वाट हळवी वेचताना (भाग-५७)

बापलेकाची कहाणी

आर्यन हॉलमध्ये गेला आणि त्याने एक कॉल लावला. तो कॉलवर बोलत म्हणाला, " इन्स्पेक्टर त्याला जामीन मिळता कामा नये. त्याच्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करा पण त्याची सुटका होऊ देऊ नका. जर यात तुमची काही हरकत असेल तर त्याला माझ्या ताब्यात द्या. पुढचं पुढे मी बघून घेईल. "


पलिकडून इन्स्पेक्टर बोलले, " नाही, त्याची काही गरज लागणार नाही आर्यन सर! आम्ही या अभेद्य वानखेडेची ख्यालीखुशाली राखतो. आज आम्हाला संधी द्या पाहुणचाराची! तुम्ही निश्चिंत राहा! " 


" अपेक्षा करतो की, तुम्ही मला दिलेला शब्द पाळाल. बरं, आता ठेवतो फोन! " आर्यन बोलला अन् त्याने थोडा उसासा घेतला. नंतर त्याने घरीच साधं जेवण बनवलं अन् तो ताट वाढून घेत त्यांच्या खोलीत गेला. 


                ज्ञानदा बेडवर डोळे मिटून पडून होती. आर्यनने तिला हाक मारली पण तिने प्रतिसाद दिला नाही. त्याने तिच्या गालावर थापटले तर त्याला तिच्या अंगात ताप जाणवला. त्याला लगेच तिची काळजी वाटली. त्याने किचनमध्ये जाऊन लगेच थंड पाणी आणले आणि तो ज्ञानदाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागला. हळूहळू ज्ञानदाने कण्हतच डोळे उघडले.


                आर्यनने तिला जेवून घ्यायला सांगितले पण ती नकार देत होती; म्हणून त्याने स्वतः तिला जेवण भरवले. तिनेही मग निमूट जेवून घेतले. त्यानंतर आर्यनने तिला क्रोसीन दिली. क्रोसीन घेतल्यानंतर ती परत झोपून गेली. आर्यननेही थोडं जेवून घेतलं आणि दिग्विजय कर्वे यांना कॉल केला व दर्शन आणि शिवाक्षीला आणखी काही दिवस तिथेच ठेवायला सांगितले. त्यांनीही होकार कळवला. नंतर त्याने दर्शन आणि शिवाक्षीला कॉल करून त्यांची विचारपूस केली. तसेच आजी-आजोबांना त्रास देऊ नका असेही त्यांना बजावले. त्यांनीही त्याला दुजोरा दिला व कॉल आटोपला. 


               कॉलवर बोलून होताच आर्यन त्याचं ऑफिसवर्क करू लागला; पण एव्हाना त्याच्याही डोक्यात ज्ञानदाचा विचार डोकावू लागला. ती जे शब्द बोलली ते आठवून त्याला तिची आणखी काळजी वाटू लागली. त्यामुळे असंख्य विचार करत तो सोफ्यावर डोळे मिटून बसून राहिला नि पाहता पाहता त्याचा डोळा लागला. 


                दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानदाला लवकर जाग आली. ताप कमी झाला होता त्यामुळे तिला फ्रेश वाटत होतं. ती बाथरुममध्ये तिचं आवरायला निघून गेली. त्यानंतर ती बाहेर आली तर तिला सोफ्यावर आर्यन झोपून दिसला. ती परत खोलीत गेली अन् अंथरून घेऊन बाहेर आली. त्यानंतर तिने ते अंथरून आर्यनवर पांघरले. तेवढ्यात तिचं लक्ष आर्यनच्या चेहऱ्याकडे गेलं. ती काही क्षण त्याला पाहतच राहिली. तेवढ्यात आर्यनला जाग आली अन् त्याने डोळे उघडले. दोघांचीही नजरानजर झाली. त्याने एकाएकी डोळे उघडल्याने ज्ञानदाही दचकली. 


एक ऑकवर्ड वातावरण तिथे निर्माण झालं होतं. त्या दोघांनी लगेच नजरा वळवून घेतल्या पण नंतर दोघांनीही खोल श्वास घेतला अन् एकमेकांकडे पाहून मंद हसले. त्यानंतर ज्ञानदा स्मित करत आर्यनला म्हणाली, " गुड मॉर्निंग! तुझी झोप झाली नसेल तर आत खोलीत जाऊन आराम करू शकतोस. "


" गुड मॉर्निंग! आणि नको! झालीय माझी झोप! " आर्यन बोलला. 


" बरं! " ज्ञानदा बोलली. 


" ह्म्म! बाय द वे तुझी तब्येत आता कशी आहे? " आर्यन ज्ञानदाजवळ जाऊन तिच्या कपाळावर हात ठेवून तिचा ताप चेक करत बोलला. 


" मला काय व्हायचंय? मी एकदम ठणठणीत! " ज्ञानदा मंद हसत बोलली. 


" हो! ठणठणीत म्हणे! मग रात्री कोण तापाने फणफणत होतं? " आर्यन एक भुवई उंचावून विचारू लागला. 


" ती... ती मी नव्हेच! " ज्ञानदा ओठातलं हसू दाबत बोलली. 


" हो का! " आर्यनही मंद हसला. त्यावर ज्ञानदानेही हसून हुंकार भरला. त्यानंतर तो फ्रेश व्हायला खोलीत निघून गेला तर ज्ञानदा चहा आणि नाश्त्याची सोय करू लागली. 


आवरून होताच आर्यन बाहेर आला. त्याने थोडा व्यायाम केला. नंतर त्याची आंघोळ आटोपल्यावर ते दोघेही नाश्ता करू लागले. नाश्ता करताना ज्ञानदा आर्यनला काल रात्रीच्या प्रसंगाबद्दल विचारपूस करू लागली. तिने त्याला विचारले, " आर्यन, तुला कसं कळलं की, मी त्या हॉटेलमध्ये गेलीय आणि मी धोक्यात आहे. "


" ऍक्च्युअली काही दिवसांपासून मला तुझ्यात बदल जाणवत होते. पहिल्यांदा मला वाटलं मुड स्विंग्ज असावेत म्हणून मी थोडं दुर्लक्ष केलं पण काळजी काही केल्या कमी होईना... म्हणून मी शिवाक्षीसोबत बोललो तर ती बोलली की, तू मोबाईलकडे बघून कसल्याशा विचारात हरवलेली होतीस. त्यामुळे ज्या रात्री तू लवकर झोपली होतीस तेव्हा मी तुझा मोबाईल चेक केला. कॉललिस्टमध्ये मला तो अनोळखी नंबर दिसला. मी तो नंबर माझ्याकडे लिहून घेतला. त्यानंतर कॉल रेकॉर्डिंग चेक केली. त्यात तो व्यक्ती जे काही बोलला त्यावरून मला कळले की, तो व्यक्ती तुला ब्लॅकमेल करतोय. " आर्यन सविस्तर सांगत होता अन् ज्ञानदा लक्षपूर्वक ऐकत होती. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.



🎭 Series Post

View all