळवले की, ते सर्व उद्या सकाळीच दोन दिवसांसाठी फिरायला जाणार आहेत. दर्शन पिकनिकचं नाव ऐकताच खूश झाला होता. तो लगेच त्याची पॅकिंग करायला निघून गेला. शिवाक्षी मात्र आर्यनला उद्देशून म्हणाली, " डॅडा हे काय? " 


" संधीचं सोनं करतोय! " आर्यन डोळे मिचकावत बोलला अन् त्याच्या बोलण्याचा संदर्भ लागताच शिवाक्षी खूश झाली. 


तिने त्याला टाळी दिली आणि म्हणाली, " डॅडा, ऑल द व्हेरी बेस्ट! " 


" थॅंक्यू! बरं शिवा आता तू सुद्धा पॅकिंग करून घे. मी तोपर्यंत सर्व बंदोबस्त करतो. " आर्यन बोलला. त्यावर शिवाक्षीने हुंकार भरला व ती खोलीत निघून गेली. 


                आर्यनने तोपर्यंत तो ज्या ठिकाणी फिरायला जाणार होता, तिथल्या रिसॉर्टची माहिती काढून योग्य ठिकाणी बुकिंग करून घेतली. तसेच त्याने इतरही बंदोबस्त केला. तो दिवस उत्साहात गेला. सर्वजण आनंदी होते पण आर्यन थोडासा बेचैन होता; म्हणून तो दर्शनला घेऊन अंगणात शतपावली करायला गेला. शिवाक्षी मात्र टी.व्ही. पाहत बसली होती. ज्ञानदा मात्र पॅकिंगमध्येच व्यग्र होती. 


आर्यन दर्शनसोबत शतपावली करत होता. दर्शन नेहमीसारखाच बडबड करत होता आणि आर्यन ऐकत होता; पण थोड्या वेळाने त्याने खोल श्वास घेतला आणि तो दर्शनला म्हणाला, " दर्शू, बाळा... मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. ऍक्च्युअली मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली होती. आय ऍम सॉरी! " 


" बाबा, काय झालं? तू ठीक आहेस ना? तू कशाबद्दल बोलतोय? तू कोणती गोष्ट लपवून ठेवली होती? " दर्शनने एकामागोमाग प्रश्नांची सरबत्ती केली. 


आर्यनने खोल श्वास घेतला आणि तो बोलला, " आय ऍम सॉरी, बाळा! मी आणि ज्ञानदाने खरंखुरं लग्न केलं नव्हतं. आम्ही फक्त तुझी समजूत काढण्यासाठी तुझ्यापुढे नाटक करत होतो; पण... " असे बोलून आर्यनने दर्शनला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्याचबरोबर आता त्याला ज्ञानदाबद्दल काय वाटतं, हे ही विस्तृतपणे सांगितलं. 


सगळं कळल्यावर दर्शन म्हणाला, " अं! बाबा... मला तुझा राग आलाय कारण तू माझ्यापासून हे सर्व लपवून ठेवलंस, तू माझ्याशी खोटं बोललास... पण जर आता तुला खरंच आई आवडत असेल तर माझा तुला सपोर्ट आहे; पण एक लक्षात घे, तू माझ्याशी वारंवार खोटं बोलत जाऊ नकोस. मला नाही आवडत. कळलं ना? नाहीतर मी कट्टी करेल. " 


                दर्शनने समजून घेतल्याचे आश्चर्य आर्यनला वाटले. त्याने दर्शनला मिठी मारली अन् त्याने मनापासून त्याची माफी मागितली. दर्शननेही कसलाच रुसवाफुगवा न बाळगता आर्यनला माफ केले. त्यामुळे आर्यन रिलॅक्स झाला होता. त्या रात्री त्याला निवांत झोप लागली. 


                दुसऱ्या दिवशी ते चौघेही सकाळीच कार घेऊन बाहेर पडले. काही तासांचा प्रवास करून ते इच्छित ठिकाणी पोहोचले. ते रिसॉर्टमध्ये शिरले आणि त्यांच्या रुममध्ये गेले. फ्रेश झाल्यानंतर ते चौघेही परत बाहेर फिरायला गेले. रिसॉर्टच्या सभोवताली हिरवळ असल्याने वातावरण अगदी रम्य होतं. ज्ञानदा तिथे जाऊन फार खूश होती. त्या चौघांनीही आजुबाजूचा परिसर हुंदाळून काढला. दर्शन आणि शिवाक्षीसुद्धा फार खूश होते आणि त्या तिघांना आनंदात पाहून आर्यनलाही समाधान वाटले. त्या चौघांनीही बरीच शॉपिंग केली. आर्यननेही ज्ञानदासाठी काही भेटवस्तू घेतल्या पण त्याने त्याची खबर तिला लागू दिली नाही. शिवाक्षी आणि दर्शननेही ज्ञानदासाठी तिला आवडतील असे बर्थडे गिफ्ट्स घेतले. त्यानंतर संपूर्ण शॉपिंग आटोपून ते चौघेही परत रिसॉर्टला पोहोचले. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.




🎭 Series Post

View all