चेअरपर्सन द्विग्विजय कर्वे त्यांच्या खुर्चीवर बसले आणि सगळ्यांनाही बसायला सांगितले. त्यानंतर त्यांनी मिटींग सुरू करायला आदेश दिला. त्यानुसार आर्यनने त्याचा परिचय देऊन मिटींगला अर्थातच प्रस्ताव सादरीकरणाला सुरुवात केली. त्याने अगदी मुद्देसूद कंपनीची भूमिका, कंपनीच्या हाती असलेले प्रोजेक्ट्स, भविष्यकालीन अंदाज, इन्व्हेस्टर्सची भूमिका, रायव्हल कंपनीचा दृष्टीकोन अन् सी.ई.ओ.चा नाईलाज या सर्व बाबींवर प्रकाश टाकला. त्याने सी.ई.ओ.च्या वतीने दिलगिरी व्यक्त केली.
दिग्विजय कर्वे यांनी सर्व नीट समजून घेतले. आर्यनने मुद्देसूद सर्व काही समजावून सांगितल्यामुळे दिग्विजय कर्वे यांना सी.ई.ओ. नक्षत्र चव्हाणचा नाईलाजही अचूक कळला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वतीने ज्ञानदाला तिचा दृष्टीकोन मांडायला सांगितले. तिने आर्यनच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. तसेच सी.ई.ओ. नक्षत्र चव्हाण यांना त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याची बाबही जाहीर केली; पण बडतर्फीचे कारण मिटींग हॉलमध्ये उपस्थित सभासदांना वगळता सर्वांसाठी गोपनीय ठेवण्याचे सांगितले. ज्ञानदाने सांगितले की, पी.आर. टीमकडून सी.ई.ओ.च्या बडतर्फीची बातमी मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रदर्शित करण्यात येईल आणि जगासाठी बडतर्फीचे कारण असेल की, नक्षत्र चव्हाण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील कारणांमुळे कंपनीतील त्यांची भूमिका पार पाडायला ते एकंदरीत अक्षम भासत असल्याने त्यांना त्यांच्या पदावरून दूर केले जात आहे.
कर्मचाऱ्यांना बोनस अन् पगारवाढ देऊन अतिरिक्त वेळ काम करवून घेण्याच्या प्रस्तावालाही ज्ञानदाने समर्थन दर्शविले. शिवाय तिने ताकीद दिली की, सर्व प्रोजेक्टस् चे स्ट्रक्चर पूर्वीसारखे न राहता बदलण्यात यावे. शिवाय हाती असलेल्या टेंडरवर एवढ्या उत्कृष्टपणे काम करावे की, जेणेकरून रायव्हल कंपनी चुकूनही ते टेंडर असो वा प्रोजेक्टस् बळकावून घेऊ शकणार नाही. त्याचबरोबर सर्व इन्व्हेस्टर्ससोबत ती स्वतः व्यवहार करणार, याचाही खुलासा तिने केला. सरतेशेवटी तिने सी.ई.ओ. नक्षत्र चव्हाण यांच्या बडतर्फीच्या दस्तऐवजावर स्वतः सही केली, त्यानंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सह्या घेतल्या अन् अंतिमतः चेअरपर्सन द्विग्विजय कर्वे यांची सही घेऊन नक्षत्र चव्हाणची बडतर्फी जाहीर केली.
ज्ञानदाचे बोलून झाल्यानंतर अभेद्य वानखेडे चेअरपर्सन द्विग्विजय कर्वे यांना उद्देशून म्हणाला, " मिस्टर कर्वे, आता सी.ई.ओ.च्या पदावर कुणाची नियुक्ती करण्यात येईल? "
दिग्विजय कर्वे ज्ञानदाकडे पाहून सुचक हसले अन् अभेद्यला प्रत्युत्तर देत बोलले, " मिस्टर अभेद्य तुमच्या या प्रश्नाचं उत्तरही कंपनीच्या वाईस चेअरपर्सन मिस ज्ञानदाच देतील. "
ज्ञानदा गालातल्या गालात मंद हसली आणि म्हणाली, " मिस्टर अभेद्य वानखेडे यांना जो प्रश्न पडला तो बहुदा इथे उपस्थित सगळ्यांनाच पडला असणार. तर आपल्या डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे नवे सी.ई.ओ. आहेत मिस्टर आर्यन ताम्हणकर! "
आर्यन स्वतःचं नाव ऐकून गोंधळून गेला. तो डोळे मोठे करून पाहतच राहिला. दिग्विजय कर्वे मात्र मंद स्मित करत शांत बसून होते. सी.ई.ओ.चे नाव जाहीर होताच सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला पण त्याला अभेद्य अपवाद होता. तो रागाने लालबुंद झाला होता.
तो त्याच्या जागेवरून तावातावाने उठून उभा राहिला आणि ज्ञानदाला उद्देशून म्हणाला, " मिस ज्ञानदा सी.ई.ओ.ची निवड करणे तुम्हाला मस्करीचा विषय वाटतोय का? कोण आहे हा आर्यन? त्याची लायकी तरी काय आहे? आणि तुम्ही अशा व्यक्तीची निवड केली सी.ई.ओ. म्हणून? बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एक व्यक्तीची सी.ई.ओ.च्या पदी नियुक्ती करणे अपेक्षित होते पण तुम्ही असा कसा निरर्थक निर्णय घेतला? हे बघा, इथे तुम्हाला तुमचा जिवलग मित्र कोण, हा प्रश्न विचारलेला नाहीये म्हणून तुम्ही पात्र व्यक्तीला सी.ई.ओ. म्हणून नेमायला हवे. "
" मिस्टर अभेद्य वानखेडे तुमचे शब्द जरा जपून वापरा. मिस ज्ञानदा यांनी कोणत्या तथ्यांचा आधार घेत हा निर्णय घेतला याची तुम्ही विचारपूस नक्कीच करा पण त्यांनी घेतलेला निर्णय निरर्थक आहे, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्हाला आक्षेप असेल तर तसे स्पष्ट सांगा पण उगाच वाईस चेअरपर्सनच्या निष्पक्ष निर्णयावर संशय घेऊ नका. कळलं? " दिग्विजय कर्वे अभेद्यला दम देत बोलले आणि त्यांचा रागीट कटाक्ष पाहता अभेद्य अगदी गार झाला.
" माफ करा सर! " अभेद्य बळेच दिलगिरी व्यक्त करू लागला.
दिग्विजय कर्वे यांनी अभेद्यकडे दुर्लक्ष केले आणि ते त्यांच्या लेकीला अर्थात ज्ञानदाला उद्देशून म्हणाले, " मिस ज्ञानदा सी.ई.ओ. म्हणून तुम्ही आर्यन ताम्हणकर यांची निवड का केली, याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरून सर्वांच्या मनातील शंकाकुशंकांचे निरसन होईल. "
ज्ञानदाने दिग्विजय कर्वेंना मानेने दुजोरा दिला अन् ती तिच्या जागेवरून उठली व आर्यनला सी.ई.ओ.च्या पदावर नेमण्यामागे कारण सांगायला सरसावली.
क्रमशः
........................................................
©®
सेजल पुंजे
२४/११/२०२२.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा