दिग्विजय कर्वे शिवाक्षीला हसत म्हणाले, " छकुली! तू खाली जा! आजीने तुझ्यासाठी कोथिंबीरवडी केलीये. ती तुला हाक मारतेय कधीची! जा बघू! "
दिग्विजय कर्वेंना हसताना पाहून ज्ञानदा आणि शिवाक्षीचा जीव भांड्यात पडला. त्यांनी सुटकेचा श्वास घेतला व शिवाक्षीही मंद हसून बोलली, " हो आजोबा! मी लगेच जाते. मम्मा तू पण चल! "
" नाही, तुझ्या मम्माशी मला काम आहे थोडं; म्हणून तू जा आधी... आम्हीही येतो लगेच. " दिग्विजय कर्वे हसत म्हणाले.
" बरं आजोबा! " शिवाक्षी मंद हसून बोलली अन् खोलीतून बाहेर गेली.
शिवाक्षी बाहेर गेल्याची खात्री होताच दिग्विजय कर्वेंनी त्यांचा मोर्चा ज्ञानदाकडे वळवला आणि ते म्हणाले, " ज्ञानदा, मी हे काय ऐकलंय आता? तू आर्यनबरोबर लग्न करणार आहेस? ते ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? "
" हो बाबा... म्हणजे ते... " ज्ञानदा ततपप करू लागली.
" अगं, लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का तुला? तुला लग्नच करायचं असेल तर तुझ्यासाठी मुलांची रांग लावतो मी पण तू बोल तर खरं! आजपर्यंत तू लग्न करायला तयार नव्हतीस अन् आज करतेय तर आर्यनशी, ज्याचं लग्न आधीच झालेलं आहे. " दिग्विजय कर्वे चढ्या आवाजात ज्ञानदाला खडेबोल ऐकवू लागले.
" बाबा... ऐकून तर घ्या... " ज्ञानदा बोलण्याचा प्रयत्न करत होती पण दिग्विजय कर्वे तिला संधीच देत नव्हते.
" काय ऐकून घेऊ मी? अगं तू त्याला संधी द्यायचं बोललीस मी ऐकून घेतलं. तू त्याला सी.ई.ओ.चं पद देण्यासाठी इनिशिएटिव्हली घेतलंस मी त्यालाही विरोध केला नाही कारण मलाही तो त्या पदाला लायक वाटला पण आज... आज तू कसला निर्णय घेतला? तुला तो अभेद्य पसंत नाहीये मला माहितीये म्हणून मी त्याच्याशीच लग्न कर, अशी सक्ती तुझ्यावर लादली नाही अन् तू काय केलंस? तू मला बोलली होतीस की, तुझं आर्यनवर प्रेम आहे, मी ते सुद्धा समजून घेतलं पण तू आज कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेऊन माझ्याच पाठीत खंजीर खुपसलंस? अगं, जग काय म्हणेल मला? म्हणेल एकुलत्या एक मुलीचं लग्न आर्यन सारख्या व्यक्तीशी? हं? " दिग्विजय कर्वे रागाने लालबुंद झाले होते.
" बाबा... " ज्ञानदाला बोलण्याची मुभाच मिळत नव्हती.
" हा निर्णय घेताना तुला माझी परवानगी घ्यावी असंही वाटलं नाही का? अशी कशी तू सर्रास निर्णय घेऊन मोकळी झालीस? आणि महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतेय तू आर्यनशी? म्हणजे सिरियसली? तुला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ कळतोय की नाही? अगं तू फक्त त्याची बायको म्हणून मिरवशील जगापुढे पण प्रत्यक्षात तुमचं नातं रूममेट पलीकडे काहीच नसणार आहे. तुम्ही फक्त एका घरात राहणार पण त्यात प्रेमाचा शिरकाव नसेल. म्हणून मला सांग हा दिखावा किती दिवस करणार आहात तुम्ही जगापुढे? " दिग्विजय कर्वे प्रश्नांची सरबत्ती करत होते.
" बाबा... " ज्ञानदा अर्धवट बोलली.
" नाही ज्ञानदा! तू मला आज सांग, तुला कोण हवंय? तुझे आईबाबा की तो आर्यन? तुला काय वाटलं, मी हे असं काही बोलणार? " दिग्विजय कर्वेंनी मृदू आवाजात विचारले अन् ज्ञानदा अगदी गोंधळून गेली.
ती आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली म्हणून दिग्विजय कर्वे गालातल्या गालात हसले आणि म्हणाले, " अगं अशी काय बघतेय? "
" बाबा... तुम्ही रुसले नाही? " ज्ञानदाने आश्चर्य व्यक्त केले.
" नाही! " दिग्विजय कर्वे नम्रपणे बोलले.
" खरंच? " ज्ञानदाला नवल वाटले.
" हो गं! माझं आणि आर्यनचं बोलणं झालं मघाशीच! त्याने आधी माझी परवानगी मागितली आणि नंतर त्याने तुला लग्नाची मागणी घातली. " दिग्विजय कर्वे बोलले.
" काय? " ज्ञानदाने आश्चर्य व्यक्त करत विचारले.
" हो! पण काय गं तुला माझी आणि तुझ्या आईची संमती महत्त्वाची वाटली नाही का? एकटीनेच निर्णय घेऊन टाकलास? " दिग्विजय कर्वे नजर रोखून बोलले.
" तसं नाही ओ बाबा! मला कळत नव्हतं तुमच्याशी कसं बोलावं ते! शिवाय मी तुमची समजूत काढू शकेल वा नाही, याबाबतही खात्री नव्हती म्हणून! " ज्ञानदा बोलली.
" असू दे गं! मस्करी करतोय मी! मी ही ऐकलं तुझं आणि छकुलीचं बोलणं. ज्यात तू तुझा निर्णय घेण्यामागे तुझी बाजू सांगितलीस. त्यामुळे मला तुझा आणखी अभिमान वाटला. " दिग्विजय कर्वे ज्ञानदाच्या डोक्यावर हात ठेवून बोलले.
" पण बाबा? तुम्ही काहीच आक्षेप घेतला नाही जेव्हा आर्यनने तुमच्यापुढे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची संकल्पना मांडली आणि त्यासाठी तुमच्या मुलीला लग्नाची मागणी घातली तेव्हा? " ज्ञानदाने आश्चर्याने विचारले.
" राग आला नाही अशातला भाग नाही. मला राग आला पण नंतर तुझ्या बाबाला दर्शनच्या बाबाची व्यथा कळली अन् मग काही केल्या नकार द्यायला जमलंच नाही. " दिग्विजय कर्वे बोलले. त्यांचे शब्द ऐकून ज्ञानदा भावूक झाली आणि अलबत तिने दिग्विजय कर्वेंना मिठी मारली. दिग्विजय कर्वेसुद्धा ज्ञानदाला मिठीत घेत तिची पाठ थोपटू लागले.
क्रमशः
...............................................................
©®
सेजल पुंजे
२५/११/२०२२.