वाट हळवी वेचताना (भाग-४१)

बापलेकाची कहाणी

                काही वेळाने ज्ञानदा तिच्या घरी गेली, आर्यनही त्याच्या खोलीत गेला अन् कुस बदलत बदलत झोपी गेला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दर्शन उठला. आर्यनलाही लगेच जाग आली. त्याने दर्शनला गुड मॉर्निंग ग्रीट केले; पण दर्शनने नीटसा प्रतिसाद दिला नाही अन् त्यावरूनच आर्यनच्या लक्षात आले की, दर्शन काल रात्री जे बोलणं झालं त्याबद्दल सिरियस होता. आर्यनने हलकाच उसासा दिला आणि रोजच्या दैनंदिन दिनचर्येला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे दर्शन शाळेत गेला अन् आर्यन ऑफिसला... डान्स क्लासमध्येही दर्शन शांत शांतच होता. शिवाक्षीने त्याला बोलते करण्याचा बराच प्रयत्न केला पण काहीच लाभ झाला नाही. 


ज्ञानदाही त्याची समजूत घालत होती पण दर्शन तिलाही प्रतिसाद देईना. तरी ती त्याला म्हणाली, " दर्शन असा कोणताही हट्ट करू नकोस. आर्यन तुझ्यावर खूप प्रेम करतो म्हणून त्याला असं छळू नकोस. उगाच त्याच्यावर असा रुसू नकोस. प्लीज, तुझ्या बाबाची बाजू समजून घे. " 


" मलाही त्याचीच काळजी आहे आणि आईला त्याची सगळ्यात जास्त काळजी होतीच ना... मग आई बाबाच्या भल्यासाठीच बोलली असेल ना तिच्या शेवटच्या इच्छेत... मग ती इच्छा पूर्ण न करण्यासारखे काय आहे? " दर्शनने प्रश्नांची सरबत्ती केली. 


" दर्शन कदाचित तुझं म्हणणं बरोबर असेलही पण आर्यनला नाही करायचंय लग्न; म्हणून बाळा प्लीज असा कोणताही अट्टाहास करू नकोस. " ज्ञानदा दर्शनची समजूत घालू लागली. 


" बाबा लग्न करणार म्हणजे करणार. त्याला करावंच लागणार. मी आईची लास्ट विश अपूर्ण नाही ठेवणार. " दर्शन बोलला. 


" अरे पण... " ज्ञानदा बोलली. 


" पण वगैरे काही नाही मॅम... मला सांगा, तुमचा होकार आहे ना? तुमचं प्रेम आहे ना बाबावर? तुम्ही करणार ना माझ्या बाबाशी लग्न? " दर्शनने एकाएकी प्रश्न विचारला आणि ज्ञानदा गोंधळून गेली. शिवाक्षीचे डोळेही आपोआप मोठे झाले. 


                तेवढ्यात आर्यनने दर्शनला रागाने हाक मारली. तो दर्शनला लवकर पिकअप करायला डान्स क्लासमध्ये आला होता अन् म्हणून कदाचित त्याने सर्वकाही ऐकलं होतं. आर्यनच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की, तो दर्शनवर फार रागवला आहे. तो दर्शनकडे डोळे विस्फारून बघत होता. ज्ञानदा आणि शिवाक्षीही आर्यन येताच उठून उभ्या राहिल्या. 


ज्ञानदाची दातखिळी बसली होती. तिला आर्यनचा क्षणिक राग माहिती होता. त्या क्षणिक रागात त्याला कशाचेही भान राहायचे नाही. त्यामुळे ती आर्यनला म्हणाली, " आर्यन, प्लीज शांत हो! हे बघ, तो लहान आहे म्हणून त्याला नाही कळत काहीच; पण तू समजून घे! प्लीज! "


" ज्ञानदा, तू गप्प बस जरा! " ज्ञानदाला गप्प राहायला सांगून आर्यनने त्याचा मोर्चा दर्शनकडे वळवला. 


तो रागीट कटाक्षाने दर्शनकडे पाहत म्हणाला, " काय चाललंय तुझं हे दर्शन? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? कोणता हट्ट करतोय तू याचं जरा तरी भान आहे का तुला? मला नाही करायचंय दुसरं लग्न? कळलं ना, नाही करायचंय... का नाही करायचंय ह्याचं कारणही मी तुला कालच सांगितलंय मग आज परत पहिले पाढे पंचावन्न का आणि कशासाठी? जेवढं तुला मी समंजस समजत होतो तेवढा तू निर्बुद्धासारखा वागतोय... महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदाशी कशाप्रकारे बोलतोय तू? मॅम आहेत ना त्या तुझ्या? ती तुझा लाड करते, तुझी काळजी घेते म्हणून तू असा काहीही बोलशील? जरा तरी अक्कल वापरत जा ना! 


                लग्न तुला बाहुला-बाहुलीचा खेळ वाटला का? आलाय मोठा आईची शेवटची इच्छा पूर्ण करणारा श्रावणबाळ... दर्शन काही गोष्टींना मर्यादा असतात, हे तू लक्षात घे, मी वारंवार तेच नाही सांगणार तुला... " 


" आर्यन... शांत हो! दर्शन रडायला लागलाय. " एव्हाना दर्शनचे डोळे पाणावले होते म्हणून ज्ञानदा हळूच आर्यनला उद्देशून बोलली अन् त्याची समजूत काढू लागली पण तिचा डाव परत फसला. 


आर्यन त्वेषाने म्हणाला, " रडू दे त्याला! त्याच्याशिवाय कळणार नाही त्याला. सारखं आपलं तेच तेच... हट्टी झालाय तो फार... त्याचं सगळं ऐकून घेतोय ना मी म्हणून तो आणखीच हट्ट करू लागलाय. " 


" आर्यन... " ज्ञानदा आर्यनच्या हाताला प्रेस करत हळूच कुजबुजली; पण वेळ निघून गेली होती. दर्शन फार दुखावल्या गेला होता. तो काहीही न बोलता रडत रडतच डान्स क्लासेसच्या बाहेर गेला. त्याच्या मागोमाग त्याची समजूत काढायला शिवाक्षी गेली. 


दर्शन मात्र रडत रडत कारमध्ये शिरला. शिवाक्षीसुद्धा त्याच्या मागोमाग कारमध्ये बसली आणि दर्शनची समजूत काढू लागली. ती त्याला म्हणाली, " दर्शन, रडू नको. तुझे बाबा तुला हर्ट करण्यासाठी बोलत नव्हते. प्लीज, शांत हो! " 


" शिवा ताई... एवढं... काय चुकीचं बोललो मी? मला... मला त्याची काळजी वाटते... म्हणूनच ना! पण... पण त्याला काही कळतच नाहीये... एवढा... एवढा काय गुन्हा केला मी? आईची इच्छा पूर्ण करणे चुकीचं आहे का? सांग ना... मी एवढा वाईट आहे का? बाबाला माझ्यामुळे एवढा... एवढा त्रास होतो का? मी एवढा... हट्टी आहे का? " दर्शन हुंदके देत विचारत होता अन् त्याला रडताना पाहून शिवाक्षीही भावूक झाली होती. 


क्रमशः

.................................................................... 

©®

सेजल पुंजे. 

२५/११/२०२२.


🎭 Series Post

View all