वाट हळवी वेचताना (भाग-५४)

बापलेकाची कहाणी

                ज्ञानदाने तिची पर्स हातात घेतली, त्यात तिचा मोबाईल ठेवला अन् ती एकेक पाऊल टाकत बाहेरच्या दिशेने जाऊ लागली. तिचे पाय जड झाले होते, तिची इच्छाही मुळीच नव्हती पण जाण्याबिगर पर्याय नव्हता अन् म्हणून तिने घर लॉक केलं व ती तिची कार घेऊन बाहेर पडली. काही वेळाने ती त्या पत्त्यावर पोहोचली. तिने कार थांबवताच त्या व्यक्तीने तिला कारमधून बाहेर येण्यासाठी मॅसेजद्वारे सांगितले. ती कारबाहेर आली आणि कार लॉक केली. तिच्या एका हातात पर्स होती अन् दुसऱ्या हातात मोबाईल होता. त्या व्यक्तीने तिला जवळच्याच एका हॉटेलमध्ये जायला सांगितलं. त्यानंतर त्याने कॉल करून तिला रिसेप्शनिस्टकडून रुम नंबर- ५०२ बद्दल माहिती विचारायला सांगितली. ती त्याच्या म्हणण्यानुसार वागत होती. त्यानंतर रिसेप्शनिस्टने त्या रुम नंबरची माहिती दिल्यावर त्या व्यक्तीने त्या खोलीत यायला सांगितले. 


तिला धाकधूक वाटत होती पण आता मागे वळण्याचा पर्यायच तिच्याकडे नव्हता म्हणून मनाचा हिय्या करून ती त्या खोलीत गेली. तिने त्या खोलीचे दार ठोठावले तेवढ्यात तिला परत मॅसेज आला, " कम इनसाईड! दार उघडंच आहे. " 


                ज्ञानदाने डोळे मिटून दार उघडले अन् ती आत गेली. आतमध्ये सर्वत्र काळोख पसरला होता. तिला काहीच दिसत नव्हतं. तेवढ्यात तिला दार बंद झाल्याचा आवाज आला. ती घाबरली. तिला घाम फुटला. ती इकडेतिकडे नजर फिरवून पाहू लागली अन् तेवढ्यात त्या खोलीत उजेड झाला पण त्या खोलीत लाल प्रकाश पडत होता. तिने डोळे विस्फारून परत सभोवताली नजर फिरवली अन् तेवढ्यात तिला बुटांचा आवाज येऊ लागला. ती कानोसा घेऊ लागली. पावलांचा आवाज जसजसा वाढू लागला तसतसा हळूहळू तिला त्या व्यक्तीचा चेहरा दिसू लागला. त्या व्यक्तीचा पूर्ण चेहरा तिला दिसताच ती अवाक् झाली. 


ती त्या व्यक्तीकडे गोंधळून पाहत होती. तेवढ्यात तो व्यक्ती तिला म्हणाला, " स्वीटहार्ट, किती उशीर केलास! तुझ्याविना मला करमत नव्हतं ना! साडे सातला बोलावलं होतं तू पाच मिनिट उशीर केलास. " 


तो व्यक्ती तिच्या जवळ जाऊन तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. तिने तिचं अंग चोरून घेतलं. तिचा पाराही चढला होता. ती रागाने लालबुंद झाली होती. ती त्या व्यक्तीला उद्देशून म्हणाली, " तू? तू हे सगळं केलंस? "


" हो, मीच! द अभेद्य विश्वजीत वानखेडे! " तो व्यक्ती अर्थातच अभेद्य जोरजोरात हसत स्वतःचा परिचय देत म्हणाला. 


" पण कशासाठी? " ज्ञानदाने रागीट कटाक्ष टाकून विचारले. 


" कशासाठी? तुला खरंच माहिती नाही? मला आवडायचीस तू... लहानपणापासून... किती स्वप्नं रंगवले होते मी आणि तू काय केलंस? हं? एवढंच नाही तर त्या आर्यनला सी.ई.ओ. बनवलंस? माझ्याशी कायम तुसडेपणाने वागत राहिलीस आणि त्याच्याशी लग्न केलंस? माझ्या प्रेमाची परतफेड तू अशी केलीस? हं? " अभेद्य ज्ञानदाशी लगट करत बोलत होता. 


त्याच्या लगट करण्याने ज्ञानदा चिडली आणि म्हणाली, " तू माझ्या जवळही येऊ नकोस... आणि कसलं रे तुझं प्रेम? तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच कधी... तुला हवी होती माझी संपत्ती म्हणून तू तुझ्या बापाने सांगितल्याप्रमाणे माझ्याशी जवळीक साधून लग्न करण्याची स्वप्नं रंगवत होतास. तुझ्या या स्वार्थाला तू प्रेम म्हणतोस? हं? थुंकते तुझ्या या फसव्या प्रेमावर... " 


" हं? थुंकते म्हणे... बराच माज आहे गं तुझ्या अंगात... " अभेद्य किळसवाणे हावभाव करत बोलला.


" माज नाही स्वाभिमान आहे मला... " ज्ञानदा अभेद्यला टशन देत बोलली.


" स्वाभिमान? हं? कुठे गेला तो स्वाभिमान जेव्हा एका आठ वर्षाच्या मुलाच्या बापाशी तू लग्न केलंस? लग्न? ते ही तर केलं नाहीस... फक्त जगापुढे दिखावा केला प्रत्यक्षात तर तू कॉन्ट्रॅक्ट केलाय ना? पण काय गं कॉन्ट्रॅक्ट नेमका कशाचा केलाय? लग्नाचा की तुझ्या चारित्र्याचा? " अभेद्यने तिच्या खांद्याला किळसवाणा स्पर्श करत विचारले. 


" अभेद्य... लायकीत राहा! " ज्ञानदा त्याच्यावर चिडून बोलली. 


" माझी लायकी मी तुला आज दाखवतो. " असं बोलून अभेद्य ज्ञानदासोबत बळजबरी करू लागला; पण बळजबरी करताना तो हे विसरला की, ज्ञानदा एक्स आर्मी ऑफिसर आहे; त्यामुळे अर्थातच तिच्यापुढे त्याचा काहीच निभाव लागणार नाही. अगदी तसंच झालं. क्षणार्धात तिने त्याला पछाडले पण तेवढ्यात तो उठला आणि खिशातून चाकू काढत म्हणाला, " चोर ती चोर वर शिरजोरी करतेस? स्वतः त्या आर्यनसोबत स्वतःच्या चारित्र्याचा सौदा केलाय अन् मला माझी लायकी दाखवायचं बोलतेस. थांब, तुला नाही धडा शिकवला तर नावाचा अभेद्य वानखेडे नाही मी! "


" ए तुझ्या पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही अन् तुझा हा छोटासा चाकू माझं काही वाकडं करू शकत नाही. समजलं? " ज्ञानदा टशन देत बोलली.


त्यावर तो कुत्सितपणे हसला आणि म्हणाला, " मला माहीत आहे की, तू घाबरणार नाहीस आणि तू माझ्यापुढे स्वतःच्या जीवाची भीकही मागणार नाहीस पण तुला तुझ्या नवऱ्याच्या लेकराची अन् बहिणलेकीची जरा जास्तच काळजी आहे. बरोबर ना? " अभेद्य जोरजोरात हसू लागला. त्याच्या शब्दांचा संदर्भ लागताच ज्ञानदाचे डोळे भीतीने विस्फारले. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


🎭 Series Post

View all