वाट हळवी वेचताना (भाग-३३)

बापलेकाची कहाणी...

                ज्ञानदाच्या स्पष्टीकरणावर सगळ्यांच्या नजरा स्थिरावल्या होत्या आणि कानही अगदी टवकारलेले होते. सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती अन् तेवढ्यात ज्ञानदाने बोलायला सुरुवात केली. 


ती म्हणाली, " पहिलं तर, मिस्टर अभेद्य वानखेडे मला माहीत आहे की, इथे आपण सर्व कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायला जमलेले आहोत; त्यामुळे माझ्या व्यक्तिगत नातेसंबंधांचा तुम्ही उल्लेख न केलेलाच बरा! म्हणून माझी आर्यन ताम्हणकरांशी मैत्री असेल तरीही मी निव्वळ त्या एका कारणामुळे कंपनीचं भविष्य कुणाच्याही हातात सोपविणार नाहीच. महत्वाचं म्हणजे जर मला माझ्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला सी.ई.ओ. पद बहाल करायचे असते तर मी आर्यनची निवड न करता तुम्हाला सी.ई.ओ. घोषित केले असते; कारण माझी आणि तुमची ओळख बालपणापासूनची आहे ना! पण मी तसे केले नाही म्हणजे नक्कीच माझ्यासाठी माझ्या व्यक्तिगत मैत्रीसंबंधापेक्षा कंपनीचं भवितव्य महत्त्वाचं आहे, नाही का? " 


ज्ञानदाचे शब्द ऐकून अभेद्यची चांगलीच जिरली. तो पुढे काही बोलूच शकला नाही. निव्वळ मनोमन तणतण करत राहिला, ज्ञानदाने मात्र तिचे बोलणे सुरू ठेवले. ती पुढे बोलली, " आता सगळ्यांना जो मुख्य प्रश्न पडलेला आहे की, सी.ई.ओ. म्हणून मिस्टर आर्यन ताम्हणकरांना का निवडले तर याचे कारण असे की, कंपनीचे संचालक अर्थात दिग्विजय कर्वे हे मिस्टर आर्यन ताम्हणकर यांची कंपनीप्रती असणारी निष्ठा फार पूर्वीपासून अनुभवत आलेय. त्यांना कंपनीचा नेपथ्यकार हा कर्तव्यनिष्ठ व्यक्ती हवा होता. तसेच जे सर्व कलागुण एका सी.ई.ओ.मध्ये असायला हवे त्याची झलक निःसंशय मिस्टर आर्यन ताम्हणकर यांच्या व्यक्तिमत्त्वात त्यांना झळकली आणि म्हणून सी.ई.ओ.च्या पदी त्यांची निवड करण्याचे निश्चित झाले. 


एवढेच नव्हे तर, मिस्टर आर्यन ताम्हणकर यांना बरेचदा रायव्हल कंपनीकडून मोठमोठी आमिषे देण्यात आली, जेणेकरून त्यांच्याकडून रायव्हल कंपनी आपल्या येथील गोपनीय माहिती जाणून घेऊ शकतील; परंतु मिस्टर आर्यन ताम्हणकर तटस्थ राहिले. त्यांनी कोणत्याही रायव्हल कंपनीचे आमिष स्विकारले नाही व ते आपल्या कंपनीशी कायम एकनिष्ठ राहिले. या सगळ्याची नोंद आम्ही विशेषतः घेतली. त्यामुळे पुनश्च सी.ई.ओ.पदी आर्यन ताम्हणकर नेमले जावे, हाच निर्णय संमत झाला. 


                त्याचबरोबर आम्ही काल रात्री सी.ई.ओ. पदासाठी एक गोपनीय निवडणूक घेतली होती. ज्यात आपल्या कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मत नोंदवले अन् आश्चर्याची बाब म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांनीही आर्यन ताम्हणकर यांनाच मत दिले. या सर्व कारणांमुळे सी.ई.ओ.पदी आर्यन ताम्हणकर यांची नेमणूक करण्यात आली. मला वाटतं सगळ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत तर आता आपण ही मिटींग संपली असं जाहीर करूया. बाकी उर्वरित पब्लिसिटीचं काम पी.आर. टीम सांभाळून घेतील. तसेच आर्यन ताम्हणकर आजपासूनच त्यांचा पदभार सांभाळतील, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. "


                ज्ञानदाने स्पष्टीकरण देताच सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी ज्ञानदाच्या निर्णयाला मान दिला. तसेच आर्यनला शुभेच्छा दिल्या व ते सर्व परवानगी घेऊन मिटींग हॉलबाहेर गेले; पण अभेद्यचा चेहरा अगदी उतरला होता. त्याच्या मनात राग अगदी खदखदत होता. त्याने ना आर्यनचे अभिनंदन केले ना तो काही बोलला. फक्त तडकाफडकी पाय आपटत आपटत तो तेथून बाहेर गेला. त्यानंतर तिथे फक्त आर्यन, दिग्विजय कर्वे आणि ज्ञानदा होते. आर्यन अजूनही धक्क्यात होता. 


एका क्षणात त्याच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी आल्याने त्याला कसे रिऍक्ट व्हावे, हेच कळेना. तरीही त्याने खोल श्वास घेतला आणि तो चेअरपर्सन द्विग्विजय कर्वे यांना उद्देशून म्हणाला, " सर, तुम्ही माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली पण कदाचित मी तेवढा सक्षम नाहीये. " 


" आर्यन, तुझ्या कार्यक्षमतेवर तुझ्यापेक्षा माझा जास्त विश्वास आहे. किंबहुना चार उन्हाळे-पावसाळे जास्त अनुभवले आहेत मी! म्हणून कुणाची काय पात्रता आहे, ह्याची पारख मला आहे. तुला हे पद मी तुझा प्रामाणिकपणा पाहूनच दिलंय आणि मला माहीत आहे तू तुझी भूमिका अगदी तटस्थपणे निभावशील. बीकॉज आय नो यु डिझर्व्ह द पोस्ट ऑफ सी.ई.ओ.! सो, दॅट्स व्हाय, बी कॉन्फिडेन्ट यंग बॉय! " दिग्विजय कर्वे आर्यनच्या पाठीला थोपटून त्याला चिअरअप करत बोलले अन् थोड्या वेळानंतर ते ही मिटींग हॉलबाहेर गेले. 


त्यानंतर तेथे फक्त आर्यन आणि ज्ञानदा होते. आर्यन ज्ञानदाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत बोलला, " ज्ञानदा, अभेद्य सर बरोबर बोलले होते. माझी लायकी नाहीये सी.ई.ओ. होण्याची... मला सांग तू माझी निवड फक्त मी तुझा मित्र आहे म्हणून केली नाहीस ना? " 


                एकीकडे आर्यनच्या मनातील शंका ऐकून ज्ञानदाने डोक्यावर हात मारून घेतला. दुसरीकडे आर्यनचा मात्र अद्याप गोंधळ उडाला होता. 


क्रमशः

..........................................................

©®

सेजल पुंजे

२४/११/२०२२.




🎭 Series Post

View all