Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग-५९)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग-५९)

                दर्शिकाचे बोल आठवून आर्यनच्या हृदयाची स्पंदने वाढली होती. तो मोठमोठ्याने श्वास घेऊ लागला. थोड्या वेळाने तो नॉर्मल झाला. त्याने परत डोळे मिटले व तो दर्शिका त्याच्या स्वप्नात जे काही बोलली ते आठवण्याचा प्रयत्न करू लागला. हळूहळू त्याला आठवायला लागले अन् तो स्वप्नात रममाण झाला. 


स्वप्नात दर्शिका त्याला म्हणाली, " मला माहीत आहे की, तुलाही तिला हर्ट करायचं नाहीये पण कळत-नकळत घडतात काही चुका तुझ्याकडून, हे तुलाही माहिती आहे! म्हणून विचार कर तिच्या मनाचा! विचार कर की, तिच्या चारित्र्यावर प्रश्न उचलणाऱ्या त्या सर्व शंका किती पोखरून टाकत असतील तिच्या हळव्या मनाला? तिला काय वाटत असेल? तू मला विसर असं मी म्हणत नाहीये. फक्त तू ज्ञानदाला ती जे प्रेम डिझर्व्ह करते निदान तेवढं तरी तिला लाभू दे! तिचा स्वीकार कर! ती आपल्या दोघांच्या नात्यात येतेय, असं तुला वाटत असेल तर हा विचार तुझ्या मनातून झटकून टाक. सगळं विधिलिखित असतं राजा! शिवाय ती आपल्या दोघांत कधीच आली नाही... त्याउलट तिने तिचं सर्वस्व आपल्याला अर्पण केलंंय. 


                तिने दर्शनवर सख्ख्या आईसारखी माया केलीय. तिच्या मनाला त्याची काळजी कायम असते. त्याला ती शिवाक्षीप्रमाणेच जपते. एवढेच नव्हे तर, तुझ्यासाठी ती काहीही करायला तयार असते. तुझ्याबद्दल तिला कुणीही, कितीही नकारात्मक बाब सांगितली तर ती त्या नकारात्मक विचारांना जराही वाव देत नाही. किंबहुना ती कुणाला तुझ्याविरूद्ध नकारात्मक बोलूच देत नाही. तुझी बाजू उचलून धरते. कितीही संकटे आली तरी तुझ्या सोबतीने उभी राहते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ कळत असूनही तिने तुझा विचार केला. दर्शनचा विचार केला आणि तिचा होकार कळवला. तिने तिच्या तुझ्यासोबत लग्नाचा करार केला म्हणण्याऐवजी तिने तिच्या स्वाभिमानाचा तुझ्याशी करार केला असं नाही का वाटत तुला? 


                तो अभेद्य तिला तिच्या चारित्र्यावरून नको नको ते बोलला कशामुळे? ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यामुळेच ना? पण तरीही तिने तुला एक शब्द म्हटला नाही; पण ती काहीच बोलली नाही म्हणून तू सुद्धा स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीस? आणि मला सांग ही पट्टी आणखी किती दिवस अशीच बांधून ठेवणार आहेस? कधीतरी सत्याला सामोरे जावे लागेल ना? प्लीज, आरू समजून घे! माझं ऐक, आपल्या दोघांच्या आठवणींना जपून तू ज्ञानदाबरोबर नवी सुरूवात कर. ज्ञानदाला तिचा अधिकार दे, तिला तिच्या हक्काचं प्रेम दे! माझी शेवटची इच्छा पूर्ण झाल्याची खात्री दर्शनला झाली असेल पण वास्तव तुझ्यापुढे उघड आहे. 


                मला तुला आनंदात पाहायचंय, ज्ञानदासोबत नवी सुरुवात करताना पाहायचंय. माझी शेवटची इच्छा फक्त माझ्यापुरती नाहीये. आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी आहे. म्हणून मी अपेक्षा करते की, तू माझं ऐकशील! काळजी घे स्वतःची. दर्शनसह शिवाक्षी आणि ज्ञानदाचीही काळजी घे आणि मी जे काही बोलली त्यावर सिरियसली विचार कर. तू माझ्यावर प्रेम करतोस ना मग आता माझ्यासाठी ज्ञानदावरही प्रेम करून बघ, नवी सुरुवात करून बघ आरू! माझा आरू मला कायम हवा आहे. आठवणीत झुरणारा, स्वतःलाच दोषारोप देणारा आर्यन नको होऊस अन् तुझ्यातला माझा 'आरू' जपून ठेव. ऑफकोर्स आय लव्ह यू बट शी इज अल्सो फॉलिंग फॉर यू! " 


                एवढे बोलून आर्यनला दर्शिकाची प्रतिमा दिसेनाशी झाली होती अन् तोपर्यंत त्याला जाग आली होती. अख्खं स्वप्न आठवल्यानंतर आर्यनच्या मनात दर्शिकाचे शब्द गुंजत होते. त्यानंतर त्यानेही मनात निश्चय केला अन् दर्शिकाने स्वप्नात जे काही सांगितले त्यावर सिरियसली विचार करण्याचा ध्यास घेतला. 


                खरंतर, आर्यनला स्वप्न वा त्याच्याशी संबंधित संकल्पनांवर विश्वास नव्हता पण कदाचित त्यालाही ज्ञानदाची काळजी वाटत होती. त्यामुळे त्याच्याच मनातील शंकाकुशंकाचे निरसन दर्शिकाच्या निमित्ताने त्याने स्वप्नाद्वारे स्वतःच केले असावे. असो... पण त्या स्वप्नामुळे त्या दिवसानंतर आर्यन आणि ज्ञानदामध्ये कदाचित हळूहळू जवळीकता निर्माण झाली होती. आर्यन सावकाश का होईना पण ज्ञानदाला खऱ्या अर्थाने पत्नीचा मान देण्यासाठी प्रयत्न करत होता. तो ज्ञानदाची काळजी घेऊ लागला अन् नवी सुरुवात करण्याचा मनापासून प्रयत्न करू लागला; पण आर्यनमधील हे बारीकसारीक बदलाव ज्ञानदाच्या लक्षात येत नव्हते अन् आर्यननेही बळजबरीने तिच्या लक्षात आणून दिले नाही. 


                आर्यन त्याच्या परीने त्याचे प्रयत्न करत होता पण त्याचे छोटेमोठे प्रयत्न पाहता शिवाक्षीला लगेच अंदाज आला. तिने आर्यनला विचारपूस केली अन् आर्यननेही ओशाळून कबुली दिली. त्यावर शिवाक्षीने त्याला ऑल द बेस्ट विश केले अन् प्रयत्न सुरू ठेवायला सांगितले. शिवाय ती ज्ञानदाला याबाबत कसलीच पूर्वसूचना देणार नाही, असे वचनही आर्यनला दिले; कारण आर्यनला स्वतः ज्ञानदाचं मन जिंकायचं होतं अन् त्यासाठीच तो हा अख्खा खटाटोप करत होता. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//