वाट हळवी वेचताना (भाग-४७)

बापलेकाची कहाणी

                थोड्या वेळानंतर आर्यन डॉक्टरांकडे दर्शनच्या डिस्चार्जबद्दल विचारपूस करायला गेला. त्यानंतर डॉक्टरांनी डिस्चार्ज देताच सर्व प्रोसिजर आटोपून, ज्ञानदा आणि शिवाक्षीचा निरोप घेऊन आर्यन दर्शनला घेऊन गेला. ते दोघे बापलेक जाताच शिवाक्षी आणि ज्ञानदाही त्यांच्या घरी गेल्या. घरी गेल्यावर त्या फ्रेश झाल्या. ज्ञानदाच्या आईने चहा केला होता. चहा पिऊन ज्ञानदा तिच्या खोलीत मुकाट्याने निघून गेली. ज्ञानदाला शांत बघून शिवाक्षीला विचित्र वाटले आणि तीसुद्धा ज्ञानदाच्या मागोमाग तिच्या खोलीत गेली. खोलीत जाताच तिला ज्ञानदा बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून कुठल्याशा विचारात हरवलेली दिसली. 


शिवाक्षीसुद्धा ज्ञानदाजवळ बसली आणि विचारपूस करत म्हणाली, " मम्मा, काय झालंय? तू एवढी गप्प का आहेस? तुझं आणि आर्यन काकांचं काय बोलणं झालं? " 


" शिवा, आर्यनने मला लग्नासाठी मागणी घातली. " ज्ञानदा थंड आवाजात बोलली. 


" काय सांगतेस? खरंच? अगं मग एवढं उदास होऊन का सांगतेय? ही तर आनंदाची बातमी आहे ना! तुझं पहिलं प्रेम फायनली तुझं होणार! " शिवाक्षी न थांबता औत्सुक्याने बोलत होती. 


" नाही, असं काही नाहीये. " ज्ञानदा खिन्न स्वरात बोलली. 


" म्हणजे? " शिवाक्षीने न कळून विचारले. 


" म्हणजे आमचं लग्न एक तडजोड असणार. " ज्ञानदा उदास होत बोलली. 


" काय? " शिवाक्षीचा आवाज आपोआप चढला. 


" हो, आर्यनने मला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी मागणी घातली. " असं बोलून ज्ञानदाने तिच्यात आणि आर्यनमध्ये जे काही बोलणं झालं त्याचा इत्थंभूत आढावा दिला. 


सर्व ऐकून घेतल्यावर शिवाक्षी नजर रोखून म्हणाली, " ते जे काही बोलले त्यावर तुझा निर्णय काय आहे? तू त्यांना नकार कळवणार आहेस ना? " 


" नाही. माझा नकार नाहीये. मी माझा निर्णय घेतला आहे. " ज्ञानदा बोलली पण तिचा निर्णय ऐकून शिवाक्षीचा पारा चढला. 


ती ज्ञानदावर चिडली आणि म्हणाली, " मम्मा, तू माझ्याशी मस्करी करतेय का? मला मान्य आहे की, तुझं त्यांच्यावर प्रेम आहे पण त्यासाठी तू स्वतःच्या स्वाभिमानाला पायदळी तुडवशील काय? तुझ्या इच्छा-आकांक्षा काहीच महत्त्वाच्या नाहीत का? मला कळतंय की, प्रेमात त्यागाची भावना असते पण हा असा कसा त्याग करायला तू निघाली आहेस? "


" शिवा, माझं ऐकून घे! मी माझा निर्णय यावेळी आर्यनच्या प्रेमाखातर नव्हे तर दर्शनकरीता घेतलाय. " ज्ञानदाचे उत्तर ऐकताच शिवाक्षी शांत झाली. 


ज्ञानदा पुढे बोलू लागली, " शिवा, स्वाभिमान माझाही दुखावल्या गेला होता. मलाही वाईट वाटलं होतं म्हणून मी नकार देणार होती पण दर्शनकडे पाहिलं आणि मी माझाच निर्णय बदलला. मग मला हळूहळू आर्यनची बाजूही कळली की, त्यानेही नाईलाजाने तो मार्ग काढलाय. तोसुद्धा मला हर्ट करणार नव्हता म्हणून त्याने मला नकार देण्याचाही पर्याय दिला. आर्यनने जे केलं ते फक्त आणि फक्त दर्शनसाठी आणि त्याच्या काळजीपोटी... त्याचा तीळ तीळ जीव तुटतो दर्शनसाठी म्हणून त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा सुवर्णमध्य काढला. "


" मम्मा, तू अजूनही आर्यन काकांचीच बाजू घेतेय. " शिवाक्षी चीडचीड करत बोलली. 


" बाजू नाही घेतेय शिवा... फक्त एक बाजू उचलून न धरता दुसरी बाजूही समजून घेतेय. शिवाय दर्शनप्रती जिव्हाळा तुलाही आहे आणि मलाही... त्याचा उदासवाणा, कोमेजलेला चेहरा पाहून मन तुझंही भरून येतंच ना? म्हणून मी आर्यनला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी नुकताच होकार कळवलाय. शिवा, तुला आतातरी कळलं ना! " ज्ञानदा बोलली. त्यावर शिवाक्षीने हुंकार भरला अन् तिने ज्ञानदाला मिठी मारली. 


" शिवा, तू भावूक झालीस का? " ज्ञानदाने विचारले. 


" छे! मी नाही हं! टिपिकल रडणं मला नाही जमत! " डोळ्यातलं पाणी डोळ्यातच अडवून शिवाक्षी तोऱ्यात बोलली. 


त्यावर ज्ञानदाने निव्वळ हुंकार भरला व ती म्हणाली, " तसं पण तुला भावूक व्हायची गरज नाहीये कारण माझं लग्न आर्यनशी झाल्यावर तू सुद्धा माझ्यासोबत तिकडेच राहायला येणार आहेस. "


" हो, तर येणारंच ना मी! तुझा पिच्छा मी सहजासहजी सोडणार नाहीये. तू जिथे जिथे मी तिथे तिथे... " शिवाक्षी ज्ञानदाची छेड काढत बोलली. त्यावर ज्ञानदाने हुंकार भरून हळूच ज्ञानदाचं नाक खेचलं. 


त्या दोघीही हसत होत्या. तेवढ्यात शिवाक्षी थोडं गंभीर होत बोलली, " काश... मम्मा... आर्यन काका आणि तुझं खरंखुरं लग्न झालं असतं. किती भारी मजा आली असती ना? "


" ह्म्म... असो! जे नाही लिहिलंय नशिबात त्याचा लोभ कशाला? " ज्ञानदा मंद हसून बोलली. 


" हो, ते ही आहेच म्हणा! बरं मग! कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी माझ्याकडून तथास्तू! " शिवाक्षी बोलली. त्यावर दोघीही मायलेकी हसू लागल्या पण तेवढ्यात त्यांच्या खोलीत ज्ञानदाचे बाबा अर्थात दिग्विजय कर्वे आले आणि त्या दोघीही शांत झाल्या. त्यांना धडकी भरली. दोघीही एकदम गार झाल्या आणि एकमेकींना इशाऱ्यानेच विचारपूस करू लागल्या. दिग्विजय कर्वेचं मात्र दोघींकडे बारीक लक्ष होतं. 


क्रमशः

................................................................ 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.



🎭 Series Post

View all