वाट हळवी वेचताना (भाग-६०)

बापलेकाची कहाणी

                आर्यन अप्रत्यक्षरित्या त्याचं प्रेम व्यक्त करत होता अन् त्यापासून अनभिज्ञ ज्ञानदा तिच्या जबाबदाऱ्या नित्यनेमाने पार पाडत होती. अशाप्रकारे दिवस सर्व होते व त्या दोघांचा संसार सुरू होता. दरम्यान दर्शन आणि शिवाक्षीच्या शाळेत डान्स कॉम्पिटीशन होती, त्यात सर्व पालकांनाही उपस्थित राहायला सांगितले होते. स्पर्धेचे आयोजन शनिवार आणि रविवार बघून करण्यात आले होते म्हणून आर्यनने उपस्थित राहायला होकार कळविला. त्या स्पर्धेत शिवाक्षी आणि ज्ञानदाने सहभाग घेतला होता. त्यांची तालीम ज्ञानदानेच घेतली होती. त्यामुळे त्या स्पर्धेसाठी ताम्हणकर कुटुंब फार उत्साहित होतं. स्पर्धेच्या दिवशी ते चौघेही छान तयार झाले अन् शाळेत पोहोचले.


                शाळेत पोहोचल्यावर दर्शन आणि शिवाक्षी त्यांच्या डान्सची प्रॅक्टीस चेंजिंगरुममध्ये करत बसले होते. तर ज्ञानदा आणि आर्यन प्रेक्षक खुर्च्यांवर बसले होते. कार्यक्रम अद्याप सुरू व्हायचा होता म्हणून ते दोघे गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात आर्यनला ऑफिसमधून कॉल आला. तो कॉल रिसिव्ह करायला थोडा दूर गेला आणि कॉलवर बोलू लागला. तोपर्यंत ज्ञानदाजवळ एक व्यक्ती आला आणि तिचा हात पकडून थोड्या अंतरावर घेऊन गेला आणि तिच्याशी बोलू लागला. 


                कॉलवर बोलून झाल्यावर आर्यन त्याच्या जागेवर आला तर तिथे त्याला ज्ञानदा दिसली नाही. त्याने सभोवती नजर फिरवली तर एका कोपऱ्यात ती एका समवयस्क मुलाशी हसून बोलताना त्याला दिसली. तेवढ्यात त्या दोघांनी हसून एकमेकांना टाळी दिली आणि ते पाहून आर्यनच्या भुवया आपोआप उंचावल्या. त्याने त्याचा अंगठा कपाळावर घासला आणि तो त्या मुलाकडे रागाने पाहत ज्ञानदाजवळ गेला व तिच्या बाजूला उभा राहिला. 


आर्यनला पाहताच ज्ञानदा परत मंद हसली आणि त्या मुलाला उद्देशून म्हणाली, " जी, हा आर्यन! " 


" ओह, तर हे आहेत आर्यनराव! माझे लव्ह रायवल! " तो मुलगा ज्ञानदाला डोळा मारत बोलला. 


" जी! गप्प बस की! काहीही बोलू नकोस हं! " ज्ञानदाने मस्करीत त्या मुलाच्या खांद्याला चापट मारली. 


त्यावर तो मुलगा म्हणाला, " का? मी का गप्प बसू? जे खरंय ते खरंच आहे ना! हे आहेत माझे लव्ह रायव्हल तर आहेत. किंबहुना आपल्या प्रेमाचा त्रिकोण तर यांनीच केलाय ना! "


" आता पुरे हं! " ज्ञानदा नाटकी रुसत बोलली. 


त्यावर त्या मुलाने तिचे गालगुच्चे घेतले आणि म्हणाला, " ऑ! रुसुबाई! किती गं रुसतेस! मस्करी केली मी, तुला माहितीये ना! " तो मुलगा मिश्किल हसत म्हणाला. त्यावर ज्ञानदाही खळखळून हसली; पण त्या दोघांचा संवाद ऐकून, त्या मुलाची ज्ञानदाशी लगट करताना बघून आर्यनला संताप आला आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली.


तो उसने हसत होता पण त्याने मुठी घट्ट आवळल्या होत्या. तो बळेच हसून ज्ञानदाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. ज्ञानदाचेही आर्यनकडे लक्ष गेले अन् ती त्याला म्हणाली, " आर्यन, हा माझा बालपणीचा मित्र, माझा बेस्ट फ्रेंड जी! आय मीन गश्मीर! " 


ज्ञानदाने ओळख करून दिली तरी तो गश्मीरकडे आश्चर्याने पाहत होता. त्याच्या आठ्या पाहून ज्ञानदाचा मित्र मिश्किल हसत ज्ञानदाला उद्देशून बोलला, " डी? तू आर्यनला माझ्याबद्दल नाही सांगितलंस? त्यांना माझी तोंडओळखही नाहीये. निदान आपला फोटो अल्बम तरी दाखवायला पाहिजे होता ना... दिस इज नॉट फेअर हं! मी प्रपोज केलं होतं त्याचा तुला एवढा राग? " 


" ए दिडशहाण्या? असं काही नाहीये. तुझ्याबद्दल आर्यनला सांगायला मला संधीच मिळाली नाही म्हणून... बाकी मी तुला नकार दिला होता म्हणून राग तुलाच आला होता. " ज्ञानदा गश्मीरला बोलली. 


" हो! राग तर आला होता. " गश्मीर उदास होत बोलला. 


" जी, खरंच? " ज्ञानदाने लगेच गश्मीरचा चेहरा ओंजळीत घेत विचारले अन् तिला तसे करताना पाहून आर्यनला जेलस फील झाले. एकीकडे आर्यन मुठी आवळूनच उभा होता; दुसरीकडे त्या दोघांचा संवाद सुरूच होता. 


त्यामुळे ईर्ष्या वाटून आर्यनने घसा खाकरला आणि त्याने त्या दोघांच्या संवादात उडी घेतली. त्याने ज्ञानदाला मिठीत घेतलं आणि बळेच हसून तो गश्मीरला उद्देशून बोलला, " अं, गश्मीर तू आमच्या लग्नाला का नव्हता आलास? " 


" हिने मला नकार दिला होता ना म्हणून! " गश्मीर गालातल्या गालात मंद हसत बोलला. 


" जी! मार हवाय का? " ज्ञानदा गश्मीरला ठोसा दाखवत बोलली. 


त्यावर गश्मीर मंद हसला आणि बोलला, " हाय, डी! मेरी जान... तू जे देशील ते प्रिय आहे मला! " 


                गश्मीरच्या वाक्यावर ज्ञानदाने डोळे बारीक केले अन् ती आर्यनच्या मिठीतून बाहेर निघली आणि गश्मीरच्या पाठीत हळूच ठोसे मारू लागली. दुसरीकडे गश्मीरच्या तोंडातून 'मेरी जान' हे शब्द ऐकल्यावर आर्यन आणखीच चिडला. शिवाय ज्ञानदाही गश्मीरसोबत बिनधास्त वावरत असल्याने आर्यनला गश्मीरचा हेवा वाटू लागला; म्हणून तो रागाने धुसफूस करत गश्मीरकडे पाहत होता.



क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


🎭 Series Post

View all