वाट हळवी वेचताना (भाग-४०)

बापलेकाची कहाणी...

" ज्ञानदा... तुला आणि शिवाक्षीला डायरीबद्दल कसं कळलं? " आर्यनने नजर रोखून विचारले. 


" आर्यन, आय ऍम सॉरी! हा जरा पर्सनल मुद्दा आहे पण काय झाले... " असं बोलून ज्ञानदाने शिवाक्षीच्या हाती डायरी कशी लागली आणि त्यानंतर काय काय घडले याची इत्थंभूत माहिती दिली.


सगळा प्रकार कळल्यावर आर्यन थोडा वेळ गप्प बसला. नंतर तो खिन्न स्वरात ज्ञानदाला उद्देशून बोलला, " ज्ञानदा, शिवाला योग्य अंदाज आलाय. "


" म्हणजे? दर्शनने दर्शिकाची डायरी? " ज्ञानदाने अर्धवटच प्रश्न विचारला अन् तेवढ्यात तिला हुंदका दाटून आला. 


" हो, त्याने ती डायरी वाचलीच... " आर्यन हतबल होत बोलला. 


" असं असेल तर विषय हाताबाहेर जातोय, यावर उपाय करायला हवा आर्यन! तो स्वतःलाच गिल्टी मानतोय. त्याला वाटतं की, त्याला जन्म देण्यासाठी त्याच्या आईने अर्थात दर्शिकाने स्वतःच्या आयुष्याचा बळी दिला. एवढेच नव्हे तर, त्याला हे ही वाटतं की, तू त्याच्या काळजीपोटी दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाहीये. शिवाय आणखी बरंच काही आहे. त्याच्या मनात बरेच गैरसमज झालेले आहेत. " ज्ञानदा चिंताग्रस्त स्वरात बोलली. 


" ज्ञानदा तुला सांगू, आज मला पहिल्यांदा असं वाटतंय की, बाप म्हणून आज मी हरलोय. मी त्याला कुटुंबाचं प्रेम देण्यात कमी पडलोय. त्याला वाटतं की, आमची फॅमिली इनकम्प्लिट आहे. त्यामुळे मी दुसरं लग्न करताच आमची फॅमिली कम्प्लिट होईल असा बोलला तो! खरंच गं, असं वाटतंय मी त्याला आईचं प्रेम देण्यात कायम असमर्थच ठरत आलोय. " तो स्वतःला दोषारोप करत रडत होता. त्यानंतर दर्शनसोबत त्याचा झालेला संवाद ज्ञानदाला सांगताना तो अक्षरशः कोलमडला होता. त्याचे डोळे अगणित वाहत होते. 


ज्ञानदा मात्र त्याला सावरण्याचा प्रयत्न करत होती. ती त्याला म्हणाली, " आर्यन तू गैरसमज करून घेऊ नकोस. तू तुझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत आलाय आणि तू कुठेच कमी नाही पडलास. किंबहुना तू आदर्श बाबा आहेस पण दर्शन लहान आहे रे... म्हणून त्याला नाही कळतंय तो काय बोलतोय ते... पण तू तरी त्याची बाजू समजून घे ना! हे बघ, मी समजूत काढून बघते त्याची! कदाचित त्याला कळेल पण तू सावर ना स्वतःला प्लीज! तो त्याच्या स्वार्थासाठी तुला लग्न कर असं नाही बोलतोय, त्याला वाटतंय की, तुला आधार देणाऱ्या, तुझी काळजी करणाऱ्या व्यक्तीची अन् प्रेम करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. 


                शिवाय त्याला केवळ त्याच्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे फक्त एवढं कळतंय, इतर काही समजून घ्यायला तो तयार नाहीये. त्याचबरोबर आजुबाजूच्या परिसरातली लोकं तुम्हा दोघांची खोटी कीव करतात, सहानुभूती दाखवतात तसेच कुजबुजही करतात तुझ्या अन् दर्शनविषयी... त्याचबरोबर दुसरं लग्न न करता एकट्याने दर्शनला वाढवण्याच्या तुझ्या निर्णयाविषयीही बोलतात. त्यांना वाटतं की, तू दुसरं लग्न करावं कारण अजून तुझ्यापुढे उभं आयुष्य आहे; हे सर्व जेव्हा इकडून तिकडून दर्शनच्या कानावर कायम पडत असेल त्यामुळेच कदाचित दर्शन असा हट्ट करत असावा. "


" अगं पण एकटी स्त्री तिचा नवरा मेल्यावर आपल्या लेकराला लग्न न करता एकटीने वाढवू शकते, त्या लेकराला आई आणि वडीलाचं प्रेम देऊ शकते तर मग पुरुष का नाही? तो नाही का वाढवू शकत त्याच्या लेकराला? त्याने लग्न करून घ्यावं ही समाजाची अपेक्षा का? हेच स्त्रीच्या बाबतीत असेल तर तिच्या पुनर्विवाहाला संकोच करतात ना समाज अन् या समाजाचे पुढारी मग पुरुष विधूर असेल तर त्याच्या पुनर्विवाहाला का संकोच व्यक्त केला जाऊ नये. तेव्हा का पुढाकार घेतला जातो? प्रत्येक बाबतीत अशी कशी ही असमानता? पुरुषांसाठी एक नियम अन् स्त्रियांसाठी एक नियम? आणि दर्शन केव्हापासून या आजुबाजूच्या लोकांचे बोलणे सिरियस घेऊ लागला? मला काहीच कळेनासे झालंय यार ज्ञानदा... असं वाटतं, आम्हा बापलेकाच्या नात्याला खरंच दृष्ट लागलीय. आमच्यात कधी असे वाद व्हायचे नाही. तो ऐकायचा माझं पण आज सगळं चित्र पालटलं. " आर्यन खिन्न स्वरात बोलला. 


" आर्यन, एवढा नकारात्मक विचार नको करून घेऊ! लहान आहे रे तो... योग्य-अयोग्याची जाण नाहीये त्याला पण हो, तुझ्यावर निस्सीम प्रेम आहे त्याचं! " ज्ञानदा आर्यनच्या हातावर हात ठेवत बोलली. 


" मला माहीत आहे गं! म्हणून तर मला त्याची जास्त काळजी वाटतेय कारण तो माझा आनंद शोधण्याच्या नादात भलताच निश्चय मनी करून बसलाय, असं मला वाटतं. " आर्यन चिंताग्रस्त स्वरात बोलला. 


" काळजी करू नकोस. मला वाटतं उद्या सकाळपर्यंत तो सगळं विसरून जाईल आणि जर समजा, तो तरीही हट्ट करत राहिला तर मी स्वतः त्याची समजूत काढेल. " ज्ञानदा आर्यनला आश्वासन देत बोलली. त्यावर आर्यनने हुंकार भरला. 


क्रमशः

.............................................................. 

©®

सेजल पुंजे

२४/११/२०२२.

🎭 Series Post

View all