Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग-५३)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग-५३)

तो पलिकडील व्यक्ती हसतच होता. त्याच्या हसण्याने ज्ञानदाला आणखी जास्त भीती वाटत होती पण तरीही हिंमत एकवटून ती बोलली, " हॅलो, तुम्ही कोण आहात? तुम्हाला काय हवंय? काय बिघडवलंय तुमचं माझ्या मुलांनी? ती मुलं लहान आहेत. त्यांचा पिच्छा सोडा, प्लीज! तुम्ही म्हणाल ती रक्कम द्यायला मी तयार आहे पण त्यांना काहीच करू नका. मला सांगा तुम्हाला पैसे हवे आहेत का? मला सांगा, मी वाटेल ती किंमत द्यायला तयार आहे पण माझ्या लेकरांना काही करू नका. "


" काय म्हणालीस तू पैसे देशील मला? हं? मला भीक नको तुझी... आणि मला तुझ्या लेकरांशी काही घेणंदेणं नाहीये. " तो पलिकडील व्यक्ती बोलला. 


" मग तुम्हाला काय हवंय? तुम्ही का त्रास देत आहात? " ज्ञानदा काकुळतीने बोलली. 


" त्रास काय असतो तुला माहिती नाहीये अजून... " तो पलिकडील व्यक्ती ज्ञानदाला धमकी देत बोलला. 


" तुम्ही कोण आहात? तुमचं माझ्याशी आणि माझ्या कुटुंबाशी काय वैर आहे? " ज्ञानदा घाबरून जाब विचारत होती. 


त्यावर तो पलिकडील व्यक्ती खिदळत म्हणाला, " वैर? " असं बोलून तो आणखी जोरजोरात हसू लागला. 


त्याच्या हसण्याने ज्ञानदाला आणखीच धडकी भरत होती. ती रडवेल्या आवाजात ओरडून म्हणाली, " सांगा ना, तुम्हाला काय हवंय? का त्रास देत आहात तुम्ही? " 


" मला तू हवी आहेस. " तो पलिकडील व्यक्ती बोलला आणि जोरजोरात हसू लागला; पण त्याचं वाक्य ऐकून ज्ञानदा अगदी सुन्न झाली होती. 


ती अडखळतच म्हणाली, " म्हणजे? "


" एवढी नादान अन् निर्बुद्ध तू नक्कीच नाहीये. म्हणून मी जे बोललो त्याचा अर्थ तुला कळला असेलच. " पलिकडील व्यक्ती कुत्सित हसून बोलला. 


" पण... मीच का? " ज्ञानदा बोलली. तिचा कंठ दाटून आला होता पण तरीही पलिकडील व्यक्ती कुत्सितपणे हसत होता. 


तो व्यक्ती बोलला, " तुला प्रश्न खूप पडतात गं... तुला ना तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आज रात्री मी सांगतो त्या पत्त्यावर ये पण तुझ्या नवऱ्याला किंवा कुणालाही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर एका क्षणात तुझ्या कुटुंबाची राखरांगोळी मी करेल आणि ह्या चेतावणीला पोकळ धमकी समजण्याची भूल तू न केलेलीच बरी! " 


" पण... " एकीकडे ज्ञानदाला काय बोलावे ते सुचत नव्हते. ती अगदी भेदरून गेली होती. दुसरीकडे तिला बोलण्याची संधी न देता तिचा शब्द तोडत तो पलिकडील व्यक्ती बोलला, " आता पण वगैरे काहीच नाहीये. तुझे किंतुपरंतू बाजूला सार आणि रात्री साडे सात वाजता मी सांगेल त्या पत्त्यावर ये. जर कुणालाही काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर पुढे जे होईल त्याला जबाबदार फक्त तूच असशील. " 


                एवढं बोलून त्या व्यक्तीने फोन कट केला. ज्ञानदा तर क्षणात कोसळली होती. अगदी खिन्न अवस्थेत ती बसून होती. तिने आर्यनचा नंबर डायल केला आणि ती त्याला कॉल करणारच होती की, तेवढ्यात दर्शन आणि शिवाक्षी कारमध्ये येऊन बसले. त्यांचे चेहरे पाहताच तिला त्या कॉलवरील व्यक्तीची धमकी आठवली अन् तिने आर्यनला कॉल करणे टाळले. 


                ती दर्शन आणि शिवाक्षीला घेऊन घरी गेली. त्यादिवशी तिने दर्शन आणि शिवाक्षीला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेली अन् ती त्यांच्याशी खोटं बोलली की, तिने आर्यनसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन केलाय. आर्यनशी ती वेगळं खोटं बोलली. त्याने तिला त्याची मिटींग असल्याचे सांगितले त्यामुळे आर्यनसोबत खोटं बोलायला तिला फारशी अडचण गेली नाही. हळूहळू वेळ सरत होती अन् तिचा श्वास जड होत होता. साडे सहा वाजता तिला त्याच अनोळखी व्यक्तीचा मॅसेज आला. त्यात त्याने पत्ता दिला होता. 


तो मॅसेज मिळताच ज्ञानदाला परत धडकी भरली. तिचं मन गहिवरून आलं होतं. तिचं मन बंड करून उठलं होतं पण तरीही तिला तिच्या भावनांवर संयम साधावा लागला. तिला लगेच एक पार्सल आलं. पार्सलमध्ये लाल रंगाची शिफॉनची साडी होती अन् त्यात एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, " आय ऍम वेटिंग स्वीटहार्ट! लवकर ये! " 


मॅसेज वाचताच असंख्य विचार तिच्या डोक्यात धावू लागले. विचार करूनही तिच्या अंगावर काटा येत होता पण तिचा नाईलाज होता. तिने लगेच ती साडी नेसली. त्याने सांगितल्याप्रमाणे हलकाच मेकअप केला. ती आरशात स्वतःला न्याहाळत होती. तिला तिच्या गळ्यात तिचं मंगळसूत्र दिसलं आणि तिचे अश्रू वाहायला लागले. तिने मंगळसूत्र घट्ट हातात पकडून घेतलं तेवढ्यात त्या व्यक्तीचा मॅसेज आला, " लवकर ये डार्लिंग! " तो मॅसेज पाहून ज्ञानदाने घट्ट डोळे मिटून घेतले अन् तिने मनोमन निश्चय केला व ती मोठ्या हिंमतीने उठून उभी राहिली. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//