वाट हळवी वेचताना (भाग-४३)

बाप लेकाची कहाणी

" मम्मा, आर यू सिरियस? एकट्या आर्यन काकांच्या मनात एवढ्या विचारांचा गोंधळ सुरू आहे? " शिवाक्षीने आश्चर्याने विचारले. 


" हो! तुला काय वाटलं आर्यन पुरुष आहे म्हणून त्याच्या डोक्यात काहीच नसेल? त्याला कसलेच विचार पडत नसतील? अगं, पुरुष नारळासारखे असतात गं! वरून फार कठोर दिसत असले तरी आतून फार हळवे असतात. एक क्षुल्लक घटना त्यांच्या मनावर घाव करून जात असते. त्यातही प्रेमाच्या बाबतीत जास्तच हळवे असतात. जर त्यांचं खरंच एखाद्या मुलीवर प्रेम असेल तर कायमस्वरूपी त्या मुलीवरंच प्रेम करतात. मग ती मुलगी त्यांच्या आयुष्यात असो वा नसो, ती मुलगी हयात असो वा नसो! आणि दर्शिका व आर्यनच्या नात्याबद्दल काय बोलू मी... ती त्याचा श्वास होती. ती गेल्यापासून तो श्वास घेतोय ते फक्त तिला दिलेल्या वचनाखातर... तिच्यामुळे त्याचा चेहरा हसरा असायचा पण ती गेल्यापासून वाटतं तो मनमोकळेपणाने हसलाच नाही. म्हणून दर्शिकाची परवानगी असूनही तो लग्न करत नाहीये कारण तिच्याशिवाय कुणा दुसऱ्या व्यक्तीशी नातं जोडणं त्याला पटत नाहीये! मग ती दुसरी मुलगी मी का असेना... मुळात त्याला दुसरी संधी घ्यायचीच नाहीये; कारण जरी दुसऱ्यांदा प्रेमात पडता येतंही असेल पण आर्यन त्याच्या पहिल्या प्रेमाशी तडजोड करायला तयार नाहीये. " ज्ञानदा आर्यनची बाजू मांडत बोलली. 


" मग मला वाटतं, आर्यन काकाही त्यांच्या परीने योग्य आहेत. आफ्टरऑल पहिलं प्रेम फार अमूल्य असतं आणि हे तुझ्यामुळेच तर कळलंय मला; कारण तू सुद्धा आर्यन काकांवर असलेल्या प्रेमाखातर दुसरं लग्न तर दूर पण पहिलं लग्नही करत नाहीये! उफ्फ ये पहला प्यार और पहले प्यार का बुखार... " शिवाक्षी बोलली. 


" शिवा... " ज्ञानदाने डोळे विस्फारले. 


" ओके, ओके! फक्त मस्करी करत होती. " शिवाक्षी हलकेच हसून बोलली. 


" ह्म्म... सिरियस कन्व्हर्सेशनमध्ये मस्करी करायला कुणी तुझ्याकडून शिकावं. " ज्ञानदा शिवाक्षीच्या डोक्यावर टपली मारत बोलली. त्यावर शिवाक्षी हलकेच हसली. त्यानंतर त्या दोघीही त्यांच्या घरी गेल्या. 


                दुसरीकडे आर्यन आणि दर्शन घरी आले. घरी सावित्री मावशी होत्या. त्यांनी दर्शनकडे हसून पाहिले पण त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही व गपगुमान त्याच्या खोलीत निघून गेला. सावित्री मावशीने आर्यनला विचारपूस केली. तो सावित्री मावशीला आईप्रमाणे मानत असल्याने त्याने थोडक्यात माहिती दिली. सावित्री मावशीने सर्व ऐकून घेतल्यावर आर्यनचं सांत्वन केलं आणि दर्शनला थोडा वेळ द्यायला सांगितले. आर्यननेही हलकाच उसासा घेतला आणि तो त्याच्या खोलीत फ्रेश व्हायला गेला. 


आर्यन खोलीत गेला तेव्हा त्याला दर्शन बेडवर झोपून असल्याचे दिसले. त्याने त्याचा टाय सैल केला व तो दर्शनच्या बाजूला बसला. तो दर्शनच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, " दर्शन, राजा! नको ना करू हा हट्ट! मला माहिती आहे, मी आज तुझ्यावर खूप ओरडलो, तुला नको नको ते बोललो पण मलाही काळजी आहे रे तुझी! आय ऍम सॉरी कारण मी तुला हर्ट केलं. मला कळतंय की, तुला तुझ्या आईची इच्छा पूर्ण करायची आहे आणि मला आनंदात पाहायचंय पण प्लीज तू समजून घे ना! मला आपल्या दोघांत आणखी कुणाचीही मध्यस्थी नकोय रे! आपली सुद्धा कम्प्लिट फॅमिली आहे ना! मी तुझ्यासोबत आनंदी आहे. हो, तुझ्या आईची सोबत नसल्याने मी दुःखी असतो पण तिच्या आठवणी माझ्यासोबत आहेतच की! मला नाही जमणार रे तुझ्या आईव्यतिरिक्त ज्ञानदासोबत संसार थाटायला... तुला का कळत नाहीये... " 


                आर्यन थोडा वाकला आणि त्याने दर्शनच्या कपाळावर ओठ टेकवले. तेवढ्यात त्याचा एक अश्रू दर्शनच्या गालावर पडला म्हणून तो लगेच उठून उभा राहिला व बाथरुममध्ये फ्रेश व्हायला निघून गेला. बाथरुमचा दरवाजा बंद होताच दर्शनने डोळे उघडले. कदाचित तो आर्यनचा एकुण एक शब्द ऐकत होता. त्याच्याही भावनांचा उद्रेक झाला होता; म्हणून तो त्याचा हुंदका आवरून रडत होता पण तेवढ्यात बाथरुमचा दरवाजा उघडल्याची चाहूल त्याला लागली अन् त्याने त्याचा चेहरा पांघरुणात लपवून घेतला. आर्यनने बेडकडे पाहिले अन् हलकाच उसासा घेतला. त्यानंतर तो लॅपटॉप घेऊन हॉलमध्ये निघून गेला. 


आर्यन जाताच दर्शनने अंथरुणाबाहेर चेहरा काढला आणि मनातल्या मनात बोलू लागला, " बाबा, कदाचित मी तुला हर्ट करत असेलही पण मला वाटतं की, तू सुद्धा नितांत प्रेम करणारा जोडीदार डिझर्व्ह करतोस; कारण मला फक्त आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे, असं नाहीये... मला तुला नवी सुरुवात करताना पाहायचंय अन् त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुझी परवानगी असो वा नसो! " दर्शनने भिंतीवर टांगलेल्या दर्शिका आणि आर्यनच्या लग्नाचा फोटो पाहिला आणि मनोमन निर्धार केला. 


क्रमशः

................................................................. 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.




🎭 Series Post

View all