Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग-५५)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग-५५)

ज्ञानदाला दर्शन आणि शिवाक्षीची लगेच काळजी दाटून आली पण तरीही चेहऱ्यावर ती भीती न दर्शविता ती अभेद्यला म्हणाली, " अरे भ्याड! त्या लेकरांना कशाला मोहरा बनवतोय? हिंमत असेल तर एकटा नड ना... " 


" हो गं भ्याडंच आहे मी आणि नाहीये माझ्यात हिंमत! पण हं, बुद्धी माझी तल्लख आहे; म्हणून तुझ्या या गोष्टी ऐकून उगाच फ्लोमध्ये तुला टक्कर देण्याची चूक मी करणार नाही. म्हणून मी त्या आर्यनच्या मुलाला आणि तुझ्या मानस पोरीलाच मोहरा बनवून तुला कंट्रोल करणार आहे. बघ, आहे ना मी हुशार! " अभेद्य परत ज्ञानदाला घाणेरडा स्पर्श करत बोलला. 


त्यावर त्याला ज्ञानदा बोलली, " हुशार नाही. नीच आहेस तू! " 


" तू काहीही म्हणालीस तरी मला काहीच वाटणार नाही. म्हणून बोल तू तुला वाटेल ते... " अभेद्य खिदळत बोलला. 


ज्ञानदा त्याला शिवागीळ करत होती अन् तेवढ्यात तो बोलला, " शुश! आतापर्यंत तू खूप बोललीस आता मी जसं म्हणेल तसं करायचं. कळलं? नाहीतर मी एक कॉल करताच एकीकडे तुझी ती मुलं आणि तुझे आईवडील स्वाहा होतील आणि दुसरीकडे तुझा नवरा स्वाहा होईल अन् क्षणात तुझ्या कुटुंबाची, तुझ्या जीवाभावाच्या माणसांची राख होईल. म्हणून आता मी म्हणतोय ते करायचं. " 


त्याचे शब्द ऐकताच ज्ञानदा गांगारून गेली. ती अविश्वासाने अभेद्यकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यात तिच्या कुटुंबाप्रती असणारी काळजी अन् प्रेम पाहून अभेद्य म्हणाला, " आता कसं? हीच भीती मला पाहायची होती. " 


                अभेद्य जोरजोरात हसू लागला. ज्ञानदाचा नाईलाज झाला होता. ती अगदी हतबल होऊन खिन्न उभी होती. हळूहळू तो एकेक पाऊल टाकत तिच्याजवळ येऊ लागला. तिने तिच्या मुठी आवळून घेतल्या. डोळे घट्ट मिटून घेतले. त्या मिटलेल्या डोळ्यातून अगणित अश्रूधारा वाहत होत्या. तिला यावेळी फक्त नि फक्त आर्यनची आठवण येत होती अन् दुसऱ्याच क्षणी अभेद्य तिच्या अगदी जवळ आला. 


                तो तिच्या अंगाला किळसवाणा स्पर्श करू लागला. त्याने तिचे केस अस्ताव्यस्त केले. तिच्या तळहातापासून गालापर्यंत त्याने त्याचं बोट फिरवलं अन् त्याच्या स्पर्शाने तिला मळमळून आलं. तिच्या अंगावर भीतीने काटा आला. त्याने त्याच्या एका हाताने तिचा पदरही खेचण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने तिच्या ओठांवरून त्याचं बोट फिरवलं त्यामुळे तिची लिपस्टिक अस्ताव्यस्त पसरली. तिला त्यावेळी हतबल झाल्यासारखे वाटत होते अन् तीच संधी साधून अभेद्य मात्र तिच्याशी लगट करत तिच्या ओठांच्या दिशेने झुकला. तो तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवणार होता अन् त्याचवेळी त्या खोलीचे दार कुणीतरी बाहेरून लात मारून तोडले. दार तुटल्याचा आवाज होताच ज्ञानदाने लगेच डोळे उघडले आणि दाराच्या दिशेने आशेने पाहिले तर तिला खोलीत आर्यन येताना दिसला अन् तिचा जीव भांड्यात पडला. 


                ती पाणावलेल्या डोळ्यांनी तिचं अंग लपवण्याचा प्रयत्न करत होती. आर्यनचं लक्ष तिच्याकडे जाताच तो लगेच खोलीत शिरला व त्याने त्याचा कोट ज्ञानदाच्या अंगावर झाकला व तिला मिठीत घेतलं. ती त्याच्या मिठीत शिरून अगदी हतबल होऊन रडत होती. त्याने तिच्या पाठीवर थोपटून तिला शांत केलं, तिचं सांत्वन केलं. ती शांत होताच त्याने त्याचा मोर्चा अभेद्यकडे वळवला. त्याने आधी त्याचा टाय सैल केला, शर्टाच्या बाह्या फोल्ड केल्या अन् नंतर तो अभेद्यला बेदम मारहाण करू लागला. अभेद्य फार रक्तबंबाळ झाला होता तरीही तो हसत होता. 


त्याला विक्षिप्त हसताना पाहून आर्यन आणखी चिडला आणि त्याने परत त्याच्या थोबाडीत पंच लगावले. तरीही तो विक्षिप्त हसत म्हणाला, " अरेरे! तुझ्या बायकोची इज्जत गेली म्हणून तू एवढा चिडलाय का? आता जगाला काय सांगशील बरं? तुझ्या बायकोसोबत मी बळजबरी केली हे सांगशील? आणि हे ऐकल्यावर लोक तुझ्या या बायकोला पवित्र समजतील? " 


" नालायक, नीच माणसा! आपल्या हद्दीत राहा. मला जगाची पर्वा नाहीये. मला माहीत आहे माझी बायको कशी आहे; म्हणून मला जगापुढे तिचं चारित्र्य सिद्ध करायची गरज नाहीये. कळलं? " आर्यन अभेद्यला ठोसा हाणत बोलला. 


" ओह! म्हणूनच तुझी बायको माझ्याकडे आली ना? बरोबर आहे, तू तिला वेळ देत नाही. ना तिला हवं तसं वैवाहिक सुख देतोय म्हणून ती असे बाहेरचे पर्याय शोधतेय ना... म्हणून ती माझ्या सांगण्यानुसार वागून ह्या खोलीपर्यंत आली ना! मी म्हटल्याप्रमाणे माझ्यासाठी ती मी पाठवलेली साडी नेसून या आडवळणाच्या हॉटेलमध्ये अन् या अंधाऱ्या खोलीत आली ना... व्वा रे व्वा! आदर्श नवरा-बायको... पण नवरा-बायको सुद्धा म्हणता येणार नाही ना तुम्हाला... शिव! शिव! शिव! म्हणजे तुमचं नातं... तसं आहे तर... " अभेद्य हिणवून बोलत होता. त्याच्या प्रत्येक शब्दाने आर्यनचा मनस्ताप होत होता. 


आर्यनने अभेद्यची कॉलर पकडली अन् म्हणाला, " आमच्या नात्याचं प्रमाण मला तुझ्याकडून नको आणि माझा ज्ञानदावर पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुझ्या नीच बुद्धीवरही विश्वास आहे; त्यामुळे तू ज्ञानदाला कशाप्रकारे मजबूर केलं असशील, याची खात्री मला आहे. म्हणून तिच्याबद्दल काहीही अपशब्द बोलून मला भडकविण्याचे पोकळ प्रयत्न तू करू नकोस. " आर्यनने दम दिला तरी अभेद्य मात्र विक्षिप्त हसत होता. ज्ञानदा मात्र अजूनही भेदरलेल्या अवस्थेत उभी होती. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//