वाट हळवी वेचताना (भाग-३१)

बापलेकाची कहाणी...

आर्यनची हाक ऐकताच ज्ञानदा जागीच थांबली व त्याच्याकडे पाहून थोडी अवघडून स्मित करू लागली. आर्यन तिला उद्देशून म्हणाला, " ज्ञानदा तू इथे काय करतेय? दर्शन आणि शिवाक्षी कुठे आहे? त्यांची पॅरेंट्स मिटींग आटोपली का? आणि आटोपली तर आज त्यांच्या डान्स क्लासला सुट्टी आहे का? तू कुठे बाहेर जाणार आहेस का? हेच सांगायला तू इथे आली आहेस का? पण यायची गरज नव्हती तू कॉल करायला हवा होतास? अं... कदाचित तू कॉल केला असेल पण माझा मोबाईल सायलेंट असल्याने मला कळलं नसेल. एक मिनिट मी मोबाईल चेक करतो. "


एवढं बोलून आर्यनने त्याचा मोबाईल पाहिला पण त्यात ज्ञानदाच्या कॉलचे वा मॅसेजचे एकही नोटिफिकेशन नव्हते. म्हणून आर्यन तिला म्हणाला, " अगं तू मला कॉल केला होतास की नाही? इथे एकही नोटिफिकेशन दाखवत नाहीये. एक मिनिट काही दुसरी भानगड आहे का? दर्शन आणि शिवाक्षी ठीक आहेत ना? " 


आर्यन ज्ञानदाला बोलूच देत नव्हता. त्यामुळे त्याचा शब्द तोडत ज्ञानदा बोलली, " अरे एक मिनिट! किती ते प्रश्न! दम घे की जरा! मला बोलू तर दे! " 


ती आणखी पुढे काही बोलणार तेवढ्यात कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पैकी एक डायरेक्टर ज्ञानदाला उद्देशून म्हणाले, " मिस ज्ञानदा? आज तुम्ही इथे? " 


आर्यनने आश्चर्याने त्या दोघांकडे पाहिले. तो त्या व्यक्तीला उद्देशून म्हणाला, " अभेद्य सर, तुम्ही आणि ज्ञानदा एकमेकांना ओळखतात का? "


" मिस्टर आर्यन, कंपनीच्या वाईस चेअरपर्सनची वा चेअरपर्सनच्या एकुलत्या एक मुलीची ओळख कोणत्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला नसणार? " अभेद्य बोलला पण त्याचे शब्द ऐकून आर्यन अगदी आश्चर्यचकित झाला. 


आर्यन ज्ञानदाकडे अविश्वासाने बघू लागला. ज्ञानदा मात्र ओढूनताणून स्मित करत होती. त्या परिस्थितीत कसे रिऍक्ट व्हावे तिला कळेना; पण तरीही तिने खोल श्वास घेतला आणि ती अभेद्यला उद्देशून म्हणाली, " मिस्टर अभेद्य वानखेडे आपण नंतर बोलूया. सध्या मी थोडी बिझी आहे. त्यामुळे तुम्ही इथून निघालात तरी हरकत नाही! " असं बोलून ज्ञानदाने हाताचा इशारा करून अभेद्यला जायला सांगितले. 


ज्ञानदाने नेहमीप्रमाणेच अभेद्यचा शाब्दिक अपमान केल्यासारखे अभेद्यला वाटले. म्हणून तोंड वाकडे करून त्याने तिथून धुसफूस करत काढता पाय घेतला. तो जाताच ज्ञानदाने सुटकेचा श्वास घेतला आणि तिने आर्यनकडे कसनुसं हसून पाहिलं; पण आर्यन मात्र शांत मुद्रेत पण कपाळावर आठ्या पाडून उभा होता. तरीही तिच्याकडे पाहून त्याने तिला नम्रपणे विचारले, " ज्ञानदा, नेमकी काय भानगड आहे? "


आर्यनच्या प्रश्नाने ती थोडी अडखळली; पण नंतर तिने आर्यनला स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, " आर्यन, आय ऍम सॉरी की, मी ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली. " 


" म्हणजे... ज्ञानदा तू खरंच डी.के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची वाईस चेअरपर्सन अर्थात द्विग्विजय सरांची मुलगी आहेस? " आर्यनने आश्चर्याने विचारले. 


" हो! " ज्ञानदा बोलली. 


" मग तू मला आधीच का नाही सांगितलं? " आर्यनने परत गोंधळून विचारले. 


" अं! कारण मला कोणतीच स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे नव्हती. म्हणजे मला वाटलं की, जर तुला कळलं की, तू ज्या कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर आहेस त्याच कंपनीची वाईस चेअरपर्सन मी आहे, तर आपल्या मैत्रीत उगाच औपचारिकता शिरण्याची शक्यता होती. त्यामुळे मी या गोष्टीचा खुलासा केला नाही. " ज्ञानदाने स्पष्टीकरण दिलं. 


" अच्छा! " आर्यन बोलला. 


" ह्म्म... " ज्ञानदाने केवळ हुंकार दिला. 


" म्हणून तू काल माझी प्रॉब्लेम ऐकून एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीप्रमाणे धडाधड उपाय सुचवले तर... आणि मी तुला कसलंच ज्ञान नसताना किती शार्पली प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असल्याचा विचार करून उगाच तुझं कौतुक करत होतो. " आर्यन ज्ञानदाची छेड काढत म्हणाला. 


" ह्म्म! "ज्ञानदाने डोळे बारीक करून पाहिले. 


" मस्करी करतोय गं! काय सतत गाल फुगवून घेतेस फुग्यासारखे! " आर्यन हसत म्हणाला. त्यावर ज्ञानदा गालातल्या गालात मंद हसली. त्यानंतर तो पुढे बोलला, " महत्त्वाचं म्हणजे मला माहीत आहे की, प्रोफेशनली जरी तू तातडीने मला उपाय सुचवला होतास तरी तेवढ्या ताबडतोब उपाय काढणे हे सोपं काम नसतंच; म्हणून आता मला तुझं विशेष कौतुक वाटतंय. " 


" बापरे! आज एवढं कौतुक! अपचन होण्याची भीती वाटतेय मला आता! " ज्ञानदा हसून बोलली. त्यावर आर्यनही हसला. त्यानंतर ते मिटींगसाठी मिटींग हॉलमध्ये गेले. 


                मिटींगसाठी सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जमले होते. ज्ञानदा वाईस चेअरपर्सनच्या खुर्चीवर विराजमान झाली होती. आर्यन काल रात्री ज्ञानदाने जे जे उपाय सुचविले होते त्यावरच एकत्रितरित्या प्रस्ताव सादर करणार होता अन् त्यासाठीच सर्वजण कंपनीचे चेअरपर्सन द्विग्विजय कर्वेंची मिटींग हॉलमध्ये वाट पाहत होते; कारण त्यांच्या उपस्थितीशिवाय मिटींग सुरू होणार नव्हती. तेवढ्यात दिग्विजय कर्वे मिटींग हॉलमध्ये शिरले आणि त्यांची चाहूल लागताच सर्वजण सन्मानाने उठून उभे राहिले. 


क्रमशः

.......................................................... 

©®

सेजल पुंजे

२३/११/२०२२.

🎭 Series Post

View all