Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग-६१)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग-६१)

थोड्या वेळानंतर त्यांच्याजवळ दर्शन आणि शिवाक्षी आले. गश्मीरला पाहून शिवाक्षी म्हणाली, " जी काका, तुम्ही इथे? " 


" हो, शिवा! बाय द वे तू पण स्पर्धेत भाग घेतला आहेस का? " गश्मीर बोलला. 


" हो, बरोबर ओळखलंत काका! " शिवाक्षी हसून बोलली. 


" गुड! ऑल द बेस्ट! " गश्मीर बोलला. 


" थॅंक्यू काका! पण काका तुम्ही इथे आमच्या शाळेत कशासाठी आलात? " शिवाक्षीने विचारले. 


" अगं ही स्पर्धा जज करायला मला बोलावलंय. " गश्मीर बोलला. 


" अच्छा! " शिवाक्षी म्हणाली. 


" ह्म्म, तुझी प्रॅक्टिस झालीय ना? " गश्मीरने विचारले. त्यावर शिवाक्षीने होकार दिला. 


त्यानंतर गश्मीरने दर्शनसोबतही ओळख करुन घेतली. त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने दर्शनलाही गश्मीर आवडला व त्याची गश्मीरसोबत मैत्री झाली. त्यानंतर कार्यक्रम सुरू होत असल्याची घोषणा होताच गश्मीर मंचाकडे निघून गेला व आर्यन आणि ज्ञानदा त्यांच्या जागेवर येऊन बसले. 


जागेवर येऊन बसताच आर्यनने उसने हसत ज्ञानदाला विचारले, " ज्ञानदा, तू आणि गश्मीर एकमेकांना जी आणि डी अशी हाक का मारता? " 


आर्यनच्या वाक्यावर ज्ञानदा मंद हसली आणि म्हणाली, " अरे त्याचीही एक गंमत आहे. लहानपणी आम्हाला एकमेकांचे नाव बोलायला अडचण यायची म्हणून आम्ही आमच्या नावाचे इंग्रजी इनिशियल्स वापरू लागलो. त्याचं नाव गश्मीर आहे म्हणून मी त्याला जी म्हणू लागली अन् सेम तो मला डी म्हणू लागला. " 


" अच्छा! म्हणजे एकप्रकारे तुम्ही एकमेकांना टोपणनाव दिले आहे, असं म्हणता येईल. " आर्यन बळेच हसून म्हणाला. 


" हो, असंही म्हणता येईल. " ज्ञानदा गश्मीरकडे पाहून मंद हसली. आर्यनच्या लक्षात येताच त्याने फक्त हुंकार भरला. 


त्यानंतर तो गश्मीरबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावर ज्ञानदा म्हणाली, " गश्मीरचं पूर्ण नाव गश्मीर बर्वे आहे. आमच्या आडनावात साम्य असल्याने आमची मैत्री झाली होती. हळूहळू कशी वाढत गेली. मलाही कळलं नाही. आम्ही एकाच शाळेत होतो, एकाच कॉलनीत होतो त्यामुळे आमचा दिवसही एकमेकांच्या सहवासात जायचा अन् रात्र ही! पुढे आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. दरम्यान त्याने मला प्रपोज केलं होतं पण माझा फोकस आर्मी जॉईन करण्याकडे होता त्यामुळे मी त्याला सरळस्पष्ट नकार दिला होता... पण खरंतर बाकी त्याच्यात नकार देण्यासारखं काहीच नव्हतं; पण पठ्ठ्याने माझा नकार सिरियसली घेतला आणि तो डान्सचे प्रशिक्षण घेण्यासाठी तसेच डान्स विषयात पदवीचे शिक्षण घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला निघून गेला. तो गेल्यानंतर मी आर्मी जॉईन केली अन् मग पुढे काय झालं, हे तर तुलाही माहिती आहेच. "


                आर्यनने गश्मीरबद्दल एक प्रश्न विचारला होता पण ज्ञानदा गश्मीरचं न थांबता कौतुक करत होती. त्यामुळे आर्यनला आणखीच जेलस फील होत होतं. त्यानंतर तिने शिवाक्षीसोबत गश्मीरची कशी ओळख झाली, हे ही थोडक्यात सांगितले. एकीकडे ज्ञानदा कौतुक करताना थकत नव्हती. दुसरीकडे गश्मीरचं एवढं कौतुक आर्यनला मात्र पचायला जड जात होतं. तेवढ्यात कार्यक्रम सुरू झाला आणि ज्ञानदाही गप्प झाली. दर्शन आणि शिवाक्षीचाही परफॉर्मन्स झाला. त्यादिवशीचा कार्यक्रम आटोपताच ज्ञानदाने गश्मीरला जेवायला आमंत्रण दिले. गश्मीर नकार देत होता पण दर्शन, शिवाक्षी आणि ज्ञानदा त्याला आग्रह करत होते. त्या तिघांना आग्रह करताना पाहून नाईलाजाने आर्यननेही गश्मीरला आग्रह केला अन् त्याने आग्रह केला म्हणून गश्मीरनेही होकार दिला. 


                ज्ञानदाने गश्मीरचा पाहुणचार अगदी थाटामाटात केला. त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवले होते. त्याची एवढी ख्यालीखुशाली राखताना पाहून आर्यनची बेचैनी क्षणोक्षणी वाढत होती. गश्मीर जेवण करून त्याच्या घरी गेल्यानंतरही ज्ञानदा गश्मीरचं कोडकौतुक करतच होती. त्यामुळे आर्यनने तोंड फुगवून घेतले अन् तो लवकरच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी परत ते चौघे शाळेत गेले. परत कार्यक्रम सुरू होईपर्यंत ज्ञानदा आणि गश्मीर एकमेकांशी गप्पा मारत बसले. त्या दोघांच्या गप्पागोष्टींमध्ये आर्यनची कोंडी होत होती. तो निव्वळ गप्प बसून राहायचा. त्यात तो फार एकाकी पडला होता. 


                एव्हाना त्याच्या मनात ज्ञानदाविषयी प्रेम निर्माण व्हायला लागलं होतं; पण त्यात गश्मीर अडथळा ठरत असल्याचं आर्यनला वाटत होतं. यामुळे सुद्धा आर्यनच्या मनात ईर्ष्या जागी होत होती. शिवाय ज्ञानदा गश्मीरला अति महत्त्व देतेय, असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याला कुठे ना कुठे डावलले जाण्याची भीती वाटत होती. त्याचबरोबर गश्मीरचा ज्ञानदासोबत फ्लर्ट करण्याचा अंदाज पाहून साहाजिकच तो पझेसिव्ह आणि जेलस फील करत होता. ज्ञानदा मात्र गश्मीरसोबत मैत्रीपूर्णच बोलायची आणि गश्मीरही जरी ज्ञानदासोबत फ्लर्ट करत असला, तिच्याशी थट्टामस्करी करत असला वा तिच्याशी लगट करत असला तरी त्यात त्याचा गैर हेतू नव्हता. तोसुद्धा मैत्रीची मर्यादा जाणून होता. फक्त त्याचं आणि ज्ञानदाचं नातं आधी जसं होतं अगदी त्याच पद्धतीने तो तिच्याशी वागायचा; पण आर्यनला त्याची खबर नव्हती व तो उगाच गश्मीरविषयी स्वतःच्या मनात गैरसमज करून घेत होता. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//