Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हळवी वेचताना (भाग-३८)

Read Later
वाट हळवी वेचताना (भाग-३८)

 " दर्शन... तू काय बोलतोय? मला तर काही कळतच नाहीये. " आर्यन नजरानजर टाळून विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागला. 


" बाबा, मी काय बोलतोय हे तुलाही माहिती आहे अन् मलाही! पण मला वाटतंय की, तू विषय टाळण्याचा प्रयत्न करतोय. किंबहुना, तुला कळतंय सारं पण वळवून घ्यायचं नाहीये! " दर्शन आर्यनवर नजर रोखत बोलला. 


" दर्शन! तुझ्या आईची कोणतीच शेवटची इच्छा नव्हती. म्हणून तू तुझ्या मनातून हे खूळ काढून टाक. " आर्यन थोडा गंभीर आवाजात बोलला. 


" बाबा, माझ्या डोक्यात कसलंच खूळ नाहीये. म्हणून तू माझ्यासमोर खोटं बोलू नकोस. मला माहीत आहे की, आईची शेवटची इच्छा अद्याप अपूर्ण आहे; कारण मी आईची डायरी वाचली आहे. " दर्शन बोलला. 


" डायरी? कोणती डायरी? दर्शन तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तुझ्या आईला डायरी लिहायची सवय नव्हती. " आर्यन थंड आवाजात बोलला. 


" बाबा, आई डायरी लिहायची. आई जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तिने डायरी मेंटेन केली होती. त्यात आईने तिचे रोज बदलणारे क्रेव्हिंग्स्, तिला होणारा त्रास, तिला आपल्या दोघांची वाटणारी काळजी, तिचं आपल्या दोघांवरचं प्रेम, हे सगळं लिहिलं होतं आणि त्याच डायरीच्या शेवटच्या पानावर आईने तिची शेवटची इच्छाही लिहिली होती. तिला ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं, त्या दिवशीच्या आदल्या रात्री आईने अखेरचा हातात पेन घेऊन त्या डायरीत तिची शेवटची इच्छा लिहिली होती. " दर्शन बोलला पण त्याचे शब्द ऐकून आर्यनला धक्का बसला. 


आर्यन अवाक् झाला होता. त्याला घाम फुटला अन् तो दर्शनकडे अविश्वासाने बघून अडखळतच म्हणाला, " दर्शू... तुला एवढं कसं माहीत? तू... तू खरंच दर्शिकाची डायरी वाचलीस? दर्शू... तू मस्करी करतोय ना माझ्याशी? हं? " 


" नाही बाबा! मी मस्करी नाही करतोय. मी खरंच आईची डायरी वाचलीय आणि आईची शेवटची इच्छाही! आणि म्हणून मला वाटतं की, तू आईची शेवटची इच्छा पूर्ण करावी. " दर्शन बोलला. 


" दर्शन बाळा काय बोलतोयस तू? बाळा, तू लहान आहेस म्हणून तुला काही कळत नाहीये; पण मी तुझ्या आईची शेवटची इच्छा पूर्ण करू शकत नाही. " आर्यन जमेल तेवढ्या शांत आवाजात बोलला. 


" पण का बाबा? त्यात गैर काय आहे? " दर्शनने नजर रोखत विचारले.


" तुला नाही कळणार राजा... " आर्यन उदास स्वरात बोलला. 


" मला का नाही कळणार बाबा? न कळण्यासारखं काय आहे? तू मला समजावून सांग ना! आईची शेवटची इच्छा पूर्ण न करण्याइतपत ती अवघड नक्कीच नाहीये. मग तुझी हरकत का आहे? तू दुसरं लग्न करून का नव्याने संसार थाटू शकत नाही? का तुला लग्न करायचं नाहीये? मी पाहिलंय, ज्ञानदा मॅमला तुझी काळजी आहे आणि त्यांचं तुझ्यावर प्रेम असल्याची खात्री आईला होती, त्याबद्दलही तिने तिच्या डायरीत लिहिलंय मग ज्ञानदा मॅमबरोबर तू नवी सुरुवात का नाही करू शकत? " दर्शन अक्षरशः आक्रोश व्यक्त करत होता. 


" बाळा! संसार, लग्न, प्रेम हे कळायला तुझं वय लहान आहे रे... " आर्यन बोलला. 


" असं काही नाहीये. बाबा तू का समजून घेत नाहीये? तू माझी काळजी नको करू! मला माहीत आहे की, तुलाही तुझ्यावर प्रेम करणाऱ्या, काळजी घेणाऱ्या व्यक्तीची गरज आहे आणि अशी व्यक्ती ज्ञानदा मॅम आहेत. म्हणून तू प्लीज त्यांच्याशी लग्न कर ना! जर तू त्यांच्याशी लग्न केलंस तर मग आपली सुद्धा एक कम्प्लिट फॅमिली असेल. " 


" मग तू आणि मी मिळून आपली कम्प्लिट फॅमिली नाहीये का दर्शू? " आर्यनने दर्शनला प्रश्न विचारला. 


" तसं नाहीये रे बाबा... मला हे नाही म्हणायचंय. मला म्हणायचंय की, जर तू ज्ञानदा मॅमशी लग्न केलंस तर आपल्या फॅमिलीत तू, मी, ज्ञानदा मॅम आणि शिवाक्षी ताई असेल. ज्यामुळे मला आई आणि शिवाक्षी ताईला बाबा मिळेल. " दर्शन बोलला. 


" दर्शन, तुला नाही कळतंय तू काय बोलतोयस म्हणून तू जरा शांत हो आणि हा विषय इथेच थांबव. " आर्यन गंभीर होत बोलला. 


" बाबा, तू सध्यातरी समजून घेत नाहीये. जरा विचार करून बघायला काय हरकत आहे? "कुछ कुछ होता है" मध्ये नाही का राहुलने अंजलीबरोबर दुसरं लग्न केलं होतं? मग त्याचप्रमाणे तू लग्न केलंस तर गैर काय आहे? " दर्शन त्याच्यापरीने मुद्दे मांडत होता. 


" दर्शन, चित्रपट आणि खऱ्या आयुष्यात खूप मोठी तफावत असते. त्या "कुछ कुछ होता है" मध्ये राहुलला झालं असेल दुसऱ्यांदा प्रेम पण खऱ्या आयुष्यात मला नाही जमणार दर्शिकाऐवजी कुण्या दुसऱ्या मुलीचा विचार करायला... जरी ती मुलगी ज्ञानदा का असेना तरी मी दर्शिकाची जागा कुणालाच देऊ शकणार नाही. म्हणून चित्रपट आणि खऱ्या आयुष्याचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करू नकोस, दर्शन! प्लीज! " आर्यनचा कंठ दाटून आला होता. त्याचे डोळे दर्शिकाच्या आठवणीने डबडबले होते. 


क्रमशः

......................................................... 

©®

सेजल पुंजे

२४/११/२०२२.ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//