वाट हळवी वेचताना ( भाग - ३६)

बापलेकाची कहाणी

थोड्या वेळाने ज्ञानदाने मोबाईलमधली गॅलरी ओपन केली अन् नंतर त्यातला डायरीचा फोटो झुम करून शिवाक्षीने सांगितल्याप्रमाणे त्यात लिहिलेलं वाचू लागली, " मला माहीत आहे की, आर्यन मी तुला सांगायला खूप उशीर केलाय. कदाचित तुझ्या हाती ही डायरी असेल तेव्हा मी या जगात नसेलही... हो! मला आधीच कल्पना होती रे! डॉक्टरांनी सगळं सांगितलं होतं पण तरीही सगळं लपवून ठेवलं मी! फक्त तुझ्या आनंदासाठी! म्हणून मला सांग, मी नसताना तू निर्विकार झाल्याचं मला कसं सहन होईल रे? मला माहीत आहे की, तू आपल्या बाळाला नीट वाढवशील; पण माझ्या आरूचं काय? त्यालाही प्रेमाची गरज आहे, हे माझ्याशिवाय आणखी कुणाला रे कळणार? म्हणून प्लीज, तू एकटा नको राहू! मला माहीत आहे, तू एकटा आपल्या बाळाला वाढवायला समर्थ आहेस; पण माझा आरू प्रेमाला मुकायला नको. 


                आरू, तू बालपणापासून बरंच काही सहन केलंय पण आता आणखी नाही. मला माहीत आहे की, ज्ञानदाचं तुझ्यावर प्रेम होतं. तिने तिच्या प्रेमाची कबुलीही दिली होती; पण तू नकार दिला होतास; कारण तुझ्या आयुष्यात मी होती, 'तुझी दर्शिका' पण आता मीच तुझी सोबत करायला नसताना तू एकाकी पडला असशील ना... म्हणून मला वाटतं माझ्यानंतर जर तुला कुणी समजून घेत असेल तर ती ज्ञानदा आहे. म्हणून तू एकट्याने आयुष्य न जगता ज्ञानदासोबत नव्याने संसार थाट! एक नवी सुरुवात करून बघ! त्यामुळे आपल्या बाळाला एक आई मिळेल अन् तुला तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी जीवनसंगिनी मिळेल! प्लीज, माझी शेवटची इच्छा म्हणून तू माझं ऐक अन् ज्ञानदासवे तू नव्याने संसार थाट! करशील ना माझी शेवटची इच्छा पूर्ण? " ज्ञानदाने एकूण एक शब्द वाचला अन् ती आश्चर्याने शिवाक्षीकडे पाहू लागली. 


ज्ञानदा आश्चर्य व्यक्त करत म्हणाली, " शिवा, आर यु सिरियस? तुला खरंच वाटतंय की, दर्शनने डायरीत लिहिलेलं हे सर्व वाचलं असेल? " 


" एकदम शंभर टक्के खात्री नाहीये मला; पण ती डायरी मला दर्शनची सर्व खेळणी कपाटाच्या ज्या कप्प्यात असतात तिथे मिळाली. शिवाय मला नाही वाटत की, आर्यन काका ती डायरी अशा कुठल्याही ठिकाणी तिची अगदी जपणूक न करता ठेवतील म्हणून... " शिवाक्षी बोलली. 


" हे ही बरोबर आहे. " ज्ञानदा बोलली. 


" ह्म्म! त्याचबरोबर माझ्या मनाला आणखी एक शंका शिवली आहे. " शिवाक्षी सुचक बोलली. 


" शंका? कोणती शंका? " ज्ञानदाला परत प्रश्न पडला. 


" कदाचित दर्शन स्वतःला गिल्टी समजतोय हल्ली... " शिवाक्षी बोलली. 


" म्हणजे? " ज्ञानदा गोंधळून बोलली. 


" म्हणजे त्याला वाटतं की, त्याच्यामुळे त्याची आई मरण पावली. अर्थात त्याला जन्म देण्यासाठी त्याच्या आईने मरणाला कवटाळले. एवढेच नव्हे तर, त्याचं पालनपोषण करण्यासाठी त्याचा बाबा अर्थात आर्यन काका लग्न करत नाहीये अन् त्यामुळे त्याच्या आईची शेवटची इच्छा सुद्धा त्याच्याचमुळे अपूर्ण राहिलीय. " शिवाक्षीने स्पष्टीकरण दिलंय. 


" अगं! पण लग्न करणे वा न करणे हा सर्वस्वी आर्यनचा निर्णय होता. दर्शन स्वतःचा का गैरसमज करून घेतोय? " ज्ञानदा बोलली. 


" कदाचित लहान आहे तो म्हणून असेल... पण ते काहीही असो! जर त्याने ती डायरी वाचली असेल आणि ते शेवटचं पानही तर नक्कीच चिंता करण्यासारखी बाब आहे कारण आजकाल त्याच्या वागण्यात बराच बदल दिसतोय मला! त्याच्या डोळ्यात गिल्ट स्पष्ट दिसतं. एवढेच नव्हे तर, अधुनमधून त्याच्या वर्गमित्रांनी त्याला खूप आधी दिलेले सर्व दोषारोप आठवून तो एकांतात रडतो. तो स्वतःलाच स्वतःच्या आईच्या मरणाला दोषी मानतो. म्हणूनच तो हल्ली आर्यन काकांजवळ कुठलेही हट्ट करत नाही. असे बरेच बदल जाणवत आहेत. मला पहिल्यांदा वाटलं होतं की, कदाचित काकांवर कामाचा बोजा वाढलाय त्यामुळे दर्शन समजून घेत असेल पण आज डायरी वाचताना चित्र काही वेगळंच भासलं. " शिवाक्षी बोलली. 


" ह्म्म! मला आर्यन सोबत बोलून पाहावं लागेल. " ज्ञानदा विचार करत बोलली. 


" त्यापेक्षा तू आर्यन काकांना लग्नाची मागणी का घालत नाहीस? " शिवाक्षी बोलली. 


" शिवा वेडी आहेस का? लग्न म्हणजे पोरखेळ वाटला का तुला? " ज्ञानदा शिवाक्षीवर नजर रोखत बोलली. 


" सॉरी मम्मा! " शिवाक्षीने माफी मागितली. 


" इट्स ओके! आज बोललीस परत असं नको बोलूस. " ज्ञानदा बोलली. त्यावर शिवाक्षीने हुंकार भरला. 


                दुसरीकडे बऱ्याच दिवसांनंतर आर्यन आणि दर्शन एकत्र वेळ घालवत होते. जेवण करून झाल्यावर आर्यन दर्शनच्या डोक्याला तेल लावून मालिश करून देत होता. आर्यन फार रिलॅक्स वाटत होता म्हणून तो दर्शनसोबतही हसून बोलत होता; पण दर्शन मात्र वेगळ्याच विचारात हरवला होता. आर्यनलाही लगेच लक्षात आले म्हणून तो दर्शनला बोलते करण्यासाठी उपाय शोधू लागला. मालिश केल्यानंतर तो दर्शनसोबत खेळ खेळू लागला. त्याला वाटले, त्या निमित्ताने तरी दर्शन विचारचक्रातून बाहेर येईल; पण तसे झाले नाही. सरतेशेवटी त्याने दर्शनचा हात हातात घेतला आणि तो दर्शनला त्याच्या शांततेमागील कारण विचारायला पुढे सरसावला. 


क्रमशः

.............................................................. 

©®

सेजल पुंजे

२४/११/२०२२.



🎭 Series Post

View all