वाट हळवी वेचताना (भाग-४९)

हळवी वाट अन् हळवा प्रवास

ज्ञानदा आणि दिग्विजय कर्वे एकमेकांना बिलगून असताना ज्ञानदा लगेच मिठीतून बाहेर आली आणि म्हणाली, " बाबा, आईची समजूत कशी काढायची? " 


" नाही गं! सरकार याबाबतीत फार जुनाट विचारसरणीच्या आहेत. त्यांना नाही पटणार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे... " दिग्विजय कर्वे बोलले. 


" मग आता? " ज्ञानदाने काळजीने विचारले. 


" आता काय? तुझ्या आईला न सांगता तू लग्न करून घे. " दिग्विजय कर्वे हसत बोलले. 


" बाबा, मस्करी नका ना करू! " ज्ञानदा गंभीर होत बोलली. 


" वेडी! नको काळजी करू. तुझ्या आईची मी समजूत काढलीय. " दिग्विजय कर्वे बोलले. 


" ती कशी काय? " ज्ञानदाने न कळून विचारले. 


" मी सांगितलं की, आर्यनची पहिली बायको मरण पावली म्हणून लेकराच्या संगोपनासाठी तो तुझ्याशी दुसरं लग्न करतोय. फक्त मी तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काहीही एक सांगितलं नाही तर तू सुद्धा तो उल्लेख करू नकोस आणि तुझ्या हरिश्चंद्राचा अवतार असलेल्या भावी नवऱ्यालाही हे सगळं सांग! ती याच लग्नाच्या विरोधात होती खरंतर... कारण तिला तिच्या लेकीचं लग्न अशा व्यक्तीशी नव्हतं करायचं. थोडक्यात काय तर म्हणे, तिच्यात तत्त्वात बसत नाही! पण जेव्हा मी सांगितलं की, तुझं आर्यनवर फार आधीपासून प्रेम आहे तर ते ऐकून तुझ्या आईने मन बदललं आणि 'ना'चा पाढा म्हणता म्हणता अखेर होकार दिला. " दिग्विजय कर्वे बोलले. 


" बाबा काय सांगत आहात? खरंच? " ज्ञानदाने उत्साहात विचारले. 


" हो! " दिग्विजय कर्वे हसत बोलले. ते ऐकून ज्ञानदाने मात्र सुटकेचा श्वास घेतला. मग ते दोघेही खाली गेले आणि कोथिंबीरवडीचा आस्वाद घेऊ लागले. 


                दुसरीकडे आर्यनने सर्व बंदोबस्त केला. त्याच्या वकील मित्राकडून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल इत्थंभूत माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने दर्शनला ज्ञानदाच्या घरी ड्रॉप करून ज्ञानदा आणि आर्यन त्याच्या वकील मित्राकडे गेले. तिथे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल चर्चा केली व एकमेकांच्या सहमतीने एक रफ कॉन्ट्रॅक्ट तयार करून घेतला. ज्यात त्या दोघांनीही काही अटी व नियम एकमेकांच्या सोयीसाठी व एकमेकांची प्रायव्हसी जपण्यासाठी लिहून घेतले. त्यानंतर दोन दिवसांनंतर आर्यनच्या वकील मित्राने तो लिगल कॉन्ट्रॅक्ट तयार केला. ज्यावर त्या दोघांनीही सह्या केल्या. त्या कॉन्ट्रॅक्टची एक प्रत आर्यनकडे व एक प्रत ज्ञानदाकडे होती आणि एक प्रत साक्षीदार म्हणून आर्यनच्या वकील मित्राकडे होती. 


                कराराची औपचारिकता पार पडताच दिग्विजय कर्वे यांनी आर्यनसमोर पारंपारिक लग्नाची गोष्ट छेडली. खरंतर पारंपारिक लग्न करण्यासाठी कुणीच तयार नव्हतं पण ज्ञानदाच्या आईची विचारसरणी व त्यांचा आग्रह पाहता विधिवत लग्न करण्याचेही ठरले. एकुलत्या एक मुलीच्या लग्नासाठी प्रत्येक आईवडिलांनी स्वप्न पाहिलेले असतात, त्याला ज्ञानदाचे आईवडीलही अपवाद नव्हते. 


                ज्ञानदाच्या आईने अर्थात मुग्धा कर्वेंनी जय्यत तयारी केली. अगदी विधिवत लग्न करण्याचा बेत आखला. एवढेच नव्हे तर, ज्ञानदा आणि आर्यनच्या लग्नाचे निमंत्रण मुग्धा कर्वेंनी सर्व इन्व्हेस्टर्स, डीलर्स, पार्टनर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तसेच स्टाफला दिले. तसेच आर्यनला त्याच्या मित्रांना आमंत्रण द्यायला सांगितले, ज्ञानदाच्याही सर्व मित्रमैत्रिणींना लग्नाचे आमंत्रण दिले. हेच काय कमी होते तर दर्शन आणि शिवाक्षीच्याही मित्रमंडळींना निमंत्रण देण्याचे फर्मान मुग्धा कर्वेंनी सोडले. जणू ते लग्न नसून अभूतपूर्व सोहळा होता अन् त्याचे साक्षीदार अख्खं जग होणार होतं.


                आर्यन सर्व विधी पार पाडत होता. त्याला दर्शिकाची आठवण येत होती. त्याने तिच्यासोबत घालवलेले क्षण, त्याचं दर्शिकाशी साध्या पद्धतीने झालेलं लग्न हे सर्व आठवून तो भावूक झाला होता पण एरवीप्रमाणेच त्याने यावेळीही शिताफीने भावनांवर संयम साधला. ज्ञानदाला आनंदही होता अन् थोडी तिच्या हृदयात कळंही जात होती या विचाराने की, ते लग्न नसून केवळ दिखावा आहे. 


आर्यनलाही ज्ञानदाची कीव येत होती. तो मनात म्हणाला, " ज्ञानदा, मला माफ कर! तुझ्या सर्व स्वप्नांची माझ्यामुळे राखरांगोळी झाली असावी. तुझा गुन्हेगार आहे गं मी ज्ञानदा! बाप म्हणून मी फार स्वार्थी निघालो गं! दर्शनचा विचार करताना मी तुझ्या मनाचा साधा विचारही केला नाही. बापाची भूमिका निभावताना मी मित्राची भूमिका निभावणे, विसरून गेलो. मला माफ कर ज्ञानदा... माफ कर! "


                आर्यन ज्ञानदाची मनोमन माफी मागत होता. तेवढ्यात तिथे ज्ञानदाचे बाबा दिग्विजय कर्वे आले आणि त्यांनी आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या हाताचा स्पर्श होताच आर्यन दचकून त्यांच्याकडे पाहू लागला.


दिग्विजय कर्वे मात्र मंद हसले आणि म्हणाले, " तुमचं लग्न जरी दिखावा असेल तरी आज मी माझी मुलगी तुला सोपवतोय आर्यन! तू तिची काळजी घेशील, अशी आशा मला आहे. ती कायम हसत असली तरी तिच्या वेदना तू समजून घेशील, याची अपेक्षा मी करतो. तुमचं यापुढे काय नातं असणार मला ठाऊक नाही पण काहीही झालं तरी तू तिच्या बाजूने कायम उभा राहशील, ही खात्री मला आहे. म्हणून माझा विश्वास खोटा ठरू देशील नको. " दिग्विजय कर्वेंनी आर्यनपुढे हात जोडले. त्याने लगेच त्यांचे हात त्याच्या हातात घेतले. 




क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.




🎭 Series Post

View all