वाट हळवी वेचताना (भाग-५१)

बापलेकाची कहाणी

                विवाह सोहळा पार पडला. सगळ्यांचे आशिर्वाद घेऊन झाल्यावर तसेच जेवण आटोपल्यानंतर पाठवणीची वेळ आली. भरल्या डोळ्यांनी ज्ञानदाच्या आई-बाबांनी लेकीला निरोप दिला. ज्ञानदा नव्या नवरीच्या रुपात आर्यनच्या घरी आली. तिथे सावित्री मावशींनी तिची आरती ओवाळली अन् तिने माप ओलांडून गृहप्रवेश केला अशाप्रकारे तिचा ताम्हणकर कुटुंबात प्रवेश झाला. तिच्याबरोबर शिवाक्षीसुद्धा होती. 


त्या दोघींचे स्वागत दर्शनने उत्साहाने केले. ज्ञानदा व शिवाक्षीचे त्यांच्या घरात आगमन झाल्याने तो फार खूश होता. तो शिवाक्षीला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, " ताई, आता ही आपल्या दोघांची खोली असणार आहे. " त्याच्या वाक्यावर शिवाक्षी फक्त हसली. 


दुसरीकडे हॉलमध्ये ज्ञानदा संकोच करत अवघडलेल्या अवस्थेत उभी होती. तिचा संकोच लगेच हेरून आर्यन बोलला, " अगं तू अशी संकोच नको करूस. आपल्यासाठी एक खोली आहे. तू त्या खोलीत जा आणि फ्रेश होऊन घे! सावित्री मावशीला आपल्यासाठी ती खोली मी आधीच स्वच्छ करायला सांगितली होती. "


" बरं! " ज्ञानदा बोलली अन् आर्यनने ज्या खोलीकडे इशारा केला. ती त्या खोलीत निघून गेली. 


                खोलीत जाऊन ती फ्रेश झाली. तिने तिचे कपडे बदलले अन् साधी साडी नेसली. तिचं आवरून होताच तिने तिची बॅग अनपॅक करायला सुरुवात केली. ती एकेक वस्तू नीटनेटक्या पद्धतीने अरेंज करू लागली. तेवढ्यात आर्यनही त्या खोलीत आला. ज्ञानदाला आवराआवर करताना पाहून तो मंद हसला आणि फ्रेश व्हायला बाथरुममध्ये निघून गेला. त्यानंतर त्याचं आवरून होताच तो बाथरुममधून बाहेर आला. 


तो खोलीत येताच ज्ञानदा त्याला म्हणाली, " आर्यन, इथे एकच बेड का आहे? "


" सॉरी ज्ञानदा! मला माहीत आहे की, तुला अनकम्फर्टेबल वाटेल पण नाईलाज आहे. आपल्याला एकच बेड शेअर करावा लागणार कारण दर्शनचाही या खोलीत वावर असणार. त्यामुळे त्याला संशय व्हायला नको म्हणून आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागेल. " आर्यन बोलला. 


" बरं! काही हरकत नाही. " ज्ञानदा बोलली अन् ती परत तिचं साहित्य आचरण्यात व्यग्र झाली अन् हळूहळू अशी सुरुवात झाली त्यांच्या लग्नानंतरच्या चढाओढीची, तडजोडीची, आयुष्याच्या नव्या वळणाची, नव्या प्रवासाची! 


                दिवस सरू लागले अन् तो प्रवास ते जगू लागले. लग्नानंतर ज्ञानदाने कंपनीकडे लक्ष देणे फार कमी केले होते. ती शिवाक्षी, दर्शन आणि आर्यनची काळजी घेऊ लागली. शिवाक्षी अन् दर्शनच्या प्रती ती आईची भूमिका निभावत होती तर आर्यनवर त्याच्याही नकळत नितांत प्रेम करून ती बायकोची भूमिका पार पाडत होती. एव्हाना सगळ्यांना ज्ञानदाने बनविलेल्या जेवणाची सवय लागली होती. लग्न झाले तेव्हापासून क्वचितच सावित्री मावशीकडे जेवणाची जबाबदारी सोपवली जायची. ज्ञानदा सावित्री मावशींना घरकामात मदत करायची, बागेची विशेष काळजी घ्यायची. तथाकथित गृहिणी झाली होती ज्ञानदा; पण त्यामुळे तिने डान्स क्लासमध्ये डान्स शिकवणे बंद केले नव्हते.


                घर सांभाळून ती तिचं स्वप्न जगत होती. सर्व जबाबदाऱ्या विनातक्रार पार पाडत होती. त्यामुळे घर अगदी प्रसन्न राहायचं. आर्यनसोबतचं तिचं नातंही आजतागायत अबाधित होतं. आर्यनला अडीअडचणीत ती मदत करायची. त्याचं मन भरून आलं की, त्याला आधार द्यायची. त्याची समजूत काढायची. त्याची जीवापाड काळजी घ्यायची. त्यामुळे आर्यनही हळूहळू ज्ञानदाशी आणखी अटॅच होत गेला. त्यांची मैत्री आणखी निखळ आणि घट्ट होत गेली अन् ज्ञानदाचं आर्यनप्रती असणारं एकतर्फी प्रेमही दिवसेंदिवस वाढू लागलं होतं. 


                आर्यनलाही त्याच्याही नकळत ज्ञानदा आणि शिवाक्षीची सवय जडली होती. त्यामुळे त्या दोघींशिवाय त्याचंही पान हलायचं नाही. ते चौघे आता दर्शनने म्हटल्याप्रमाणे एका कम्प्लिट फॅमिलीचा भाग होते. त्यामुळे दर्शनच्या आनंदाचा ठावठिकाणाच नव्हता.


                त्याचबरोबर दर्शनला नकारात्मक विचारांच्या गर्तेत बुडण्याची संधी ना ज्ञानदा देत होती ना शिवाक्षी! त्यामुळे त्याच्या मनात जे अपराधीभाव होते की, त्याच्यामुळे त्याचा बाबा दुःखी असतो वगैरे... तर हे सर्व विचार दूर पसार होऊ लागले. त्यामुळे ते चौघेही एकमेकांची सोबत लाभताच आनंदी झाले होते. शिवाक्षीसुद्धा आर्यनला डॅडा अशी हाक मारायची. तिलाही आर्यनची सवय होऊ लागली. कुटुंब, जिव्हाळा अनुभवल्याने शिवाक्षीच्याही आनंदाचा पारावार नव्हता. असे हे सुखी कुटुंब जगाच्या नजरेतही ते सुखी वैवाहिक आयुष्य जगत होते आणि त्यांच्या माहितीनुसारही ते वैवाहिक आयुष्य जगत नसले तरी सुखी कौटुंबिक वातावरण नक्कीच अनुभवत होते. 


                पाहता पाहता आर्यन आणि ज्ञानदाच्या लग्नाला एक वर्ष कसे पूर्ण झालं कळलंच नाही. एवढंच काय तर, लवकरच त्यांच्या लग्नाचा पहिलावहिला वाढदिवस येणार होता. दर्शनच्या समाधानासाठी, त्याच्या हट्टाखातर केलेल्या त्या तडजोडीला, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला तब्बल एक वर्ष पूर्ण झालं होतं अन् आताशा लवकरच वर्षपूर्तीचा शंखनाद सबंध आसंमतांत निनादणार होता. 


क्रमशः

.................................................................. 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.🎭 Series Post

View all