वाट हळवी वेचताना (भाग-५८)

बापलेकाची कहाणी

थोडा वेळ श्वास घेऊन आर्यनने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, " त्यानंतर मी इन्स्पेक्टर श्रीनिवास यांची पर्सनली भेट घेतली आणि त्यांच्याकडे तो फोन नंबर दिला व त्यांना इत्थंभूत माहिती काढायला सांगितली. त्यानंतर ते कामाला लागले. त्यानंतर तू काही दिवस नॉर्मल वागत होतीस. मला वाटलं कदाचित सगळा प्रॉब्लेम सुटला असावा पण परवाच मी जेव्हा माझा वकील मित्र संकेत गोडसे याच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा इन्स्पेक्टर श्रीनिवास यांनी मला त्या फोन नंबरची माहिती दिली. " 


" संकेत गोडसे? म्हणजे तेच ना ज्यांनी आपल्या लग्नाचा लीगल कॉन्ट्रॅक्ट बनवला होता. " ज्ञानदा शंका व्यक्त करत बोलली. 


" हो तोच! तर जेव्हा मी त्याच्याकडे गेलो होतो. तेव्हा इन्स्पेक्टर श्रीनिवास यांनी मला कॉल केला आणि सांगितले की, तो फोन नंबर अभेद्य वानखेडेच्या ड्रायव्हरचा आहे. मला काही अंदाजच लागला नाही कारण अभेद्यचा ड्रायव्हर आपल्याला ओळखतंही नाही तर त्याचं आपल्यासोबत काही वैर असणं मुळात अशक्य होतं. मी विचार करत असतानाच संकेत मला बोलला की, काही दिवसांपूर्वी त्याच्या ऑफिसमध्ये अभेद्य वानखेडे त्याला भेटायला गेला होता आणि त्या भेटीगाठी दरम्यान त्याला आपल्या लग्नाचा तो कॉन्ट्रॅक्ट दिसला. " 


" काय? " ज्ञानदाने आश्चर्याने विचारले. 


" हो! अशाप्रकारे त्याला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळलं. " आर्यन बोलला. त्यावर ज्ञानदाने हुंकार भरला. त्यानंतर तो पुढे बोलू लागला, " संकेतने जी माहिती दिली त्यावरून मग मला अंदाज आला की, तुला ब्लॅकमेल करणारा व्यक्ती अभेद्यच आहे; पण माझ्याकडे त्याच्याविरुद्ध पुरावा नव्हता म्हणून लीगल ऍक्शन घेता येत नव्हती म्हणून मी संधीची वाट पाहत होतो; पण तत्पूर्वी सजगता बाळगून मी तुझ्या मोबाईलमध्ये, घड्याळामध्ये आणि कारमध्ये जीपीएस ट्रॅकर लावलं जेणेकरून तुझ्या जीवाला कोणताही धोका नसेल अन् तू कुठेही गेलीस तर त्याची खबर मला असेल. शिवाय मी तुझा नंबर टॅप करत होतो म्हणून परत जेव्हा त्याने तुला केला तेव्हा मलाही माहिती मिळत गेली. त्यानंतर त्याला वाटत गेले की, तो तुला मजबूर करतोय, त्याच्या इशाऱ्यावर नाचवतोय पण प्रत्यक्षात तोच जाळ्यात अडकत गेला. 


                त्यानंतर मी मुद्दाम मिटींगचा बहाणा केला अन् दुरून तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. तू घराबाहेर पडलीस तर तुझ्यामागे मी सुद्धा होतो; पण मध्येच दर्शन आणि शिवाक्षीचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यांना उत्तर देणे भाग होते म्हणून मी कॉल रिसिव्ह केला. त्यांच्याशी बोलताना मला तुझ्याजवळ पोहोचायला उशीर झाला. अन्यथा त्या नीच अभेद्यला तुला स्पर्श करायची संधी मी दिलीच नसती. आय ऍम सॉरी फॉर कमिंग लेट ज्ञानदा... "


आर्यन उदास स्वरात दिलगिरी व्यक्त करू लागला. ज्ञानदाने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, " इट्स ओके! तुझी काहीच चुकी नव्हती! तू माफी नको मागू! तू माझ्या पाठीशी कायम होता, माझ्यासाठी हेच पुरेसं आहे. "


                ज्ञानदाच्या वाक्यावर आर्यनने हुंकार भरला. त्यानंतर त्या दोघांनी त्यांचा नाश्ता आटोपला व ते त्यांच्या कामाला लागले. दिवस सरताच सायंकाळ झाली. ज्ञानदा तिच्या माहेरी गेली अन् दर्शन आणि शिवाक्षीला परत घरी घेऊन आली. 


                आणखी काही दिवस गेले. सर्व काही व्यवस्थित सुरू होतं. ते चौघेही आनंदी होते; पण एक दिवस आर्यन झोपलेला असताना त्याला दर्शिकाचे स्वप्न पडले. त्यामुळे त्याला अचानक जाग आली. तो उठून बसला व आळीपाळीने एकदा दर्शिकाच्या फोटोकडे अन् एकदा त्याच्याच बाजूला बेडवर झोपून असलेल्या ज्ञानदाकडे पाहू लागला. 


त्याचा घसा कोरडा पडला होता म्हणून तो खोलीतून बाहेर गेला अन् हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसला व तिथे बसून तो त्याचं स्वप्न आठवू लागला. त्या स्वप्नात दर्शिका त्याला म्हणाली, " आरू, ज्ञानदाला आणखी किती दिवस छळशील? तिला तिचा अधिकार द्यावासा वाटत नाही का तुला? मी तुझ्या सोबतच आहे पण तिला तिच्या हक्काचं प्रेम तर लाभू दे! ती निस्वार्थ होऊन तिचा जीव ओवाळून टाकते, अख्खं घर सांभाळते, आपल्या दर्शनची काळजी घेते... ते सुद्धा कसलीही अपेक्षा न बाळगता... पण म्हणून तिच्या नशिबी वाट पाहणेच का? ती तुला समजून घेते, तुला आधार देते फक्त एक मैत्रीण म्हणून नव्हे तर बायको या नात्याने मग तू देखील तिला खऱ्या अर्थाने बायको म्हणून का स्विकारत नाहीस? 


                तिने तुला माझ्यासकट, दर्शनसकट आणि तुझ्या भूतकाळासकट स्विकारलंय मग तू सुद्धा तिला तिच्या हक्काचं प्रेम अन् तुझ्या हृदयात जागा का देत नाहीस? तिने तुझ्यावर कसलीच जबरदस्ती केलेली नाहीये पण म्हणून तू तिला आजन्मभर झुरत ठेवशील का? तिचा काहीही दोष नसताना तिला शिक्षा देणार आहेस का? आपण जगलेल्या आठवणी तुझ्या सोबत आहेच की... मग आता नव्याने तिच्यासोबत नवीन आठवणी निर्माण करायला काय हरकत आहे? " दर्शिकाचे शब्द त्याच्या कानात गुंजत होते अन् तेवढ्यात आर्यनने परत डोळे उघडले. 



क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


🎭 Series Post

View all