वाट हळवी वेचताना (भाग-४६)

बापलेकाची कहाणी

दर्शन बऱ्यापैकी हसत-बोलत होता; त्यामुळे त्याला पूर्ववत पाहून ज्ञानदा आणि शिवाक्षीच्या ओठांची पाकळी खुलली. आर्यनलाही हायसे वाटले. त्याच्याही जीवात जीव आला. दर्शनचे जेवण झाल्यानंतर तो औषध घेऊन झोपी गेला. तो झोपल्यावर आर्यन त्याच्याच बाजूला त्याचा चेहरा न्याहाळत बसला होता.


तेवढ्यात ज्ञानदा आर्यनला उद्देशून म्हणाली, " आर्यन, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तू थोडा बाहेर येतोस का? "


आर्यनने होकार दिला व तो ज्ञानदाच्या मागोमाग त्या खोलीतून बाहेर आला. आर्यन बाहेर जाताच शिवाक्षी दर्शनजवळ येऊन बसली. आर्यन बाहेर येताच ज्ञानदा त्याला म्हणाली, " आर्यन, तुझं काय चाललंय? तू दर्शनला खोटी आश्वासने का देतोय? त्यामुळे दर्शन परत हर्ट होईल ना... " 


" कुणी म्हटलं की, मी दर्शनला खोटी आश्वासने देतोय? " आर्यनने ज्ञानदालाच प्रतिप्रश्न केला. 


" म्हणजे? आर्यन तू खरंच दर्शनचं सगळं ऐकणार आहेस? " ज्ञानदाने गोंधळून विचारले. 


" हो! मी त्याचं सगळं ऐकणार. परत मला त्याला हर्ट नाही करायचंय. " आर्यन ठामपणे बोलला. 


" म्हणजे तू खरंच दुसरं लग्न करणार आहेस? " ज्ञानदाने परत आश्चर्य व्यक्त करत विचारले. 


" हो आणि त्यात मला तुझी मदत हवी आहे. " आर्यन एका दमात बोलला. 


" माझी मदत कशासाठी हवी आहे? " ज्ञानदाने न उमजून विचारले. 


" ज्ञानदा, मी आता तुझ्यासोबत जे बोलणार आहे त्यामुळे कदाचित तुझ्या भावनांना हानी पोहोचेल, त्यासाठी मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. " आर्यन बोलला पण ज्ञानदाचा मात्र गोंधळ उडाला होता. ती कपाळावर आठ्या पाडून त्याचे शब्द ऐकत होती. 


आर्यन पुढे एका दमात म्हणाला, " ज्ञानदा, तू माझ्याशी लग्न करशील का? " 


" काय? मी? " ज्ञानदाचा आवाज आश्चर्य व्यक्त करताना आपोआपच वाढला. 


" हो! तू माझ्याशी लग्न करशील का? मला माहीत आहे की, प्रत्येक मुलीची काही स्वप्न असतात विशेषतः लग्नाबद्दल आणि ती तुझीही असतील. म्हणून तू तुझा नकार कळवू शकतेस. माझी काहीच हरकत नाही. " आर्यन एकेक शब्द बोलत होता अन् ज्ञानदाच्या काळजाचा ठोका चुकत होता. तिला तर कळतच नव्हते की, ती स्वप्न बघतेय की आर्यन खरंच तिला लग्नाची मागणी घालतोय. म्हणून ती पापण्यांची उघडझाप न करता एकटक त्याच्याकडे पाहत होती. 


" हे बघ, आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करुया! " आर्यन बोलला; पण त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा उल्लेख करताच ज्ञानदा भानावर आली.


क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला अन् आनंदाची जागा वेगळ्याच हुरहुरीने घेतली. ती अडखळतच बोलली, " कॉन्ट्रॅक्ट मॅरेज? "


" हो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज! म्हणजे जगापुढे आपलं नातं नवरा-बायकोचं असलं तरी प्रत्यक्षात आपलं तसं काही नसणार. तू तुझं आयुष्य स्वतंत्र जगशील आणि मी माझं! फक्त जगापुढे आपल्याला तात्पुरता दिखावा करावा लागेल. " 


" अच्छा... " ज्ञानदाचा कंठ दाटून आला होता पण तिने त्याची जाणीव आर्यनला होऊ दिली नाही. ती ओढूनताणून मंद हसली आणि म्हणाली, " पण आर्यन हे सगळं कशासाठी? " 


" दर्शनची समजूत काढण्यासाठी, त्याचं मन राखण्यासाठी... तू बघितलंस ना तो कसा हट्टाला पेटलाय. काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. म्हणून मला हा उपाय सुचला. म्हणून जर आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि त्याच्यापुढे असं दाखवलं की, आपलं लग्न झालंय तर निदान त्याला समाधान तरी वाटेल की, दर्शिकाची इच्छा पूर्ण झालीय. " आर्यन सविस्तर माहिती देत बोलला. 


" ओह... " ज्ञानदा खिन्न स्वरात बोलली.


आज एका बापाच्या प्रेमापुढे आर्यनमधला मित्र कुठेतरी हरवला होता. त्यामुळे ज्ञानदाची नाराजी त्याच्या लक्षातही आली नाही. तो ज्ञानदाला म्हणाला, " ज्ञानदा, तू माझी चांगली मैत्रीण आहेस शिवाय दर्शनही तुझ्याशी अटॅच आहे; त्यामुळे मी तुला हे सर्व सांगितलं आणि लग्नाची मागणी घातली. जर तुझा नकार असेल तर काही हरकत नाही. दर्शनची समजूत काढायला सोपं जाईल व तुझ्याऐवजी कुण्या दुसऱ्या मुलीशी मी सेम कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करेल. "


                ज्ञानदाला काही कळेनासे झाले होते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आणि इतर सगळी संकल्पना ऐकताच तिच्या पोटात उडणारे फुलपाखरू क्षणात गुदमरून गेले. तिच्या डोळ्यासमोर जणू धुके दाटले होते. तिचं स्वप्न पायदळी तुडवल्या गेलं होतं पण तिने अजूनही तिचा संयम ढळू दिला नव्हता. ती थोडा वेळ गप्प राहिली अन् आर्यनला थोडा वेळ मागून घेतला. आर्यननेही तिला तिचा वेळ घेऊ दिला व तो दर्शनकडे निघून गेला. त्यानंतर ती सुद्धा दर्शनजवळ गेली. तिने एकदा दर्शनचा चेहरा पाहिला आणि एकदा शिवाक्षीचा. तेवढ्यात तिच्या कानात आर्यनचा आवाज ऐकू येऊ लागला. त्याने तिला लग्नाला घातलेली मागणी अन् तसेच त्याने तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची सांगितलेली संकल्पना... सगळे विचार तिच्या डोक्यात थैमान घालत होते. तेवढ्यात तिने डोळे मिटून घेत तिचा निर्णय घेतला. 


क्रमशः

............................................................... 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.

🎭 Series Post

View all