Feb 25, 2024
पुरुषवादी

वाट हक्क वेचताना (भाग -४५)

Read Later
वाट हक्क वेचताना (भाग -४५)

आर्यन बेडवर झोपलेल्या दर्शनला पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तो काळजीने दर्शनकडे पाहत होता. ज्ञानदा आणि शिवाक्षी सुद्धा तिथेच होत्या. शिवाक्षी ज्ञानदाला म्हणाली, " मम्मा, दर्शनचं असं शांत शांत राहणं मला नाही बघवत गं! आधी कसा तो चुळबुळ करायचा पण आता सगळं बदललंय गं! त्याचा चेहरा बघ ना किती कोमेजून गेलाय. किती निस्तेज दिसतोय तो! आपला हसरा दर्शन कुठे आहे मम्मा? मला माझा जुना दर्शन हवा! जो क्षुल्लक गोष्टीतही आनंद शोधायचा, माझ्यासोबत धमालमस्ती करायचा. खळखळून हसायचा आणि मलाही हसवायचा. अमाप बडबड करायचा आणि मलाही बडबड करायला शिकवायचा. मम्मा तो दर्शन कुठे आहे? दर्शन हल्ली का असा सिरियसली वागतोय? सगळं तर नीट सुरू होतं ना... मग काय झालंय दर्शनला... मम्मा तू त्याला सांग ना! तुझं ऐकतो ना तो... मग तू तरी त्याला सांग. " 


शिवाक्षी अक्षरशः रडत होती. ती पहिल्यांदा एवढी भावूक झाली होती. एरवी ती तिच्या भावनांवर संयम साधायची पण आज तिच्या भावनांचा उद्रेक झाला अन् तिने टाहो फोडला. ज्ञानदाचेही डोळे पाणावले होते. ती शिवाक्षीची समजूत काढताना म्हणाली, " शिवा, बी स्ट्रॉंग! सगळं पूर्वीसारखंच होईल, काळजी नको करू. दर्शनला त्याच्या शिवा ताईच्या डोळ्यातले अश्रू पाहावले नाही जाणार म्हणून तू रडू नकोस. हे बघ, आपला दर्शन अगदी पूर्वीसारखाच होईल. डोन्ट वरी! " 


" शिवा, बाळा! काळजी करू नकोस. मी प्रॉमिस करतो आपला दर्शन पूर्ववत होईल. तो परत नॉनस्टॉप बडबड करणार, खळखळून हसणार आणि तुझ्यासोबत धमालमस्ती करणार, आय प्रॉमिस! " आर्यन सुचक बोलला अन् त्याने मनोमन एक निर्धार केला. 


त्याचे शब्द ऐकून ज्ञानदाचा मात्र गोंधळ उडाला होता. ती त्याच्याकडे आश्चर्याने अन् प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. ती त्याला विचारपूस करू लागली, " आर्यन, तू काय विचार करत आहेस? " 


" मी तुला कळवतो लवकरच! तुम्ही दोघी जरा थांबा दर्शनजवळ... मी आलोच! " आर्यन सुचक बोलला अन् तडकाफडकी निघून गेला. 


ज्ञानदा आणि शिवाक्षी आर्यन गेला त्या दिशेने पाहत राहिल्या. शिवाक्षी ज्ञानदाला म्हणाली, " मम्मा, काकांनी काय विचार केला असेल? आणि सध्या ते कुठे गेले असतील? महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी असा कोणता निर्णय घेतलाय की, दर्शन आपसूकच पूर्ववत होईल? "


" शिवाक्षी हाच प्रश्न मलाही पडलाय! " ज्ञानदा बोलली. त्यावर शिवाक्षीने निव्वळ हुंकार भरला. 


थोड्या वेळानंतर दर्शनला जाग आली. तेवढ्यात आर्यनही आला. त्याच्या हातात डबा होता. आर्यन दिसताच दर्शनने तोंड फिरवून घेतले तरीही आर्यनने त्याचे प्रयत्न सुरू ठेवले. तो दर्शनच्या बाजुला बसला आणि त्याने दर्शनचा हात हातात घेतला व तो त्याला म्हणाला, " दर्शू, आय ऍम सॉरी मी तुला या काही दिवसात फार त्रास दिलाय; पण आजपासून मी तुला त्रास देणार नाही. आय प्रॉमिस बाळा, तू जे म्हणशील ते मी करणार फक्त तू हा रुसवा सोड! माझा राग तू जेवणावर काढू नकोस. तू जेवून घे. हे बघ, मी तुला वचन देतोय की, मी आजपासून तू जे बोलशील ते सर्व करणार! अगदी दर्शिकाची शेवटची इच्छा तुला पूर्ण करायची आहे ना... तर ती इच्छा पूर्ण करायलाही माझी काहीच हरकत नाही. तू जे म्हणशील अगदी तसंच होईल. मी आता नकार देणार नाही. तू म्हणशील ते मी करणार! फक्त तू रुसवा सोड! "


आर्यनचे शब्द ऐकून ज्ञानदा आणि शिवाक्षी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या तर दर्शनने कातर स्वरात विचारले, " बाबा... तू... खरंच आईची शेवटची इच्छा पूर्ण करणार? तू खोटं तर बोलत नाहीये ना माझ्याशी? "


" नाही राजा! मी खोटं नाही बोलतोय. तू जे म्हणशील ते सगळं करायला माझा होकार आहे. फक्त तू असा अबोला धरू नकोस. तू जेवणावर राग काढू नकोस. तू पोटभर जेव. कसलेही विचार करू नकोस कारण आता सर्वकाही तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. " आर्यन दर्शनला विश्वासात घेत बोलला. 


" बाबा... खरंच? " दर्शन थोडा उत्साहात बोलला. 


" हो खरंच पण एका अटीवर! " आर्यन बोलला. 


" अट? कोणती अट? " दर्शनने आश्चर्याने विचारले. 


" हीच अट की, यापुढे तू कधीच माझ्याशी अबोला धरणार नाहीस. आपल्यात मतभेद झाले तर तू रुसणार नाहीस. मी तुझ्यावर रागावलो, ओरडलो तर तू माझा राग जेवणावर काढणार नाहीस आणि कितीही काही झालं तर तुझ्या बाबाला एकटं सोडणार नाहीस. बाबावर प्रेम करणं बंद करणार नाहीस. " आर्यन दर्शनचे गालगुच्चे घेत बोलला. 


" हो! चालेल! " दर्शन मंद हसून बोलला. त्यानंतर आर्यन त्याला डब्यातल्या जेवणाचा एकेक घास भरवू लागला. 


क्रमशः

............................................................... 

©®

सेजल पुंजे

२५/११/२०२२.


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//