वाट हळवी वेचताना (भाग-५०)

खडतर प्रवास हा

" सर! तुम्ही हात नका जोडू! तुम्ही वडीलधारे आहात, तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी आहे, मी समजू शकतो आणि म्हणून तुमचं कर्तव्य माझ्यापुढे हात जोडणे नसून मला ठाम बजावून सांगणं आहे जेणेकरून, तुमच्या लेकीची काळजी मी घ्यायलाच हवी! आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही निश्चिंत राहा. ज्ञानदाला मी कधीच हर्ट करणार नाही. तिची काळजी मी कायम घेणार. तिच्या आनंदातच नव्हे तर दुःखातही मी सामील असेल. " आर्यन दिग्विजय कर्वे यांना आश्वासन देत बोलला. 


" बरं! बाय द वे आता बाबा बोलायची सवय करून घे! 'सर' ही उपाधी ऑफिसपुरती मर्यादित ठेवायला हवी. " दिग्विजय कर्वे मंद हसून बोलले अन् निघून गेले.


                काही वेळाने हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. त्या दोघांना हळद लागली. तिथे बरेच जण उपस्थित होते. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनाही आनंद झाला होता. सगळेजण त्या दोघांनाही शुभेच्छा देत होते. तेवढ्यात तिथे आर्यन आणि ज्ञानदाच्या रेजिमेंटमधील फौजी मित्रपरिवार आला. त्यांचं स्वागत त्या दोघांनी मिळून केलं. तिथे अक्षय आणि निमिषही आले होते. त्यांनी आर्यनला मिठी मारली अन् त्या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


निमिष आर्यन आणि ज्ञानदाला उद्देशून म्हणाला, " फायनली! तुमच्या दोघांचं लग्न होतंय! मी जाम खूश आहे. मला वाटलेलं तू कधीच लग्न करणार नाहीस पण तू निर्णय घेतलाच! " 


आर्यनने उसने हसून केवळ हुंकार भरला. त्यानंतर निमिष पुढे म्हणाला, " बाय द वे, मला पूर्ण खात्री होती की, दर्शिकावहिनीनंतर जर आर्यनला कुणी ओळखत असेल तर ती तूच आहेस ज्ञानदा! सो, हॅप्पी मॅरीड लाईफ! " ज्ञानदानेही कसनुसं हसून हुंकार भरला. निमिष न थांबता बडबड करत होता अक्षय मात्र शांत उभा राहून आर्यन आणि ज्ञानदाचं निरिक्षण करत होता.


तेवढ्यात निमिषला दर्शन दिसला तर तो दर्शनजवळ निघून गेला. निमिष जाताच ज्ञानदाही तिथून निघून गेली. मग तिथे फक्त अक्षय आणि आर्यन होते. आर्यनला अक्षय एका कोपऱ्यात घेऊन गेला अन् तो म्हणाला, " आर्यन, तू आणि ज्ञानदा खूश तर आहात ना? तुमचा या लग्नाला विरोध आहे का? "


" नाही दादा... असं काही नाहीये. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. " आर्यन नजर चोरून विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागला. 


" मला गैरसमज होतोय काय? राजा, तुझ्यापेक्षा मोठा आहे. चार चेहरेही जास्त वाचले आहेत मी! म्हणून माझ्यापासून लपवाछपवी करू नकोस. सांग नेमकी काय भानगड आहे? मला स्पष्ट तुझ्या चेहऱ्यावरून जाणवतंय की, तू अजूनही दर्शिकासाठी मनातल्या मनात झुरतोय मग हा लग्नाचा आटापिटा का आणि कुणासाठी? " अक्षयने त्याची धारदार नजर रोखत विचारले आणि आर्यनचा नाईलाज झाला. त्याने अक्षयला हकीकत सांगितली. 


वास्तव कळल्यावर अक्षय आर्यनला बोलला, " तुम्ही दोघेही या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी सहमतीने तयार झाले आहात, हे मला कळतंय; पण आर्यन एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्ञानदाचं मन जप! तिची काळजी घे आणि तिला हर्ट करू नकोस. स्त्री मन हळवं असतं तुलाही ठाऊक आहेच! त्यामुळे बापाची भूमिका वठवताना तुझ्या ज्ञानदाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्यांचा विसर तुला पडता कामा नये. तिने दर्शनसाठी स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना पायदळी तुडवले आहे म्हणून तू तिचं मन जपण्याचा कसोशीने प्रयत्न कर!


                शिवाय ज्या बापाने मोठ्या विश्वासाने या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला परवानगी दिलीय, त्याची मान खाली जाता कामा नये. ज्ञानदाच्या बाबांना त्यांच्या निर्णयाचा पश्चात्ताप होता कामा नये. म्हणून तू त्यांचा विश्वास सार्थ कर. त्याचबरोबर आजपासून तू एकट्या दर्शनचा नव्हे तर शिवाक्षीचाही बाबा म्हणून ओळखल्या जाशील. त्यामुळे दर्शनची काळजी करताना शिवाक्षीकडे दुर्लक्ष करू नकोस. तिलाही समान वागणूक दे. तिचीही काळजी घे. तिलाही प्रेमाची गरज आहे म्हणून तिलाही जप! "


" हो दादा! माझी एकुण एक जबाबदारी मी पार पाडणार! " आर्यन अक्षयला वचन देत बोलला. त्यावर अक्षयने हुंकार भरला.


                त्यानंतर ते परत कार्यक्रमात सामील झाले. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यावर ज्ञानदाला हिरवा चुडा भरल्या गेला. त्यानंतर मेहंदी व संगीत कार्यक्रम एकत्रच आटोपले अन् शेवटी उजाडला लग्नाचा दिवस! 


                ज्ञानदा अस्सल मराठमोळ्या शैलीत फार गोंडस दिसत होती. त्या दोघांचाही साजशृंगार अन् पेहराव अगदी पेशवाई पद्धतीचा होता. दोघेही नटूनथटून मंडपात शिरले. दर्शन आणि शिवाक्षीही फार गोजिरवाणे दिसत होते. आर्यन आणि ज्ञानदाच्या विवाहाचा अनुभव घेत होते. भटजी मंगलाष्टक म्हणत होते. सरतेशेवटी भटजींनी सावधान म्हणताच आर्यन आणि ज्ञानदाच्या डोक्यावर अक्षता अन् शुभाशिर्वादाचा वर्षाव झाला. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले. आर्यनने ज्ञानदाच्या भांगेत कुंकू भरलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. दोघांनीही सप्तपदी घेताच त्यांचा विवाह संपन्न झाल्याचे भटजींनी सांगितले व त्यानंतर ते दोघेही थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेऊ लागले. 


क्रमशः

............................................................... 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.🎭 Series Post

View all