वाट हळवी वेचताना (भाग-४२)

बापलेकाची कहाणी

शिवाक्षीने दर्शनला अलगद मिठीत घेतले अन् ती त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याचं सांत्वन करू लागली. ती म्हणाली, " शुश! शांत हो! दर्शन! तू असा कोणताच विचार करू नकोस. मला माहीत आहे, तुझा हेतू तुझ्या बाबाला त्रास देणे नाहीये. तुला त्याची काळजी आहे म्हणून तू हे सगळं करतोय, आय नो! इव्हन आर्यन काकांनाही याची जाणीव आहे; पण कदाचित त्यांना तुझं म्हणणं पटत नसेल म्हणून ते चिडले असतील. सो प्लीज, तू रडू नको! " 


                शिवाक्षी दर्शनची समजूत काढत होती. दर्शन मात्र तरीही रडत होता. त्याची अवस्था बघून तिचंही मन गहिवरून आलं होतं. तिच्याही डोळ्यातून पाणी गळायला लागलं. ती पुढे आणखी काही बोलणार तेवढ्यात पळतच आर्यन आला. कदाचित त्याला जाणीव झाली होती की, तो रागाच्या भरात दर्शनला बरंच काही बोलून गेलाय. तो तडकाफडकी कारमध्ये बसला. त्या दोघांना एकट्यात बोलता यावं म्हणून शिवाक्षी कारमधून बाहेर आली. आर्यन दर्शनची समजूत काढत होता. माफी मागत होता पण दर्शन फक्त रडत होता काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे आर्यन निराश होऊन बाहेर आला. 


आर्यनचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानदा त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, " त्याला थोडा वेळ दे! हळूहळू होईल तो शांत! सध्या त्याला घरी घेऊन जा! " 


आर्यनने त्यावर हुंकार भरला अन् तो कार घेऊन निघून गेला. दुसरीकडे शिवाक्षी ज्ञानदाला पाहून म्हणाली, " मम्मा आय थिंक, काकाच मुद्दा अति ताणून घेत आहेत. ऐकून घ्यावं ना त्याचं... एवढं हायपर होण्यासारखं काय आहे? दुसरं लग्न करणं यात गैर काहीच नाहीये. कित्येक जण करतातच ना... अगं बायको जिवंत असतानाही डिव्होर्स घेऊन दुसरं लग्न करतात काही माणसं... मग इथे तर अशी काही भानगड नाही. शिवाय स्वतः दर्शिका काकूंचीच इच्छा आहे की, काकांनी दुसरं लग्न करावं मग ही नकारघंटा कशाला? " 


" तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. तू आर्यनच्या मनाचा विचार केलाय का? त्याच्या मनात नवीन नातं निर्माण करण्याची किती भीती असेल याचा तुला अंदाज आहे का? त्याच्यापुढे दर्शिकाच्या अगणित आठवणी असतील, याची कल्पना तुला आहे का? म्हणायला सगळं सोपं असतं गं पण करायला तेवढंच कठीण... तो बिचारा दर्शिकाच्या आठवणीत मनसोक्त हंबरडा फोडूसुद्धा शकत नाही कारण त्याच्यापुढे त्याच्या जबाबदाऱ्या ओसाड पडल्या आहेत. म्हणून त्याने स्वतःला निर्विकार करून घेतले. दर्शनला हर्ट करावं, असं त्यालाही वाटत नाहीये कारण तो बाप आहे त्याचा! स्वतःपेक्षा त्याच्यावर जीव ओवाळून टाकतो म्हणून त्याला नवीन नातं निर्माण करायची भीती वाटतेय.


शिवाय तो असा कसा सहजासहजी त्याचं पहिलं प्रेम विसरून नवी सुरुवात करणार? शिवा, तू नव्या पिढीची मुलगी आहेस म्हणून तू हे कॅज्युअली बोलत आहेस; पण जसजशी तू तारुण्यात शिरत जाशील तसतसे तुझं व्हिजन क्लिअर होत जाईल. राहिला प्रश्न इतर माणसांचा तर आर्यन इतरांसारखा नक्कीच नाहीये. त्याला प्रत्येक नाती जीवापाड जपायला आवडतात; म्हणून जरी दर्शिकाने त्याला दुसरं लग्न करण्याची परवानगी दिलीय तरी त्याचं मन धजावत नाहीये... कारण तो मेंटली प्रिपेअर नाहीये. त्याच्या डोळ्यापुढे आजही सर्व आठवणी ताज्या असतील, तो आजही चराचरात तिचं अस्तित्व शोधत असेल आणि म्हणूनच दुसरं लग्न करणे त्याला त्या आठवणींवर पडदा पांघरण्यासारखे वाटत असेल. किंबहुना त्याला हीसुद्धा भीती असेल की, जर त्याने दुसरं लग्न केलं आणि त्याच्या मनात दर्शिकाची जागा आजतागायत कायम राहिली तर त्याच्या दुसऱ्या बायकोला नक्कीच त्रास होईल. त्यामुळे त्याला त्या दुसऱ्या मुलीच्याही स्वप्नांचा चुराडा करायचा नाहीये. " ज्ञानदा आर्यनचं मन शिवाक्षीपुढे रेखाटत होती. 


" तुझं सगळं ठीक आहे पण दुसऱ्या मुलीचा मुद्दा येतोच कुठे? दर्शिका काकूने स्पष्ट म्हटलंय की, आर्यन काकांनी तुझ्याशी लग्न करावं अशी त्यांची इच्छा आहे. " शिवाक्षी बोलली. 


" म्हणूनच तो आणखी अनकम्फर्टेबल आहे कारण आमच्या मैत्रीचं नवरा-बायकोच्या नात्यात रुपांतर झालं तर कदाचित आमच्यातला स्पष्टवक्तेपणा कुठेतरी गहाळ होईल. शिवाय त्याचं मन त्याला वारंवार एकाच गोष्टीसाठी पोखरत राहणार की, कदाचित तो मला हवं तसं वैवाहिक जीवन देऊ शकत नाहीये. आर्यन एक पुरुष असला तरी हळवा आहे गं बराच तो! शिवाय तो पुरुष आहे म्हणूनच त्याच्या मनात एवढं सगळं सुरू आहे. त्याच्या पुढ्यात या सर्व जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे तो चिंताग्रस्त आहे. त्याला कळतंय की, दर्शनलाही त्रास होतोय. दर्शन सुद्धा त्याच्या काळजीपोटी करतोय पण त्याचाही नाईलाज होतोय आणि म्हणून तो दर्शनच्या हट्टाला नाकारतोय. " ज्ञानदाने स्पष्टीकरण दिलं आणि शिवाक्षी अगदी चिडीचूप झाली होती. 


क्रमशः

............................................................. 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.

🎭 Series Post

View all