वाट हळवी वेचताना (भाग-३५)

बापलेकाची कहाणी...

                डायरीचं शेवटचं पान वाचून झाल्यानंतर शिवाक्षी फार गोंधळून गेली होती. एकाचवेळी नानाविध विचार तिच्या डोक्यात थैमान घालू लागले. तेवढ्यात तिला दर्शनची चाहूल लागली म्हणून तिने ती डायरी जिथे होती तिथेच ठेवली पण त्याआधी तिने मोबाईलमध्ये त्या डायरीच्या शेवटच्या पानाचा फोटो काढून घेतला व ती कपाटातून बाहेर निघली. दर्शन खोलीत येताच ती त्याच्याबरोबर बाहेर हॉलमध्ये आली आणि लपंडाव खेळून दमल्याचा बहाणा करून ती दर्शनबरोबर टीव्ही पाहू लागली. काही वेळानंतर शिवाक्षी तिच्या घरी निघून गेली. 


               शिवाक्षी तिच्या घरी परत गेल्यावर थोडी गप्प गप्पच होती. तिच्यातला हा बदल ओळखणे ज्ञानदासाठी नवीन नव्हते. तिने लगेच शिवाक्षीला गाठलं आणि विचारपूस करायला सुरुवात केली पण ती काही केल्या बोलेना.


ज्ञानदाने उगाच रुसण्याचं नाटक केलं अन् ती रुसल्याचे शिवाक्षीच्या लक्षात येताच ती ज्ञानदाचा हात हातात घेत म्हणाली, " मम्मा, एक प्रश्न विचारू का? " 


" हो विचार ना! " ज्ञानदा बोलली. 


" तुझं अजूनही आर्यन काकांवर प्रेम आहे का? " शिवाक्षीने प्रश्न विचारला पण तिचा प्रश्न ऐकून ज्ञानदाच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने शिवाक्षीच्या हातातून हात सोडवून घेतला आणि तिच्या जागेवरून उठून उभी राहिली व उगाच घरातली सावरासावर करत विषय बदलण्याचा प्रयत्न करू लागली. 


ती म्हणाली, " शिवा मध्येच हा कोणता विषय घेऊन बसलीस? "


" मम्मा, प्लीज सांग ना! " शिवाक्षी हट्ट करत बोलली. 


" मला नाही माहिती... " ज्ञानदा नजर चोरून बोलली. 


" मग तू आजोबांनी निवडलेल्या मुलाशी लग्न का करत नाहीस? " शिवाक्षीने तावातावाने विचारले. 


" शिवा... " ज्ञानदा शिवाक्षीकडे रागाने पाहू लागली. 


" मग खरं सांग ना... " शिवाक्षीनेही ज्ञानदावर नजर रोखली. 


" हो, हो, हो! आहे माझं प्रेम आर्यनवर... " ज्ञानदा बोलली. 


" मग तू त्यांच्यापुढे स्वतःचं प्रेम व्यक्त का करत नाही? " शिवाक्षीने विचारले. 


" शिवा, तुला नाही कळणार! मी एकदा चुकी केली होती. आता परत तीच चूक मला नाही करता येणार. त्यावेळी मी खूप जास्त हिंमत एकवटून प्रयत्न केला होता; पण त्याने नकार दिला आणि क्षणात मी विखुरल्या गेली होती. म्हणून आता मला आमच्या निरपेक्ष मैत्रीवर गदा आलेली नाही पटणार! " ज्ञानदा भूतकाळ आठवून बोलली. 


" पण तुझ्या मनाचं काय? " शिवाक्षीने प्रश्न उपस्थित केला. 


" मी आर्यनच्या मैत्रीनेही संतुष्ट आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी प्रेम केलंय म्हणून त्यानेही करावं, असा अट्टाहास नसतो ना! " ज्ञानदा मंद हसत बोलली. 


" तुझ्या मनाचं ठीक आहे गं! निदान तू स्वतःच्या मनाची समजूत तरी घालू शकतेस पण त्या बिचाऱ्या दर्शनचं काय? " शिवाक्षी उदास होत बोलली. 


" दर्शनचं काय म्हणजे? शिवा काय झालंय त्याला? तो ठीक आहे ना? शिवा नेमकी काय भानगड आहे? " दर्शनचा उल्लेख होताच ज्ञानदालाही त्याची काळजी दाटून आली. 


" झुरतो तो आईच्या प्रेमासाठी... तुझ्यात तो त्याची आई शोधण्याचा प्रयत्न करतो. तो आईच्या प्रेमाचा भुकेला आहे गं! आर्यन काका त्याची काळजी घेतात हे निर्विवाद सत्य असलं तरी कुठे ना कुठे दर्शनला आईची उणीव भासतेच; पण का कोण जाणे जेव्हा तू त्याच्या सोबत असतेस तेव्हा त्याला बरं वाटतं. एवढेच नव्हे तर तो माझ्यासोबत वेळ घालवतो; पण कुठे ना कुठे त्याला माझा हेवा वाटतो कारण माझ्याकडे तू आहेस. शिवाय... " शिवाक्षी बोलता बोलता मध्येच थांबली. 


" शिवाय काय? " ज्ञानदाने चिंताग्रस्त स्वरात विचारले. 


" शिवाय मला वाटतं कदाचित दर्शनने दर्शिका काकूंची डायरी वाचली असावी. " शिवाक्षी बोलली. 


" डायरी? कोणती डायरी? मला वाटतं की, तुला काहीतरी गैरसमज झालाय. दर्शिकाला डायरी लिहायची सवय नव्हती. " ज्ञानदा बोलली. 


" मान्य आहे काकूंना डायरी लिहिण्याची सवय नव्हती पण प्रेग्नन्सीदरम्यान त्यांनी डायरी मेंटेन केली होती. त्यात त्यांनी त्यांना प्रेग्नन्सीदरम्यान होणारा त्रास, बदलणारे मुड स्विंग्ज या सगळ्याची नोंद करून ठेवली होती. " शिवाक्षी बोलली. 


" हो मग त्या डायरीत आक्षेपार्ह तर काही नाहीये ना! मग काय झालं दर्शनने ती डायरी वाचली तर? " ज्ञानदाने हलकाच उसासा घेत विचारले. 


" पण त्या डायरीच्या शेवटच्या पानावर दर्शिका काकूंनी त्यांची शेवटची इच्छा लिहिली होती. " शिवाक्षी बोलली. 


" शेवटची इच्छा? " ज्ञानदाचा अक्षरशः गोंधळ उडाला होता. 


" ह्म्म! हे बघ... वाच तूच! मी त्या डायरीच्या शेवटच्या पानाचा एक फोटो घेतला होता. अंधार जास्त असल्याने स्पष्ट नाही आलाय पण फ्लॅशमुळे अक्षर स्पष्ट दिसत आहेत. " शिवाक्षीने तिचा मोबाईल ज्ञानदाला सोपविला. 


" तू दर्शिकाच्या डायरीतल्या पानाचा फोटो का काढलास? " ज्ञानदाने विचारले. 


" तू तो फोटो बघ अन् त्यात जे लिहिलंय ते वाच आधी! " शिवाक्षी मोबाईलमधल्या फोटोकडे खुणावून बोलली; पण ज्ञानदा मात्र शिवाक्षी अन् हातातील मोबाईल यांच्याकडे आळीपाळीने गोंधळून पाहत राहिली. 



क्रमशः

.......................................................... 

©® 

सेजल पुंजे

२४/११/२०२२.

🎭 Series Post

View all