वाट हळवी वेचताना (भाग-३४)

बापलेकाची कहाणी...

आर्यनचा गोंधळ दूर करण्यासाठी ज्ञानदाने खोल श्वास घेतला अन् ती त्याला म्हणाली, " आर्यन, माझ्या बाबांचं साम्राज्य एका सुज्ञ आणि कर्तबगार व्यक्तीच्या हातात असावं, हाच माझा कायम प्रयत्न असेल आणि म्हणूनच त्यासाठी मी तुझी निवड केलीय. म्हणून अभेद्यने जरी तुझी लायकी काढली तरी याचा अर्थ हा नाही की, तू पात्र नाहीस. मी तुझी नेमणूक करण्यामागे जी कारणे होती ती आधीच स्पष्ट केलेली आहेत म्हणून तू सुद्धा कोणतेही गैरसमज करून घेऊ नकोस. स्वतःवर विश्वास ठेव! "


" पण अभेद्य सर हे पद जास्त डिझर्व्ह करतात? " आर्यन बोलला. 


" कोण? अभेद्य? नाही मुळीच नाही! त्याला फक्त ही कंपनी काबीज करायची आहे. त्याचा कल ह्या कंपनीचा उत्तराधिकारी होण्याचे आहे. त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. " ज्ञानदा म्हणाली. 


" काय? " आर्यनने आश्चर्याने विचारले. 


" होय! अभेद्य आणि त्याचे वडील विश्वजीत वानखेडे फार पूर्वीपासून डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा मनसुबा ठेवून आहेत. त्यामुळे ह्या कंपनीचं भविष्य तुझ्याच नेतृत्वाखाली सुरक्षित राहील, असं मलाच नव्हे तर सर्व इंम्प्लॉईज आणि माझ्या बाबांनाही वाटतं. वी ऑल ट्रस्ट यू आर्यन दॅट्स व्हाय यु आर द सी.ई.ओ. ऑफ द कंपनी फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स! " ज्ञानदा बोलली. 


" देन आय होप की, मी सगळ्यांचा विश्वास सार्थ करणार. " आर्यन मंद हसत बोलला. त्यावर ज्ञानदाही हसली. त्यानंतर दोघेही मिटींग हॉलबाहेर गेले आणि त्यांच्या त्यांच्या कामाला लागले. 


                 ज्ञानदाने पी.आर. टीमद्वारे मिडीयाशी संपर्क साधून सी.ई.ओ.च्या नेमणुकीचा खुलासा केला. इतरही कामे तिने आटोपले. आर्यनने कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांची मिटींग बोलावली. त्यांना नवनवीन टास्कचे वाटप केले. त्याचबरोबर अतिरिक्त वेळ काम करण्याचा प्रस्ताव मांडला व मोबदला म्हणून बोनस आणि पगारवाढीची हमी दिली. त्यामुळे सर्व खूश झाले आणि जोमाने काम करू लागले. त्यानंतर त्याने नक्षत्र चव्हाणची भेट घेऊन कंपनीने घेतलेल्या निर्णयाचा आढावा दिला. सी.ई.ओ. म्हणून आर्यनची नेमणूक झाल्याची खबर ऐकून नक्षत्रला दुप्पट आनंद झाला. त्याने आर्यनचे अभिनंदन केले. आर्यनने नक्षत्रला एक ब्लॅंक चेक दिला. जो दिग्विजय कर्वे यांनी नक्षत्रला द्यायला सांगितला होता; जेणेकरून नक्षत्रला आर्थिक मदत लाभेल. ती मदत मिळाल्याने नक्षत्रला फार बरे वाटले. 


                त्यानंतर नक्षत्रचा निरोप घेऊन आर्यन त्याच्या घरी गेला. तो दिवस अगदी धावपळीत गेला. घरी दर्शन आणि सावित्री मावशी होत्या. घरी पोहोचताच फ्रेश झाल्यावर त्यांनी जेवण आटोपले. त्यांचं आवरून होताच सावित्री मावशी त्यांच्या घरी गेल्या आणि ते दोघे बापलेक त्यांच्या खोलीत झोपायला गेले. बेडवर पडल्या पडल्या क्षणार्धात आर्यन आणि दर्शन दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी नित्यनेमाने त्यांची दिनचर्या सुरू झाली. रोज दिवस सरत होते. कंपनी दिवसेंदिवस प्रगती करत होती. 


                आर्यनच्या मनमिळाऊ स्वभावामुळे विदेशी गुंतवणूकदारही गुंतवणूक करायला पुढे येऊ लागले. रायव्हल कंपनीचा फडशा पडला होता; कारण डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा डंका वाजला होता. त्यांनी त्यांच्याकडे असलेले सर्व प्रोजेक्टस् उत्कृष्ट हाताळले होते. शिवाय एकही नवीन टेंडर हिसकावून घेण्याला आर्यनने रायव्हल कंपनीला संधी दिली नव्हती. एवढे चोख आणि जबरदस्त प्रस्ताव त्याने मांडले होते. त्यामुळे सगळीकडे डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा बोलबाला होता. पाहता पाहता आर्यनला सी.ई.ओ.चा पदभार सांभाळताना सहा महीने निघूनही गेले; पण हल्ली या वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आर्यन दर्शनला फारसा वेळ देऊ शकत नव्हता. तरीही दर्शन तक्रार करायचा नाही कारण आता त्याला शिवाक्षीची सोबत होती. त्यामुळे त्याला एकलकोंडेपणा जाणवायचा नाही. तो तिच्याबरोबर खेळत राहायचा, अभ्यासही करायचा आणि डान्स प्रॅक्टिसही करायचा. 


                 एकदा असेच ते दोघे लपंडाव खेळत होते. दर्शनवर डाव होता म्हणून शिवाक्षी दर्शनच्याच खोलीतल्या कपाटात लपून बसली होती. दर्शन तिला सगळीकडे शोधत होता. तेवढ्यात शिवाक्षीला एक डायरी दिसली. तिच्याही नकळत तिने ती डायरी उघडून पाहिली. तर तिला कळले की, ती डायरी दर्शनच्या आईची अर्थात दर्शिकाची आहे व त्या डायरीत तिने दर्शनच्या जन्मापूर्वी अर्थात ती गरोदर असताना लिहिले होते. त्यात लिहिलेला एकूण एक शब्द वाचून शिवाक्षीचं मन भावूक होत होतं. त्यात तिने तिला प्रेग्नन्सीदरम्यान होणारा त्रास वर्णिला होता. त्यामुळे ते वाचून शिवाक्षीचं मन भरून आलं होतं अन् सरतेशेवटी तिने त्या डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यावर लिहिलेले शब्द वाचून ती अगदी गोंधळून गेली. तिने त्या पानावर लिहिलेले शब्द परत एकदा वाचले पण अर्थ तोच होता. त्यामुळे शिवाक्षीचे हात आपोआप तिच्या ओठांवर गेले. 


क्रमशः

......................................................... 

©®

सेजल पुंजे

२४/११/२०२२.



🎭 Series Post

View all