Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग -३९)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग -३९)

" बाबा का संदर्भ जोडू नये मी? मला सांग, चित्रपट जरी काल्पनिक असले तरी चित्रपट लिहिणारा लेखक हा तर वास्तविक असतो ना... आणि तो लेखक सर्वस्वी कल्पना करतो हे कशावरून? जगात जे घडतं त्याचाच संदर्भ घेऊन लेखक त्याच्या कथेची पात्र रंगवतो ना? मग चित्रपट आणि वास्तविक आयुष्यात ही एवढी मोठी पोकळी का बरं? जर चित्रपटात जे घडतंय ते आपल्याला आवडतं तर मग खऱ्या आयुष्यात अप्लाय करताना कुरबुर का? पडद्यावरील पात्र आणि त्यांच्या कहाणीला आपला सपोर्ट असतो तर मग खऱ्या आयुष्यातही तेच घडत असेल तर फरक का पडतो? जसा चित्रपटाचा शेवट हॅप्पी एंडिंगने होतो तसाच शेवट खऱ्या आयुष्यात होण्याचीही अपेक्षा का ठेवू नये? सांग ना बाबा का? " दर्शन एका मागोमाग प्रश्न विचारत होता. 


" तुझ्या का? चे उत्तर नाहीये माझ्याकडे... पण माझ्या मनात फक्त तुझी आईच आहे. तिच्या व्यतिरिक्त कुणीच नाही. " आर्यन ठाम राहिला. 


" पण माझ्या आईच्या शेवटच्या इच्छेचं काय? " दर्शनने केविलवाणा चेहरा करत विचारले. 


" माझ्यासाठी ती शेवटची इच्छा काहीच महत्त्वाची नाही. ज्यात ती माझ्यापासून दूर जातेय, ज्यात ती मला कुणा दुसऱ्या मुलीसोबत संसार थाटायला सांगतेय, ज्यात तिचं अस्तित्व हरवतंय, ज्यात तिचे अधिकार ती कुण्या दुसऱ्या मुलीला द्यायला सांगतेय, ज्यात ती तिच्या प्रेमाचा त्याग करतेय. म्हणून ती इच्छा मी पूर्ण करणार नाही. " आर्यन त्याचा आक्रोश व्यक्त करत बोलला. त्यामुळे त्याचे डोळे अगदी लाल झाले होते. 


" पण बाबा त्या शेवटच्या इच्छेत आईची परवानगी आहे, त्यात आईची इच्छाशक्ती आहे, त्यात तिची काळजी आहे, त्यात तिचं तुझ्यावरचं अखंड प्रेम आहे, त्यात तुझ्यावरचा नितांत विश्वास आहे, हे तुला का नाही कळतंय? " दर्शन बोलला. 


" मला नाही कळवून घ्यायचंय काहीच... ना मला काही वळवून घ्यायचंय... " आर्यन बोलला. 


" बाबा... " दर्शन पुढे आणखी काही बोलणार होता पण त्याआधीच आर्यन बोलला, " नाही दर्शन प्लीज! मला नकोय या विषयावर आणखी चर्चा! म्हणून थांबव हा विषय इथेच! " 


" मीसुद्धा तुला सांगतोय की, मी आईची शेवटची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणारंच! " दर्शनने त्याचा निर्णय ऐकवला आणि पाय आपटतच तो त्याच्या खोलीत निघून गेला. आर्यन मात्र विचारचक्रात हरवून स्तब्ध बसून राहिला. 


                दर्शन खोलीत जाऊन मनोमन निश्चय करत झोपी गेला. आर्यन मात्र हॉलमध्येच बसून राहिला. तेवढ्यात त्याला दार ठोठावण्याचा आवाज आला. त्याने दार उघडले तर त्याला ज्ञानदा दिसली. त्याने चेहरा नॉर्मल करत तिचं स्वागत केलं आणि सोफ्यावर बसायला सांगितलं; पण तिलाही आर्यनचा चेहरा पाहताच कळले की, नक्की काहीतरी बिनसले आहे. तिच्या मनात शंका होतीच पण सध्यातरी तिने त्याला विचारणे टाळणे अन् ती स्वतः ज्या निमित्ताने आर्यनकडे आली होती त्याकडे लक्ष केंद्रित करून तिने आर्यनसोबत बोलायला सुरुवात केली. 


ती आर्यनला म्हणाली, " आर्यन मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. "


" ज्ञानदा प्लीज! जर ऑफिसबद्दल काही असेल तर आपण उद्या बोलूया ना! कारण सध्या माझी मनस्थिती नाहीये. " आर्यन बोलला. 


" आर्यन मला त्याबद्दल नाही बोलायचंय. मला दर्शनबद्दल बोलायचंय. " ज्ञानदा बोलली. 


" दर्शनबद्दल? काय बोलायचंय त्याच्याबद्दल? " आर्यन गंभीर होत बोलला. 


" अं... खरंतर मला पूर्णतः खात्री नाहीये पण शिवा बोलली की, दर्शन हल्ली बदललाय. त्याच्या वागण्यात तिला बदलाव जाणवतोय. " ज्ञानदा अवघडून बोलली. 


" म्हणजे? " आर्यनने न कळून विचारले. 


" म्हणजे तो आजकाल कायम कसल्याशा विचारात हरवलेला असतो, जेवणाकडे दुर्लक्ष करतोय, सगळ्यांची सोबत असूनही फार एकटा राहायला लागलाय. खेळण्यातही त्याचं फारसं लक्ष नसतं. " ज्ञानदा थोडक्यात सांगू लागली. 


" त्याच्या असे वागण्यामागे कारण काय आहे? त्याला शाळेतल्या मुलांनी परत त्रास दिला का? " आर्यनला लगेच दर्शनची काळजी वाटली. त्याने गंभीर होत विचारपूस करायला सुरुवात केली. 


" नाही, आता शिवा त्याच्यासोबत असताना कुणाची बिशाद नाहीये दर्शनला त्रास द्यायची. मला वाटतं भानगड काहीतरी वेगळी आहे. " ज्ञानदा सुचक बोलली. 


" ज्ञानदा मला समजेल असं सांगशील का? " आर्यन थोडा चीडचीड करत बोलला. 


" अं! शिवाला वाटतंय की, कदाचित तो त्याच्या आईला एवढ्यात खूप जास्त मिस करू लागलाय. तिने मला बरंच काही सांगितलं दर्शनच्या बदललेल्या स्वभावाबद्दल आणि आविर्भावाबद्दलही! ती बोलली की, आजकाल तो दर्शिकाचा फोटो जवळ घेऊन फिरतो, तिच्या फोटोला छातीशी कवटाळून रडतो. शिवाय, शिवाला वाटतं की, कदाचित दर्शनने दर्शिकाची डायरी वाचली असावी. " एकीकडे ज्ञानदाने घाबरतच तिच्या शब्दांना विराम लावला अन् दुसरीकडे तिच्या मुखातून डायरी हा शब्द ऐकताच आर्यनचे डोळे विस्फारले अन् तो ज्ञानदाकडे अतिशय आश्चर्याने पाहू लागला. 


क्रमशः

............................................................ 

©®

सेजल पुंजे

२४/११/२०२२.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//