Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग-५२)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग-५२)

                लवकरच आर्यन आणि ज्ञानदाचं लग्न ज्या दिवशी झालं. तो दिवसही उजाडला. मोठ्या थाटामाटात त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. जय्यत तयारी केली होती. नेहमीप्रमाणे कार्यक्रमाला बऱ्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. सगळ्यांची मर्जी राखताना बरेचदा त्यांना खोटं हसू मिरवणं, जणू त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. 


ते दोघेही फार त्रासून गेले होते त्यामुळे वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आर्यन आणि ज्ञानदा जेव्हा त्यांच्या खोलीत आवरत बसले होते. तेव्हा आर्यन ज्ञानदाला म्हणाला, " तुलाही हा दिखावा नकोसा वाटतो ना? " 


" हो रे! " ज्ञानदा हसून बोलली. 


" बरंय! निदान आपल्या नात्यात तरी हा असा खोटेपणा नाहीये. निदान आपण एकमेकांपुढे जसे आहोत तसे वावरू शकतो. आपल्याला या खोट्या दिखाव्याची गरज पडत नाही. हो ना? " आर्यन मंद हसून बोलला पण त्याचे शब्द ऐकून ज्ञानदा कुठल्याशा विचारात हरवली. आर्यनने ज्ञानदाला परत विचारले, " बरोबर ना? " त्यावर ज्ञानदाने उसने हसून हुंकार भरला. 


                त्यानंतर ज्ञानदा साडी वगैरे चेंज करून लवकरच झोपी गेली. ती झोपल्यावर आर्यनही झोपी गेला. दुसऱ्या दिवशीपासून नित्यनेमाने त्या चौघांचाही दिनक्रम सुरू झाला अन् परत दिवसामागून दिवस जाऊ लागले. 


                असेच एके दिवशी ज्ञानदा दर्शन आणि शिवाक्षीला शाळेतून पिकअप करायला गेली असताना तिला एका अनोळखी फोन नंबर वरून कॉल आला. कॉल रिसिव्ह करताच पलिकडून एक व्यक्ती तिला भयंकर आवाजात घाबरवत होता पण ती घाबरली नाही व लगेच कॉल कट करून घेतला. 


                त्यानंतर दर्शन आणि शिवाक्षीला शाळेतून सुट्टी मिळताच ती त्यांना घेऊन घरी गेली. घरीही तिच्या डोक्यात त्या अनोळखी व्यक्तीच्या कॉलचा विचार घुमत होता अन् तोच आवाज तिच्या कानात गुंजत होता. तिचं जेवणाकडेही लक्ष नव्हतं. दर्शन आणि शिवाक्षी शाळेतल्या गमतीजमती सांगत होते पण तिचं त्यांच्या बोलण्याकडेही लक्ष नव्हतं. शिवाक्षीच्या लक्षात आलं म्हणून ती दर्शनला घेऊन अभ्यास करायला निघून गेली. जेणेकरून ज्ञानदाला थोडी स्पेस मिळेल. ते दोघे जाताच ज्ञानदा परत त्या फोन कॉलचाच विचार करत होती. तिने ट्रुकॉलरवर त्या फोन नंबरची माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण तिथेही तिच्या हाती माहिती लागली नाही. म्हणून ती आणखी विचारांच्या गोतावळ्यात गुंतली. 


                 काही वेळाने दर्शन आणि शिवाक्षीला घेऊन ती डान्स क्लासला गेली. त्यादिवशी डान्समध्येही तिचं लक्ष नव्हतं. दर्शन आणि शिवाक्षीने ज्ञानदाला विचारपूस केली. तिला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण तिने विषय टाळला. त्या रात्री ती लवकरच झोपली. आर्यनलाही तिच्या वागण्यात बदल जाणवला होता पण त्याला वाटले कदाचित तिचे सहज मुड स्विंग्ज बदलत असावे. म्हणून त्या रात्री न बोलता दुसऱ्या दिवशी तिच्याशी चर्चा करावी, असा विचार आर्यनने केला अन् तोसुद्धा निद्रेच्या स्वाधीन झाला. दुसऱ्या दिवशी काहीच विपरित घडले नाही. तिला परत कोणताही कॉल आला नाही. म्हणून ती निश्चिंत झाली अन् नेहमीप्रमाणे तिच्या दैनंदिन जीवनात रममाण झाली. पुढले काही दिवस तिला काहीच त्रास झाला नाही. 


                त्या अनोळखी नंबर वरून परत कॉलही आला नाही म्हणून तिच्या डोक्यातून हळूहळू ती आठवण पुसट होऊ लागली; पण एक दिवस ज्ञानदा नेहमीप्रमाणे जेव्हा दर्शन आणि शिवाक्षीला शाळेतून पिकअप करायला गेली. तेव्हा त्याच अनोळखी नंबर वरून तिला व्हॉट्सऍपवर एक व्हिडिओ क्लिप आली. तिचा श्वास आपोआप वाढला. तिने मनाचा हिय्या करून थरथरत्या बोटांनी ती व्हिडिओ क्लिप ओपन केली. त्या व्हिडिओ क्लिपमध्ये दोन लहान मुलांचे डमी होते. ती एक ऍनिमेशन व्हिडिओ क्लिप होती असून त्यातल्या दोन्ही मुलांचे चेहरे अगदी दर्शन आणि शिवाक्षीसारखे दिसत होते. ते पाहून तिच्या काळजात धस्स झाले. तिचं मन पुढची क्लिप पाहायला धजावत नव्हतं पण तिला ती व्हिडिओ क्लिप पाहणे भाग होतं. तिच्या हृदयाची स्पंदने आधीच वाढली होती, ती श्वास रोखून ती क्लिप पाहत होती अन् त्यातल्या डमींच्या हालचाली पाहून ज्ञानदाच्या हातातून मोबाईल निसटून खाली पडला एवढी ती घाबरून गेली होती. 


तेवढ्यात तिला त्याच अनोळखी नंबरवरून कॉल आला. तिची हिंमतच होत नव्हती कॉल रिसिव्ह करण्याची; पण तिने घाबरतच कारमध्ये पडलेला मोबाईल उचलला आणि थरथरतच कॉल रिसिव्ह केला. कॉल रिसिव्ह करताच पलिकडून तोच व्यक्ती बोलत होता. तो तिला धमकावून म्हणाला, " व्हिडिओ क्लिप पाहिली ना? त्यात जो हाल त्या दोन कार्टून्सचा झाला ना तोच हाल उद्या तुझ्या मुलांचा होईल. त्यात जशी त्या मुलांची हत्या केली ना अगदी त्याच पद्धतीने तुझ्या मुलांना मी मारणार. " असं बोलून तो पलिकडील व्यक्ती विक्षिप्त हसू लागला. त्याचं हसू ऐकून ज्ञानदाचा गळा एकदम कोरडा पडला. तिला काहीच बोलायला सुचेना. शब्द जणू थिजले होते अन् ती फक्त भेदरलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीचं हसणं ऐकत होती. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//