वाट हळवी वेचताना (भाग-५६)

बापलेकाची कहाणी

                अभेद्य न थांबता विक्षिप्त हसत होता म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आर्यनने बाहेर थांबलेल्या पोलिसांना आवाज दिला आणि अभेद्यला अटक करायला सांगितलं. पोलीस आर्यनचा आदेश ऐकून अभेद्यला खेचतच त्या खोलीबाहेर घेऊन गेले. सर्वजण जाताच त्या खोलीत फक्त आर्यन आणि ज्ञानदा होते. ज्ञानदा अजूनही त्या धक्क्यातून सावरली नव्हती. तिला वारंवार अभेद्यचा किळसवाणा स्पर्श अन् त्याचे ते जीवघेणे शब्द आठवत होते आणि ते सर्व आठवून ती रडत होती. 


                आर्यन तिच्याजवळ गेला. ती अलगद त्याच्या मिठीत शिरून रडू लागली. आर्यनला तिची दया येत होती अन् त्याच्या दुप्पट अभेद्यचा राग येत होता. त्याने घट्ट मुठी आवळल्या आणि अभेद्यला त्याच्या कर्माची शिक्षा देण्याचा त्याने मनोमन निश्चय केला. ज्ञानदा मात्र शांत व्हायला तयार नव्हती. आर्यन तिची समजूत घालू लागला पण ती ऐकेना. 


ती तिचा हुंदका आवरत म्हणाली, " बरोबर बोलत होता ना तो अभेद्य? मी माझ्या चारित्र्याचा तुझ्याशी सौदा केला ना... मी खरंच चारित्र्यहिन स्त्री आहे ना! "


" अगं ए ज्ञानदा... असा विचार नाही करायचा गं! तो विक्षिप्त आहे डोक्याने म्हणून तो तुला काहीही बोलत होता. तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस. " आर्यन ज्ञानदाचे अश्रू पुसत बोलला. 


" आज त्याला आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळलं म्हणून आज तो असा बोलला. उद्या जगाला माहीत पडलं तर अख्खं जगही तेच बोलणार ना? म्हणजे माझी शिवा सुद्धा हाच विचार करत असेल का माझ्याबद्दल? तिलाही मी कॅरेक्टरलेस वाटत असेल का? " ज्ञानदा रडत रडत एकटीच प्रश्न विचारत होती. तिचे प्रश्न ऐकून आर्यनचा गोंधळ उडत होता.


तो तिला सावरण्याचा प्रयत्न करत बोलला, " अगं ज्ञानदा, तू काय बोलतेय? तुझं तुला तरी कळतंय का? शिवाला माहिती आहे तिची मम्मा कशी आहे, म्हणून तू काहीही विचार करू नकोस. शांत हो बघू! " 


" आर्यन, उद्या जर दर्शनला माहिती पडलं तर? तर तो सुद्धा मला असंच बोलणार का? तो ही मला विचारेल का, आपल्या दोघांत काय नातं आहे म्हणून? आपल्या दोघांत नवरा-बायकोसारखे संबंध नसताना मी तुझ्या घरी का राहते म्हणून? जगापुढे मी दिखावा का करते म्हणून? तो ही उद्या मला आई बोलताना कचरेल का? तो ही मला उद्या कॅरेक्टरलेस बोलणार का? " ज्ञानदाला जणू मानसिक धक्का बसला होता. 


ती विचार न करता मनात येईल ते बोलत होती पण तिचे शब्द ऐकून आर्यन आताशा चिडला आणि सरतेशेवटी त्याने तिच्या कानशीलात चापट मारून तो तिला भानावर आणले व तो तिला म्हणाला, " ज्ञानदा? "


आर्यनने चापट मारताच ज्ञानदा भानावर आली. ती गालावर हात ठेवून पाणावलेल्या डोळ्यांनी आर्यनकडे पाहत राहिली. तो तिला म्हणाला, " ज्ञानदा काय बोलतेय तू? तुला तरी कळतंय ना... असा काहीही विचार करू नको. दर्शन आणि शिवा कधीच तुला असे अपशब्द वापरणार नाहीत. तू त्या अभेद्यचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. शांत हो! " 


आर्यनने समजूत घालताच ज्ञानदा हळूहळू सावरू लागली. आर्यन तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवर थोपटून शांत करू लागला. तीसुद्धा मिठीत शिरून मुळमुळ रडत होती. तिचा आक्रोश व्यक्त करत होती. म्हणून आर्यनने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तो तिला उद्देशून म्हणाला, " शुश! आता शांत हो बघू! खूप रडलीस आतापर्यंत... आता आणखी नाही. सांभाळ स्वतःला! "


                आर्यनने समजूत घालताच ज्ञानदा हळूहळू शांत झाली. आर्यनने लगेच तिचे डोळे पुसले आणि तिचा चेहरा नीट केला. तसेच तिचे केस सावरले. नंतर त्याने तिचा पदर नीट केला व त्याचा कोट तिला नीट घालून दिला. मग त्याने तिला त्याच्या मिठीत घट्ट जखडून घेतले व नंतर ते दोघे हॉटेलबाहेर आले. त्यानंतर त्याने तिला कारमध्ये बसवले व तो स्वतः कार ड्राईव्ह करू लागला. 


                थोड्या वेळात ते त्यांच्या घरी पोहोचले. ज्ञानदा लगेच खोलीत गेली अन् बाथरुममध्ये शिरली. तिने शॉवर सुरू केला अन् ते पाणी तिच्या अंगावर पडू लागलं. त्या शॉवरच्या सरींमध्ये तिला त्या हॉटेलमधल्या खोलीत घडलेला अख्खा प्रसंग आठवत होता. ते आठवून तिला आपोआप रडू येत होता. तिच्या मनाला एकच प्रश्न शिवत होता की, जर आर्यन वेळेत पोहोचला नसता तर आज तिच्यासोबत बरंच काही अनिष्ट घडलं असतं. थोड्या वेळाने ती शॉवर घेऊन बाहेर आली. तिने कपडे चेंज केले अन् ती बेडवर डोळे मिटून बसून राहिली. 


                काही वेळाने आर्यन खोलीत आला. त्याला ज्ञानदाचा रडवेला चेहरा दिसला अन् त्याचा राग पुनश्च उफाळून आला. तो बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेला. त्यानंतर त्याचं आवरून होताच त्याने ज्ञानदाकडे एक नजर पाहिले. तिचा निस्तेज चेहरा पाहून तो मुठी आवळून बाहेर गेला. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


🎭 Series Post

View all